श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 3 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

चहा घ्यावा असे वाटू लागले पण सूनबाईची चाहूल लागत नव्हती. कदाचित तिला झोप लागली असावी. सुखी आहे. आवाजाच्या एवढया गदारोळातही झोप लागली म्हणजे खरंच सुखी आहे.

खरेच झोप लागलीय की….?

काही वेळाने सूनबाईचा तिच्या खोलीतूनच चिडका आवाज आला तसा टेप खटकन बंद झाला. टेपचा आवाज बंद झाल्यावर सारे कसे एकदम शांत शांत वाटू लागले.

कितीतरी वेळ दुखऱ्या गुडघ्यांना प्रेमाने कुरवाळत बसून राहिलो. निदान त्यांचा तरी काही असहकार नको. तो काही आता परवडण्यासारखा नाही.

” मम्मी, मला चहा…”

नातवाचा आवाज ऐकला. सूनबाईच्या स्वयंपाकघरातील वावरण्याची चाहूल लागली.

आतातरी चहा येईल म्हणून वाट पहात बसलो.

चहाचा कप जवळच्या तिपायीवर आढळून सुनबाई निमूटपणे आत गेली होती.

कपबशीतूचा चहा आणताना बशीमध्ये चहाचा थेंबही सांडलेला मला आवडत नाही. तसे झाले तर पूर्वी

‘ साधा चहाचा कपही आणता येत नाही नीट ? ‘ 

असा मी चिडायचो पण आता काहीच बोललो नाही. अलीकडे चहा असाच मिळतो, निम्मा-अर्धा बशीत सांडलेला.चहाची कपबशी उचलून मुकाट चहा प्यायला सुरवात केली. चहा पिऊन संपायचा होता तितक्यात आतून सूनबाईचा आवाज ऐकू आला. ती नातवाला ओरडून सांगत होती,

” पसारा आवरून ठेव सारा. आमच्या मंडळाची टी पार्टी आहे आपल्याकडे. आत्ता अर्ध्या – पाऊण तासात येतील साऱ्यांजणी..”

हा इशारा आपल्यालाच आहे हे कळलं. तिच्याकडे कुणी येणार असले की तिला आपण घरात नको असतो. आपली अडचण होते.

गुडघे ‘ चदरिया झिनी रे झिनी ‘ आळवत असतात. कुठेही जायची इच्छा नसते पण जायला तर हवंच…  टी पार्टी आहे ना घरात.. सूनबाईची !

‘ बाबा, थांबा ना थोडावेळ. माझ्या मैत्रिणी येणार आहेत तुमची ओळख करून घ्यायला. ‘

सूनबाईचा पूर्वीचा आग्रह आठवला. उगाचंच. मनाला अलीकडे भूतकाळात, जुन्या आठवणीत रमायचा चाळाच लागून राहिलाय.

उठायला हवे. ‘बाहेर पडेस्तोवर चांगला अर्धा तास जाईल.

आता काठी घेण्यासाठी कुणी आठवण करण्याची आवश्यकताच उरलेली नाही, पण आठवणीने घड्याळ मात्र घ्यावे लागते. अलीकडे त्याचे आणि आपले सख्य तरी फारसे कुठे उरलंय ? बऱ्याचदा त्याची आठवणच होत नाही. पूर्वी तसे नव्हते.. मिनिटामिनिटाला त्याची आठवण व्हायची, त्याच्याकडे लक्ष जायचे. त्याच्या गतीबरोबर आपली गती मिळवणे तेंव्हा जमायचं.   ते तसेच चालते.. आपली चाल मात्र मंदावलीय. आता ते कितीही धावत असले तरी आपल्याला फारसा फरक पडत नाही. फक्त फिरायला जाताना आपण आठवणीने हातात बांधतो. आठवण झाली नाही तर ते ही नाही.

” चला, राजे हो !”

मी कुरकुरणाऱ्या, कटकटणाऱ्या गुडघ्यांना म्हणालो. हो. त्यांनी सोबत द्यायलाच हवी ना ?

” सुनबाई, फिरून येतो गं ! “

चपला पायात सरकवता सरकवता जरा मोठ्याने म्हणालो.

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments