?जीवनरंग ?

 ☆ कथा – ‘मूर्ती’ काका… – लेखक- कौस्तुभ केळकर नगरवाला ☆ प्रस्तुती – पार्वती नागमोथी

हा सिलसिला  कधी सुरू झाला ? काही आठवत नाही. बहुतेक अनादी अनंत काळापासून…

अगदी मी लहान असल्यापासून. गणपती जवळ आले की, मूर्तीकाकांची आठवण यायची. मूर्तीकाकांचं खरं नाव ? बाप्पालाच माहिती. खरंच माहिती नाही. आम्हाला आपले दोघेही प्राणप्रिय. एक मूर्तीकाका आणि दुसरे गणपतीबाप्पा.

मूर्तीकाका, कसबा पेठेतल्या कुठल्यातरी वाड्यात रहायचे. म्युन्सीपाल्टीत कुठल्यातरी खात्यात कारकून. बालपण पेणला गेलेलं. मूर्तीकाकांचे वडील, गणपतीच्या कारखान्यात काम करायचे. हातात जादू. तीच जादू पुढच्या पिढीत झिरपत आलेली. गणपती जवळ आले की, मूर्तीकाकांची पंधरा दिवस रजा. सहज मिळाली तर ठीक…. नाहीतर विदाऊट पे.

कुंभारवाड्यातून शाडूची माती आणायची. बोहरी आळीतून रंगाचे डबे. वेगवेगळ्या साईजचे ब्रश. दोन खोल्यांचं त्यांचं घर. बाहेरच्या खोलीत रंगशाळा अवतरायची.

गणपती यायच्या आठवडाभर आधी. बाबांचं बोट धरून, मी मूर्तीकाकांकडे.” नानू , या वेळी  विठ्ठलू गणपती हवाय रे बाबा. आण्णांची फार इच्छा  आहे. ” बाबांची फर्माईश.

” तुम्ही सांगतलोत तसो करतो बाबानू.”

मी आपला मूर्तीकाकांकडे बघत बसायचो. चट्टेरीपट्टेरी पायजमा. बाह्यांचा गंजीफ्राॅक. त्यातून डोकवणारं जानवं. गंजीफ्राॅकवर रंगपंचमी. नाकावरनं ओघळणारा चष्मा. आणि घड्याळ विसरलेला हा विश्वकर्मा. मूर्तीकाका मान वर न करताच ऊत्तर द्यायचे. त्यांचे हात , डोळे , मेंदू सगळे त्या मातीच्या गोळ्यावर फोकस करणारे. बघता बघता त्यातून गणेशु प्रगटायचा. तल्लीन होणं म्हणजे काय ? खरंच मूर्तीकाकांकडनं शिकावं. कामातून खरा आनंद. आनंद सृजनाचा. निर्मितीचा. अफलातून असावा. आत्ता पटतंय. ज्यातून आनंद मिळतो, भान हरपायला होतं, ते काम करावं.

आम्ही आपले आयुष्यभर  पाट्या टाकणार आॅफीसात. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी  आम्ही  मूर्तीकाकांकडे. आत पंचवीस गणपती अवतरलेले. स्वर्गसुख. काय एकेक मूर्ती असायची, डोळे भरून पहायची. आखीव, रेखीव, सुबक. अप्रतिम  रंगसंगती. सगळ्यात आवडायचे ते मूर्तीचे डोळे. कुठूनही बघा. असं वाटायचं, बाप्पा आपल्याचकडे बघतायेत. बाप्पांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आहे. बाप्पा गालातल्या गालात हसतायेत सुद्धा. ‘काळजी नको, मी आहे पाठीशी…’

बाप्पांची ती आश्वासक नजर. बाप्पा दिसले की ऊत्साहाला ऊधाण. मनाच्या कानात, आनंदाचे ढोलताशे वाजायला लागायचे. ही सगळी मूर्तीकाकांची जादू. प्रत्येक मूर्ती घडवताना जीव ओतलेला. प्रत्येक मूर्ती म्हणूनच जिवंत. एकाही मूर्तीसाठी मूर्तीकाकांनी, कधी साचा वापरला नाही. प्रत्येक मूर्ती हाताने घडवायचे. जरा मोठा झालो. सायकल चालवता यायला लागली. गणपतीच्या आधी आठ दहा दिवस. रोज संध्याकाळी  मूर्तीकाकांकडे जाऊन बसायचो. त्यांचं ते मूर्ती घडवणं. रंगवणं… डोळ्यांची आखणी. तीच खरी प्राणप्रतिष्ठा. तो खरा जिवंत देखावा. मी तल्लीन होवून ते बघत बसायचो.

मला फार आवडायचं. मूर्तीकाका ठरवून पंचवीस मूर्ती घडवायचे. ठरलेली घरे. वर्षानुवर्षे. कुणाला एखादवर्षी वेगळी मूर्ती  हवी असेल, तर तसं. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी नावाची चिठ्ठी लावून, बाप्पा तयार असायचे. येणारा वाजतगाजत मूर्ती घेवून जायचा. जाताना काकूंकडे पैसे देवून जायचे. किंमत ? “देवाची किंमत कधीच करायची नसते…” मूर्तीकाका असंच म्हणणार.

मूर्तीकाकांकडच्या बाप्पापाशी, किमतीचं लेबल कधीच नसायचं. लोक अंदाजाने पैसे द्यायचे. मूर्ती  घेवून जाताना बघितलं, की मूर्तीकाकांचे डोळे  डबडबायचे. ‘लेक चालली सासरला’सारखा फील येत असावा.

अनंचतुर्दशीच्या दिवशी डोळ्यातला धबधबा, कधी गाली ओघळू  लागायचा कळायचं नाही. याचं सगळं क्रेडीट मूर्तीकाकांनाच. मूर्तीकाकांचा रवि. माझ्याच वयाचा. या सगळ्यापासून अलिप्त असायचा. बाहेरच्या खोलीत पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. हुशार होताच. तुसडा वाटायचा. ठरवून आर्किटेक्ट  झाला. छान चाललंय त्याचं. कॅम्पात आॅफीस आहे स्वतःचं. मोठ्ठा फ्लॅट घेतलाय कर्वे रोडला. सगळे तिकडे शिफ्ट झालेत. कसब्यातली ती भाड्याची जागा आहेच. मूर्तीकाका आता पुढच्या वर्षी  रिटायर्ड होतील. अजूनही सायकल हाणत कसब्यात जातात. गणपतीशाळा चालूयं. मधे एकदा रवि भेटला होता. ” तुमचा बाप्पा आवडता असेल, मला मात्र बिलकूल आवडायचा नाही. वेड्यासारखे वागायचे बाबा. पंधरा पंधरा दिवस बिनपगारी रजा. त्यापायी प्रोमोशन नाही. आईची खूप ओढाताण व्हायची. लोक पैसे द्यायचे, त्यातनं मटेरियलचा खर्चही भागायचा नाही. यांच्या मूर्ती बघून बर्याच लोकांनी साचे बनवले. गणपतीचे कारखाने काढले. गब्बर झाले . आम्ही आपले तसेच…”

खरंय.

रविचं बरोबर आहे.

” आता ठीक चाललंय ना तुझं..? बाप्पाची कृपा.” मी म्हणलं.

” कौ, माझाही बाप आहे तो. मलाही वाटतं, त्यानं आरामात रहावं. धावपळ कमी करावी. पण काय करू ? आमचा गणेशयाग काही थांबत नाही अजून..” एवढं बोलून  रवि निघून गेला.

दोन दिवसापूर्वी. कुहूला घेऊन मूर्तीकाकांकडे. आत रवि बसलेला. मूर्तीवर शेवटचा हात फिरवीत होता.

रविच्या हातात ब्रश….? मी पहिल्यांदा  बघितला. ” कौ बाप्पा वाट बघतायेत.” दुसर्या रांगेत, माझ्या नावाची चिठ्ठी असलेला बाप्पा. माझी वाट पाहणारा. मनप्रसन्न. बाप्पा मोरया. एकदम रवि गळ्यात पडून रडायला लागला.

” तीन आठवड्यापूर्वी  बाबा गेले रे. एकदम अॅटॅक आला. मी शेजारीच होतो. माझा हात हातात घेवून म्हणाले. ‘वर्षातले पंधरा दिवस देशील मला ? हे देवाघरचं काम थांबता कामा नये.’ आयुष्यात कधीही मातीला हात लावला नव्हता. तरीही…, पटलं.तो बाप्पा खरंच आहे रे, त्यानंच या मूर्ती माझ्याकडनं घडवून घेतल्या. खूप समाधान मिळालं या पंधरा दिवसात. माझा बाप, आयुष्यभर कळलाच नाही कधी. या पंधरा दिवसात समजला. तू मात्र लक्षात ठेव. बाबा नसले म्हणून काय झालं ?  तुझ्या घरचा बाप्पा इथूनच जाणार.”

माझ्या डोळ्यांना हाताचा वायपर पुरेना. थोड्या वेळाने  सावरलो. बाप्पांकडे डोळे  भरून बघितलं. डिट्टो तशीच मूर्ती. मूर्तीकाकांनी घडवल्यासारखी. बाप्पा तुस्सी ग्रेट हो… शेजारी कुहू जरा अवघडलेली. ” बाबू ते मूर्तीकाका कुठे आहेत ? त्यांना बघायला तर मी आलेय इथे. ” रविनं कुहूचा पापा घेत, तिला कडेवर घेतलं.

” आजपासून मीच तुझा मूर्तीकाका…..! “

बाप्पा  मोरया  !

लेखक- कौस्तुभ केळकर नगरवाला

प्रस्तुती- सुश्री पार्वती नागमोथी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments