जीवनरंग
☆ काल्पनिक मृगजळ — भाग – 2 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
(अजय आणि शिल्पा अवाक होऊन ऐकत होते…) इथून पुढे —-
“ तुझा मोबाईल इथे राहिला होता, तुझी केस पाहता मला तो मोबाईल चेक करणं आवश्यक होतं…
तू कायम या चार मैत्रिणींसोबत स्वतःची तुलना करत आली आहेस…कॉलेजमध्ये तुमचा ग्रुप होता… तू चौघीत सर्वात हुशार… सर्वात सुंदर… लग्न झाली अन चौघींच्या वाटा वेगळ्या झाल्या…बरोबर ना ?
रेखा… नवऱ्यासोबत अमेरिकेत आहे… तिथले तोकड्या कपड्यातले फोटो ती सतत फेसबुक, व्हाट्सअपवर टाकत असते… तू सतत ते बघत स्वतःशी तुलना करतेस, की मला का नाही असं जाता आलं परदेशात ?? आतल्या आत कुढत, मनात नको वाटत असतांना कमेंट करतेस…”मज्जा आहे तुझी” , “भारी फोटो आहे ” , “ लकी आहेस ” वगैरे….
माधुरी, एका कंपनीत मॅनेजर… आपल्या कंपनीतले सर्व इव्हेंट्स ती सोशल मीडियावर टाकते, तू सतत ते बघत विचार करतेस, की मला का नाही मिळवता आली ती पोझिशन ?? मी सर्वात हुशार आहे, पण लहान शहरात असल्याने मागे पडलीये का मी ??
तसंच प्रेरणा आणि नम्रताचं… त्यांचे सततचे पिकनिकचे फोटो पाहून तुला वाटतं की आपल्या आयुष्यात का नाही असे क्षण ??
—तू त्यांच्या नजरेतून स्वतःला बघत राहिलीस—, ‘ त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल ? मी अशी घरी बसलेली, लाचार, कुढत जगणारी…अयशस्वी… दुबळी…’ मग अजयजवळ मन मोकळं करायलाही तू घाबरायचीस… कारण तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्यालाही तुझ्यावर कुठल्या अपेक्षा लादून दुखवायचं नव्हतं… मग आतल्या आत कुढत तू स्वतःवर डिप्रेशन लादून घेतलंस….”
शिल्पाच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव उमटले, डॉक्टर शब्द न शब्द खरं बोलत होते…“ आणि ऐक, शिंदेकडून मी त्यांची वरवर माहिती काढली… ज्या रेखाच्या परदेशातील वास्तव्यावरून तुला हेवा वाटायचा… तिला एक असाध्य आजार आहे…रोज ती आजाराशी झगडत आहे. … माधुरी… मॅनेजर असूनही तिच्या नवऱ्यावर तिला कंट्रोल ठेवता आला नाही, तिचा नवरा बाहेर कुठल्यातरी मुलीत अडकला आहे…. प्रेरणा अपत्यासाठी वणवण करत डॉक्टरवाऱ्या करते आहे …….. आणि नम्रता कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडली आहे… या चौघी आपलं वरवरचं आयुष्य सोशल मीडियावर टाकताहेत … त्या खालचं जळजळीत वास्तव कोण कशाला जगासमोर दाखवेल ???
….. तू स्वतःच्या नजरेतून स्वतःकडे बघ…जगात तुझ्याहून सुखी कोण आहे ?? कौटुंबिक हिंसाचार तर लांबच… इतका प्रेमळ आणि प्रामाणिक नवरा तुला मिळालाय… निरोगी शरीर मिळालं आहे आणि तुझी ओंजळही तुला अपत्य मिळून भरलेली आहे…अजून काय हवं असतं सुखी आयुष्यासाठी ?? तुलना करणं सोड… दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून तू रडतेस, पण तुझ्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाहीये …… हा विचार तू कधी केला आहेस का ??? “
एका क्षणात शिल्पाचे डोळे उघडले… एका नवीन उत्साहाचे, आनंदाचे आणि जोशाचे भरते तिला आले….
“ डॉक्टर खरंच मी चुकले…. तुमच्यामुळे मी स्वतःला माझ्या नजरेतून पाहू शकले… खरंच माझ्याहून सुखी कोण आहे या जगात ?? माझी ओंजळ सुखाने पुरेपूर भरलेली असताना काल्पनिक मृगजळामागे मी धावत होते…. स्वतःची तुलना इतरांशी करत होते….पण आता नाही… मनावरचं मळभ आता दूर झालंय…. आता शिल्पाचा एक नवीन जन्म झालाय… आनंदी, उत्साही आणि जोशपूर्ण अशी एक स्त्री म्हणून….”
डॉक्टर हसले… ” कुठल्याही गोळ्यांची गरज नाही तुम्हांला… आयुष्य भरभरून जगा…आनंदाचे कण पेरत चला…बघा आयुष्य कसं प्रेमाच्या अंकुरांनी फुलून येईल ते….”
दोघांनी डॉक्टरांना मनापासून धन्यवाद घेत निरोप घेतला…जाता जाता अजय म्हणाला… ” तुम्ही “डॉक्टर सदावर्ते” पाटी काढून ” डिटेक्टिव्ह डॉक्टर सदावर्ते ” अशी लावली तरी चालेल….”
त्याच्या या वाक्यावर डॉक्टर आणि अजय खळखळून हसायला लागले….आपण कारण नसताना दुस-याच्या दिखाव्याच्या जीवनावर, कुठलाही अभ्यास न करता विश्वास ठेवतो…त्यांच्याशी आपली तुलना करतो… व नाहक आपले मानसिक संतुलन बिघडवून घेतो, जे योग्य नाही…हे समजायला आपल्याला फार उशीर होतो…आपण आपल्या परिवारासमवेत सुखी आहोत हीच भावना सर्वश्रेष्ठ आहे…काल्पनिक मृगजळाच्या मागे धावू नका…
— समाप्त —
ले.: अनामिक
संग्राहिका : बिल्वा अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈