जीवनरंग
☆ शिशिर सरला… भाग – 1 – लेखक – श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆
“काका, तुम्ही या फर्मला हवे आहात. मला तुमच्याकडूनच ऑडिटमधल्या खाचाखोचा कळल्या. या फर्मच्या सुरूवातीच्या काळात तुम्हीच तर या फर्मची सगळी जबाबदारी पेलली होती. हल्ली मात्र तुमच्याकडून वारंवार अकाऊंटिंगच्या एंट्रीज चुकताहेत. कारणं मी समजू शकतो. काही काळ तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुमची सॅलरी मात्र अव्याहत चालू राहील. माझं ऐका, लवकरात लवकर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्या. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. शुगर लेवल नियंत्रणाखाली आहे का, हे एकदा तपासून घ्या. ऑपरेशन कधी करायचं ते विचार करून काय ते मला सांगा.”
“होय, शेखर माझ्याकडून चुका होत आहेत. कबूल आहे. एक लक्षात ठेव, मी पुन्हा कामावर आलो तरच सॅलरी घेईन, अन्यथा नाही.” असं बोलून वसंता खिन्न मनाने बाहेर पडला. सूर्यास्त व्हायला सुरूवात झाली होती. पक्ष्यांचा थवा चिवचिवाट करत घरट्यांकडे परतण्यासाठी आकाशात भरारी मारत होता.
वसंताची पावलं मात्र घराकडं जायला तयार नव्हती. घरात वाट पाहणारं कोण आहे? त्याच पापुद्रे उडालेल्या चार भिंती? आजवर शेखरचा आधार होता. आज तोही तुटला. त्याला मी आता नकोसा झालोय. डोक्यात असंख्य विचारांचं मोहोळ उठलं होतं. त्याच विचारात त्यानं घरात पाऊल ठेवलं. सोफ्यावर डोळे मिटून बसला. डोळ्यांसमोरून वीस वर्षाचा कालखंड सरकत जात होता.
किरकोळ पोटदुखीच्या आजाराचं निमित्त झालं आणि सुमन आठवड्याच्या आत कायमची निघून गेली. आयुष्याचं चक्रच थांबल्यासारखं झालं. अमेय पंधरा वर्षाचा होता आणि शांभवी नऊ वर्षाची. वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी विधुरपण आलं. कित्येकांनी पुनर्विवाहाचा प्रस्ताव मांडला. मुलांना सावत्रपणाची वागणूक नको म्हणून त्याने तो प्रस्ताव बाजूला सारला.
मुलांचे आई-बाबा बनून त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे हेच वसंताचे एकमेव ध्येय होते. स्वतःचा फ्लॅट होताच, ‘दहा बारा हजाराच्या पेन्शनीवर आणि पीएफ, ग्रॅच्युईटीची मिळणारी रक्कम मुदत ठेवीत ठेवून व्याजावर कसं तरी भागवता येईल. कुठंतरी पार्ट-टाईम नोकरी करता येईल’ असा विचार करून त्यानं लगेच बँकेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करली. मुलं शाळेत जाईपर्यंत वसंताचा वेळ कसा निघून जायचा ते कळायचं नाही. परंतु दुपारचा वेळ घालवणं त्याला अवघड जात होतं. संध्याकाळी मुलं आली की त्या दोघांचा अभ्यास आणि रात्रीच्या जेवणाची तयारी. हे सगळे करता करता रात्रीचे अकरा वाजून जायचे.
एके दिवशी सकाळीच शेखर पत्ता शोधत घरी आला. वसंताच्या बॅंकेतल्या एका मित्राने त्याला पत्ता दिला होता. शेखरने नुकताच सीएचा कोर्स पूर्ण केला होता. अकाऊंट्स आणि ऑडिटसाठी मदत करण्याविषयी त्यानं प्रस्ताव मांडला. फावल्या वेळेत काम करता येणार होतं. वेळेचं बंधन नव्हतं. मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठीदेखील पैसा लागणारच होता. वसंताने ते काम आनंदाने स्वीकारलं. शेखरचे काम जसजसे वाढत चालले तसे वसंताचे कामही वाढत चालले.
काळ सरकत होता, काही वर्षातच अमेय इंजिनिअर झाला. त्याला अमेरिकेतील चांगल्या युनिव्हर्सिटीत अॅडमिशन मिळाली. त्या खटाटोपात वसंताच्या मुदत ठेवी कमी कमी होत गेल्या. मुदतठेवी काय आज न उद्या पुन्हा करता येतील. अमेयचे शिक्षण महत्त्वाचे होते.
दरम्यान शांभवी बीकॉम पास झाली. लगेचच तिच्यासाठी मुंबईत स्थायिक झालेल्या इंजिनियर मुलाचे स्थळ सांगून आले. सुहास एका प्रतिष्ठित कंस्ट्रक्शन कंपनीत नोकरी करत होता. नव्या मुंबईत त्याचा एक छोटासा फ्लॅट होता. वसंताने मुलीचे लग्न धुमधडाक्यात लावून दिले. त्यात वसंताची उरलीसुरली जमापुंजी संपुष्टात आली.
अमेयला युएस मधे चांगली नोकरी मिळाली. त्याची होणारी पत्नी त्याला तिथेच भेटली. त्याच्या लग्नाचा सोहळा पुण्यातच पार पडला. अमेयने त्या धांदलीत देखील वसंताचा पासपोर्ट बनवून घेतला. ‘बाबा, तुम्ही फक्त मला सांगायचा अवकाश की मी तुम्हाला तिकीट पाठवून देतो’ असंही सांगायला तो विसरला नाही.
वसंताला मात्र अमेरिकेत जाता येत नव्हते. कारणही तसंच घडलं होतं. जावयाने अचानक नोकरी सोडली. त्याला स्वत:चं प्रोजेक्ट लॉन्च करायचं होतं. त्यासाठी पाच लाखांची आवश्यकता होती. वसंताने बॅंकेकडून तीन लाखाचं पर्सनल लोन घेतलं आणि शेवटची दोन लाखाची मुदतठेव मोडून पाच लाखाची तजवीज केली. केवळ शेखरने जामीन दिला होता म्हणून एका दिवसात बॅंकेचं कर्ज मंजूर झालं.
जावयाने कबूल केल्याप्रमाणे सुरुवातीचे दोन महिने नियमित हप्ते भरले. त्यानंतर जी जमीन घेतली होती ती वादातली होती असं कळलं. सुहास कामधंदा सोडून पैसे परत मिळावेत म्हणून खेटे घालत होता आणि लेक लहानसहान शिलाईची कामं करत घर चालवत असल्याचं कळलं. कर्जाचे हप्ते वसंताच्या बोकांडी बसले.
लेकीची आठवण येताच वसंताने बॅगेत एक दिवसाचे कपडे भरले आणि लगोलग नव्या मुंबईकडे निघाला. ‘पुण्यात राहण्यापेक्षा लेकीच्या घराजवळच एखादी खोली भाड्याने घेऊन राहावं. अडीअडचणीला ती धावून येईल. एका माणसाच्या जेवणाची सोय करायला तिला कितीसे अवघड जाणार आहे. तिला दर महिन्याकाठी काही पैसे देता येतील,’ असा विचार करतच वसंता लेकीच्या घरी येऊन पोहोचला.
जावयाने वसंताकडे निर्विकारपणे पाहिलं. एका शब्दानेही बोलला नाही. आजोबांना पाहून नातवंडे खुश झाली. “आजोबा, तुम्ही आमच्याकडेच रहा ना!” म्हणून आग्रह करत होती. तोच धागा पकडून वसंताने लेकीकडे विषय काढला. “शांभू बेटा, मी आता इथे जवळच एखादी खोली भाड्याने घेऊन राहीन म्हणतोय. तू काय म्हणतेस?”
“बाबा, मी अजून जिवंत आहे. तुम्हाला खोली भाड्याने घेऊन राहायची काय आवश्यकता आहे? सध्या आमची ही जागा आम्हालाच अपुरी पडतेय. आम्ही टू बेडरूमचा फ्लॅट घेतल्यावर मात्र तुम्ही आमच्याकडेच येऊन राहा. तुम्ही असं फ्लॅट भाड्याने घेऊन राहिलात तर माझ्या मनाला यातना होतील. सध्या पुण्यातच आपल्या घरी रहा.”
– क्रमशः…
लेखक – व्यंकटेश देवनपल्ली.
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈