श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 1 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

‘सूर्य ढळलेला माणूस..’

वाक्य विचित्र वाटलं ना ? मलाही ते तसंच वाटलं होते. ते वाक्य ऐकताच मी त्यांच्याकडे पाहिले होते ते अगदी चमत्कारिक नजरेने.

‘हा माणूस वेडा तर नाही ना ? ‘

माझ्या मनात त्यांचे ते वाक्य ऐकून पहिला प्रश्न निर्माण झाला होता तो हाच.

पण तो तर वेडा असल्यासारखा दिसत नव्हता. आता वेडेपण दिसता क्षणी ओळखता येते असे थोडंच आहे. दिसण्यात वेडेपणा न दिसणारे कितीतरी भेटतातच. तसाच तो असावा असें मला क्षणभर वाटून गेले, अगदी क्षणभरच. मी त्याच्या डोळ्यांत रोखून पाहिले. डोळ्यांत कुठेही वेडेपणाची किंचितशी झाकही दिसून येत नव्हती. उलट त्याचे डोळे डोहासारखे दिसले शांत, निस्तब्ध, कोणतेही तरंग नसणारे! एखाद्या शांत, संयमी, विचारी माणसाचे डोळे असेच असतात काय ? मला ठाऊक नाही पण वेडेपणा पाहण्यासाठी मी त्याच्या डोळ्यांत रोखून पाहिले तेंव्हा त्याच्या डोळ्यांत पाहताना का कुणास ठाऊक पण मला तो शांत, संयमी, विचारी असावा असे वाटू लागले आणि मग त्याचे  ‘ सूर्य ढळलेला माणूस ‘ या शब्दांचे मात्र गूढ वाटू लागले.

” काय म्हणालात बाबा ? ‘सूर्य ढळलेला माणूस ‘? म्हणजे ? मी काही समजलो नाही. “

तो गृहस्थ हसला. हसण्यातही गूढ असावे असे वाटावे तसा.

मी तिथे बसू नये म्हणून तर त्यांनी मला तसे उत्तर दिले नसावे ? हा विचार मनात येताच मी तिथून उठू लागलो. मी उठतोय हे पाहून तो म्हणाला,

” बस. इथून उठ असे तुला कुणीही म्हणणार नाही. “

” म्हणजे बाबा ? “

” अरे, कबिरानेच सांगितले आहे ना,

” ऐसी जगह बैठीये, कोई न कहे उठ ।’  ही तशीच जागा आहे बघ. इथून उठ असे कोणीही म्हणत नाही. “

” म्हणजे ? कोणीतरी ,कधीतरी इथून उठ असे म्हणेलच ना ? “

” नाही. कुणीच म्हणत नाही. इतकी वर्षे बसतोय मी इथे पण आजवर कुणीसुद्धा म्हणले नाही मला तसे…”

तो बोलायला लागला होता पण त्याच्या पहिल्या गूढ वाक्याबद्दलचे कुतूहल अजूनही माझ्या मनात होते. ‘ सूर्य ढळलेला माणूस.’ त्याचे नंतरचे बोलणे मात्र एखाद्या विचारवंतासारखेच वाटत होते.

” तुला इथून उठवण्यात कुणाचा काही फायदा असेल तरच ते तुला उठ म्हणतील ना ? “

तो पुढे म्हणाला. मनात विचार आला, खरेच जर एखाद्या ठिकाणी आपली अडचण होत असेल तरच आपल्याला तिथून उठवतात. इथे कुणाला आपली अडचण होणार आहे?  झालीच अडचण तर ती त्यालाच होईल.

” तुम्हांला पण माझी अडचण होणार नाही ? “

” मला ? “

तो हसला. स्वतःशीच हसल्यासारखा.

” मला आता माझीच अडचण वाटू लागलीय..  आणि स्वतःला स्वतःची अडचण वाटू लागते ना, तेंव्हा दुसऱ्या कुणाचीच अडचण वाटत नाही. “

” स्वतःला स्वतःचीच कधी अडचण वाटते का बाबा ? “

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments