सुश्री अरूणा मुल्हेरकर

? जीवनरंग ❤️

☆ लघुकथा – चाकोरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

“हॅलो!वैशू,मी सुलू बोलते.””बोल सुलू.कशी आहेस?”

वैशाली आणि सुलज्जा दोघी अगदी जिवाभावाच्या मैत्रीणी…!माॅंटेसरीपासून ते अगदी पदवीधर होईपर्यंत एकच शाळा,एकच काॅलेज…!आता पन्नाशीला आल्या असतील पण मैत्री तशीच अजूनही टिकून आहे.

“अग कशी आहेस काय?आठवण आहे ना तुला?ह्या शनिवार/रविवार दोन दिवस आपला काॅलेजचा गृप अलिबागला रविच्या फार्म हाऊसवर जातोय…! Re union आहे न आपले…!”हो आहे ग माझ्या लक्षात,पण खरं सांगू का शनिवार रविवार मला नाही जमणार.”

वैशालीचं हे नेहमीचेच आहे.आधी हो म्हणेल आणि नंतर काहीतरी कारण सांगून माघार घेईल.

वैशाली अतिशय हुषार…!शाळेत,काॅलेजमध्ये वक् तृत्व,कथा कथन,नृत्य सर्व स्पर्धांतून ती बक्षिसे पटकवायची…!आंतर्विश्वविद्यालयीन नाट्यस्पर्धेत डाॅ.कैलास या नाटकातील तिची आईची भूमिका किती गाजली होती…!

लग्नानंतर मात्र वैशाली पूर्णच बदलली. जयंत तिचा नवरा,सिव्हील इंजिनियर…! बांधकाम खात्यात चीफ इंजिनियर आहे .त्याची सरकारी नोकरी चांगली मानाची आणि तशी आरामाचीही.भरपूर सुट्या,रहावयास सरकारी घर,नोकर चाकर,फिरायला सरकारी गाडी,सगळी सुखे होती वैशालीला. तरीसुद्धा ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटायची. तिच्या चेहेर्‍यावरची टवटवी,तो आत्मविश्वास,तो एकप्रकारचा स्पार्क

निघून गेला होता.तिचे विश्व आता फक्त नवरा, मुले आणि घर या भोवतीच फिरत होत. जयंतला,तिच्या नवर्‍याला ती एकटी कुठे गेलेली आवडतच नसे.

काॅलेजचे दिवस संपले, आता संसाराची जबाबदारी हे येवढेच तिचे कर्तव्य असे त्याचे विचार होते. वैशालीनेही हे जीवन कोणताही विरोध न करता स्वीकारले होते. नाही ना आपल्या नवर्‍याला आवडत,मग उगीच त्यावरून वादंग कशाला अशी मनाची समजूत करून ती घरात समाधान,शांती राखण्याचा प्रयत्न करीत होती.

आज सुलूचा फोन आला आणि तिच्या मनाच्या खोल कोपर्‍यात कुठेतरी तिला वेदना जाणवली.

“इतकी वर्ष्ये झाली आपल्या लग्नाला,अजून किती काळ हे असं गुरफटून रहायचं?मुलंही आता चांगली मोठी झाली…!एक मी सोडून सगळेच त्यांना जे हवं ते करतात,त्यांना जसे वागायचे तसे वागतात…! जयंतचे मित्र,त्याच्या पार्ट्या,रविवारी उशीरापर्यंत चालणारे रमी,पोकरचे डाव…!मी तेवढे सगळ्यांचे चहा पाणी आणि नाश्ता करत बसायचे…!मुलांचेही तसेच! केव्हाही कुठेही जाणार,कधीही येणार…!त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करावा,त्यांची वाट पहात बसावे आणि घरी येऊन आता भूक नाही,आम्ही बाहेरूनच खाऊन आलो असे त्यांनी सांगावे.माझी कोणालाच फिकीर नाही.

एकेक नुसते फर्मान सोडतात.त्या दिवशी मुलगी सांगून गेली,’आई,संध्याकाळी माझ्यासोबत माझ्या पाच मैत्रीणी येणार आहेत. फक्कडशी पाव भाजी कर.तुझ्या हातची पाव भाजी त्यांना फार आवडते…!’ आहे का आता. आई हक्काची…! तिला गृहीतच धरायचे…! आईचंही वय वाढत चाललंय,तिला झेपेल का,तिची दुसरी काही स्वतःची कामे असतील का,तिच्या काही इच्छा आकांक्षा असतील याची कोणालाच जाणीव नाही.त्यांच्या लेखी आईला फक्त येवढेच काम…!

मुलाच्या खोलीत जाऊन बघावे तर हा पसारा…! पुस्तके टेबलावर अस्ताव्यस्त पसरलेली, पलंगावर कपड्यांचा ढीग…!कोणते धुवायचे कोणते ठेवायचे कशाचा पत्ता नाही. पुन्हा एखादी गोष्ट मिळाली नाही तर आईच्या नावाने ठणठणगोपाळ…!”

“सुलू म्हणते तेच बरोबर आहे.ह्या सगळ्याला मीच जबाबदार आहे.मीच मुलांना मोठे होऊ दिले नाही.नको तेवढे लाड केले,आता माझ्याच अंगाशी आले.सतत माझ्या पंखाखाली गोंजारत बसले.”

“नाही.आता बास…! ह्या चाकोरीतच नाही फिरायचे. हे काटेरी कुंपण तोडायचेच.सगळी कर्तव्ये पार पाडली,घराकडे लक्ष ठेवत ठेवत स्वतःसाठीही जगायचे.स्वतःचा आनंद शोधायचा.”

वैशालीने सुलूला फोन लावला.”सुलू, मी येणार आहे ग अलिबागला….!”

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments