? जीवनरंग ?

☆ काल्पनिक मृगजळ — भाग – 1 – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

“ बोला, काय त्रास होतोय?..”

“ डॉक्टर, खूप डिप्रेशन आलं आहे, कसलाच उत्साह वाटत नाही, काहीच करायची इच्छा होत नाही…”

“ काही विशेष कारण ? एखादी वाईट घटना ??”

“ नाही डॉक्टर, अगदी सुरळीत आहे सगळं…घरकामाला बाई आहे, मुलगा ८ वीत शिकतोय, नवरा प्रेमळ आहे… तरीही का असं होत असेल ?? ”

“ ठीक आहे. तुम्ही बाहेर जा, मी तुमच्या मिस्टरांशी बोलतो जरा…”

डॉक्टरांनी सांगितलं तसं शिल्पा बाहेर गेली….

डॉक्टर अजयला विचारू लागले…

“ तुम्हा दोघांत काही वाद ?? काही भांडणं ?? ”

“अहो सांगतो काय डॉक्टर, आमच्यात कसलाही वाद नाही की काही नाही, पण ही सतत चिंतेत दिसते, कसलाही उत्साह नाही तिला… तिची ही अवस्था बघून मलाच खूप काळजी वाटली म्हणून तिला तुमच्याकडे घेऊन आलो…”

“ बरं मला शिल्पाचा दिनक्रम सांगा….”

“ सकाळी उठते, चहा बनवते, मग स्वयंपाकीण येऊन नाष्टा, जेवण बनवते. कामवाली घरातला झाडू पोचा, भांडी, कपडे आवरून घेते… त्यावेळात शिल्पा मोबाईलवर काहीतरी बघत टाईमपास करते… मग tv बघते… तिला म्हटलं नोकरी कर, मन रमेल, तर तेही नाही म्हणते…”

“ इतका राणीसारखा थाट असून शिल्पाला कसलं डिप्रेशन आलं असेल ??” डॉक्टर विचार करू लागले…

“ ठीक आहे मी काही गोळ्या देतो, त्या घ्यायला लावा आणि ८ दिवसांनी परत या…”

शिल्पा आणि अजय निघून गेले. शिल्पाचा मोबाईल तिथे टेबलवरच राहिला होता…डॉक्टरांनी कंपाउंडरला फोन केला पण तोवर ते दोघे निघून गेले होते….

डॉक्टर विचार करत बसले— ‘ ही केस जरा वेगळी दिसते, कारण कारणाशिवाय कोणी डिप्रेस होत नाही.’

अजयने शिल्पाचा सांगितलेला दिनक्रम डॉक्टरांनी आठवला..

डॉक्टरांना लक्षात आले की या सगळ्याचं मूळ हा मोबाईल आहे… असं काय होतं त्या मोबाईलमध्ये ? कोणाचा फोन येत असेल का? कोणी त्रास देत असेल का?? कारण शिल्पा जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये असायची, घरात करण्यासारखी काही कामं नव्हतीच…

डॉक्टरांनी शिल्पाचा मोबाईल चेक करायचा ठरवला…

तसं पाहिलं तर दुसऱ्याचा मोबाईल बघणं हे चुकीचं होतं. पण शिल्पाच्या उपचारासाठी ते करावंच लागणार होतं… सुदैवाने मोबाईलला कसलंही लॉक वगैरे नव्हतं…

डॉक्टरांनी व्हाट्सएप चालू केलं… सर्च बॉक्समध्ये त्यांनी काही शब्द टाकले…

—“त्रास”, “वाईट”, “दुःख”, “एकटेपणा”….

पण या संदर्भातील कुठलाही मेसेज आढळला नाही…

डॉक्टरांनी काही वेळ विचार केला..मग त्यांनी टाइप केलं..

—“मज्जा”, “भारी”, “लकी”….

अश्या शब्दांचे भरमसाठ मेसेज सापडले… त्या मेसेजमध्ये रेखा, माधुरी, प्रेरणा आणि नम्रता अशा चार मुलींशी जास्त चॅटिंग झालेली दिसली ….

नंतर डॉक्टरांनी फेसबुक ओपन केलं… त्यात ऍक्टिव्हिटी लॉग चेक केला… त्यातही या चार मुलींची प्रोफाइल आणि फोटोज बघितले….

काय संबंध होता या चौघींचा आणि शिल्पाच्या डिप्रेशनचा ??

खूप विचाराअंती डॉक्टरांना काय समजायचं ते समजलं… इतक्यात दार वाजले, डॉक्टरांनी मोबाईल चे current apps पटापट बंद केले… शिल्पा आणि अजय आत आले.  मोबाईल राहिला म्हणून घ्यायला आले होते , मोबाईल घेऊन परत गेले..

डॉक्टरांना त्या चौघींची नावं आणि फोटो चांगले लक्षात राहिले होते…

त्यांनी त्यांचा फोन फिरवला…

“ शिंदे, जरा वेगळं काम आहे….” असं म्हणत डॉक्टरांनी शिंदेला (कंपाउंडरला) एका वेगळ्या मिशन वर धाडलं…

आठ दिवसांनी शिल्पा आणि अजय परत आले…

“ गोळ्यांनी काही फरक ?? ”

“ झोप जास्त येते,बाकी काही नाही…”

डॉक्टर उठले, त्यांचा खुर्चीमागे जाऊन हात खुर्चीच्या डोक्यावर टेकवत बोलू लागले…

“ शिल्पा..तुझ्या मैत्रिणी रेखा, माधुरी, प्रेरणा आणि नम्रता… या जगातल्या सर्वात सुखी मुली आहेत असा तुझा गैरसमज असेल तर तो काढून टाक…”

खाली मान घालून बसलेली शिल्पा चक्रावली, एकदम मान वर करत म्हणाली…

“ तुम्हाला कसं माहीत त्या माझ्या मैत्रिणी आहेत ते ??? ”

अजय आणि शिल्पा अवाक होऊन ऐकत होते…

क्रमशः

ले.: अनामिक 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments