जीवनरंग
☆ अ ल क … ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
०१ – अलक
त्या भंगाराच्या दुकानात
त्याला एक गाडी सापडली.
बापाने चाके दुरूस्त करून दिली,
आईने बॅटरी घालून दिली.
आणि मग काय,
गाडीच्या वेगाने
त्याची कळीही खुलली.
०२ – अलक
“निवृत्त ती होत आहे
आणि तणाव तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे.”
“हो तर, तिची नोकरी होती
म्हणूनच मी व्यवसाय करू शकलो.”
०३ – अलक
“मला खात्री आहे, तूच मला वाचवणार”,
शस्त्रक्रिये पूर्वी त्याचा हात हातात
घेऊन माई म्हणाल्या.
“तुझे बारसे जेवले आहे मी.”
त्याला त्याचे बारसे आठवो ना आठवो,
स्पर्श तेवढा विश्वास देऊन गेला.
०४ – अलक
भर पावसातही
ती छत्री तिरकी करून
चालत होती.
तिची अर्धी बाजू
भिजताना पाहून
तिला छत्री सरळ करायला
सांगणार इतक्यात
तिच्या दुसऱ्या बाजूला
तिचा लहान मुलगा दिसला.
०५ – अलक
एकेक फांदी तोडत बसण्यापेक्षा
त्याने थेट झाडाच्या मुळावरच
घाव घालायचे ठरवले.
नकळत एक नेम चुकला आणि
कुऱ्हाडीची आणि पायाची भेट झाली.
लेखक : म. ना. दे.
(होरापंडीत मयुरेश देशपांडे)
जुनी सांगवी.पुणे
+९१ ८९७५३ १२०५९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈