? जीवनरंग ?

☆ नवी नवरी नि जुनी नवरी – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री नीलेश कामथे 

कालच ओळखीत एका ठिकाणी भेटायला गेले होते. नुकतंच लग्न झालं होतं त्यांच्या मुलाचं. साधारण महिना झाला असेल, लग्नानंतरचे सगळे सोपस्कार होऊन रुटीन लाईफ सुरू झाले होते.

सहजच विचारलं ‘ सून बाई  कुठायत?’ तेवढ्यात ती आलीच ऑफिसमधून. एक छानसं स्माईल देऊन आलेच सांगून आत पळाली.. मनात म्हंटलं, ही कशाची येते आता, दोन गोष्टी करून निघूयाआपणच.  त्यांना म्हणत होते मी “आता तुम्हीच या श्रमपरिहाराला माझ्याकडे.”

सून कपडे बदलून आलीसुद्धा बाहेर. थेट आमच्यात येऊन बसली. म्हणाली, “ हो नक्की येतील, पण  तुम्ही बसा आता. मस्त पोहे खाऊन जा, आणि पुढल्या वेळी ठरवून जेवायलाच या.”

मला आश्चर्य वाटलं. मीही सुखावले, दिलखुलास दाद दिली, तिचं माझ्या स्टाईलने कौतुकही केलं. तीही खुलली, म्हणाली, “ तुम्ही बसा बोलत. मी पोहे घेऊन येतेच.”  मी त्यांच्याकडे वळून म्हंटलं, “ वाह काय लकी आहात हो, काय गोड आहे सून तुमची.”

त्या म्हणाल्या, “ अगं हो तुझाच पॅटर्न युज करतेय, “प्रेम द्या अन् प्रेम घ्या.”  “ अरे वा, मस्त परिणाम साधलात की, नक्की काय केलंत ?”

त्या म्हणाल्या, “ विशेष काही नाही गं. ती हनिमूनवरुन आल्यावर तिला पूर्ण आराम दिला. म्हंटलं तू सात दिवस पूर्ण आराम कर. सगळी कामाची पद्धत, वेळा, बारीक बारीक लक्ष देऊन फक्त बघ. करू ही नको नी बोलू ही नको, जे आवडेल ते आवडलं या काॅलममध्ये, जे नाही आवडलं ते नाही आवडलं या काॅलममध्ये, मात्र कारणासहित लिही आणि सात दिवस कमी वाटले तर  सांग.आपण जास्ती दिवस ठेवू, ती नको म्हणत होती, पण मी ऐकलेच नाही.”

“अगदी त्याच सात दिवसात तिनी मला कोणत्या नी कशा प्रकारे मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे हे मी लिहून ठेवलं. झालं– सात दिवस अगदी मजेत घालवले. मी काम करत असतांना ती माझ्या अवतीभवती राहिली आणि मला कळले, हिला माणसे आवडतात. मी काम करताना कधीच बेडरूममध्ये जाऊन बसली नाही. मग मीही तिच्याशी बोलता बोलता तिच्या सवयी, आवडीनिवडी जाणून घेतल्या. आपल्या घरच्या पद्धती, रीती रिवाज, आला गेला, कामाच्या वेळा कशा सांभाळायच्या, हे, ती बोअर होणार नाही इतपतं तिला समजेल असं ऐकवलं.”

“तीही आवडीने ऐकत होती, टिपण करत होती, घर आवरताना मध्येमध्ये तिच्याही आवडीनिवडी सांगत होती. एकंदर ती उत्साहात होती. मग मीही खुष होते. सात दिवस अगदी मजेत गेले. तिला माझं एकूण एक काम आवडलं गं, आमची गट्टी तिथेच जमली. आम्ही एकमेकींची टिपणं वाचली नि मुख्य म्हणजे तीच लक्षात ठेवून वागतोय. तिला स्वयंपाकात खूप इंटरेस्ट होता पण अजिबात सवय नव्हती. तेव्हा ती म्हणत होती, तुम्ही शिकवलंत तर मीही तयार होइन. तुम्ही सकाळी करा नि संध्याकाळी मला सगळं शिकवा. पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी माझ्याकडून करून घ्या म्हणजे तुम्हालाही बरे नि मी ही शिकीन. आणि हे असं सगळं १५ -२० दिवस झाले चाललंय, पण मस्त चाललंय आमचं.”

ऐकूनही खूप छान वाटलं. इतक्यात गरमागरम पोहे आलेच. तिच्या लाघवी, खेळकर हास्यविनोदाने पोहे आणखी रुचकर लागले. खूप बरं वाटलं,पाहून ऐकून.

हल्ली होतंय काय, सासू सुना एकमेकींशी अशा दिलखुलास बोलताना दिसत नाहीत. वाटतं, दोघांनीही एकमेकींना समजून घ्या. एकमेकींची मतं जाणून ऐकून घ्या. एकमेकींना आधार वाटेल अशा वागा. एकमेकींचे दोष पटकन दाखवून भांडत बसण्यापेक्षा छोट्या छोट्या गुणांचीही दखल घ्या- ती ही मनापासून. आपापली मते एकमेकींवर लादू नका, सकारात्मकतेने, नीट प्रेमाने, आपलेपणाने सांगा, एकमेकींच्या चुका नीट समज देऊन पदरात घ्या. सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकींचा आदर करा. घर कामाची वाटणी आपला वेळ आपल्या क्षमता बघून नीट समजून उमजून केलीत तर खटके उडणारच नाहीत.

सासूनेही येता जाता स्वपुराण न लावता, टोमणे न मारता, माझं अच्छ नि माझं तच्छं. हे सांगत बसण्यापेक्षा दोघी मिळून सुवर्णमध्य साधून सुनेशी जवळीक निर्माण होईल असेच पाहावे. सगळी कामं एकदम न लादता टप्याटप्याने सांगावीत. नवीन घरात रुळतांना तिलाही वेळ द्यावाच लागेल. संयम आणि प्रेम असेल तर अपेक्षित यश मिळेलच, पण थोडा काळ जाऊ द्यावाच लागेल.

सुनेने सुद्धा वागता-बोलताना नीट विचार करावा. सतत माहेरच्या कौतुकाचे टुमणे लावण्यापेक्षा सासरीही आपुलकीने राहावे. अगदी एखादा पाहुणा आल्यावर जसे आपले त्याच्याकडे सगळे लक्ष असते, अगदी तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष सुनेकडे सगळ्यांचेच– म्हणजे धुणी भांडी, केरलादी करणाऱ्या बायकांपासून ते थेट शेजारीपाजारी नि आला गेलाही निरखून बघत असतात सुनेकडे. हीच तर खरी कसोटीची वेळ असते. याच वेळी नीट जबाबदारी नि मर्यादा ओळखून वागावे. एखादे काम जास्तीचे पडले तर कुरकुर न करता आनंदाने करावे. घरातले वातावरण आपल्यामुळे बिघडणार नाही किंवा आपल्या वागण्याबोलण्याने कुणी दुखावणार नाही आणि कुठला सीनही क्रिएट होणार नाही याची दक्षता घ्यावी. हसून खेळून सगळ्यांशी प्रेमळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. मने जिंकून घ्यावी.

कित्येक सासवांना काही करावे लागत नाही. तरी सुनेशी सूर जुळतच नाही. कधी त्या सुनेशी प्रेमाने वार्तालाप करीतच नाहीत. सून सगळं करत्येय, तर चार शब्द  तिच्याशी प्रेमाने आपलेपणानी बोला, जवळीक साधा, तिच्या आवडीनिवडीची कदर करून तिच्यासाठी एखादी अगदी क्षुल्लक गोष्ट केलीत तरी खूप सुखावेल ती, नि दोघिंमध्ये एक घट्ट वीण तयार होईल प्रेमाची. सासू-सून या एकमेव कारणाने वेगळी चूल मांडण्याचा साधा विचारही मनात येणार नाही. परिवार एकसंघ नि एकछती राहील, (अर्थात मनाने- नाहीतर लोक म्हणतात आम्ही एकत्र राहतो पण खरं म्हणजे मनं कधीच दूर गेलेली असतात,) आणि या मायलेकी नाही, सासुसूना आहेत असं सांगावं लागेल लोकांना. सासू- सून या नाजूक नात्याला रेशीमगाठी म्हणायचे असेल, तर दोघींच्याही वागण्यात रेशीमता हवी. म्हणजे नवी नवरी आली तर तिचे स्वागतच होइल आणि जुनी नवरी सुद्धा अज्जिबात दुखावणार नाही. “रिश्ता वही सोच नई” शेवटी दोघीनीही एकच लक्षात ठेवायचं, नाती जोडण्यासाठी, जुळवण्यासाठी आपली या पदावर पोस्टिंग झालीय, तेव्हा नाती जोडत, जुळवत सासू-सुनेच्या जोडगोळीत गोडी  ठेवा…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  निलेश कामथे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments