सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ पुनर्जन्म – भाग १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
(‘‘डॉ. मी तुम्हाला ताई म्हणू का?”… तिने अगदी अनपेक्षितपणे विचारलं, आणि डॉ.स्नेहललाही का कोण जाणे, पण लगेच ‘हो’ म्हणावंसं वाटलं.) इथून पुढे —
‘‘ ताई, ती ताईजी मला इथे सोडायला आली होती. पण नंतर परत आलीच नाहीये अजून. ताईजी म्हणजे आम्ही जिथे रहातो, त्या घराची मालकीण. त्या घराला कोठा म्हणतात… मला आठवतंय् तेव्हापासून आम्ही दोघी बहिणी तिथेच रहातो. कारण माझे आईवडील… आमचं घर… यातलं काहीच मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. या ताईजीच्या कोठ्यात २-३ पुरूष माणसं सोडली, तर सगळ्या बायकाच बायका… सगळ्या आपल्याच तो-यात. तिथे एक म्हातारी बाई आहे… मावशी म्हणतात तिला… ती सगळ्यांचं जेवण बनवते. या मावशीचाच काय तो थोडा आधार असायचा आम्हाला… ती रोज आमची आंघोळ उरकायची आणि दोन वेळा मोजकंच् जेवायला द्यायची. बास्. मी थोडी मोठी झाल्यावर त्या कोठ्याच्या लहानशा खिडकीतून बाहेर बघत बसायची… तासन् तास… कारण दुसरं काय करणार ना ?… ना बोलायला कुणी, ना काही शिकवायला, ना खेळायला. शाळेत जाणा-या मुलांकडे मी रोज बघत रहायची. आपणही शाळेत जावं असं वाटायचं मला. एकदा मी ताईजीला तसं बोलूनही दाखवलं होतं… तर तिने मला कसली तरी शिवी दिली आणि इतकी जोरात थोबाडित मारली, की मी हेलपाटत खाली पडले. मग मला तिची जास्तच भिती वाटायला लागली. लहान होते तेव्हा निदान बहीण तरी माझ्याशी काही-बाही बोलायची, माझ्याजवळच झोपायची. पण ती जशी मोठी झाली, तसं तिचं वागणं खूप बदललं. तिथल्या इतर बायकांसारखं नटावं-थटावं असं बहुतेक तिला वाटायला लागलंय्, असं मला वाटायचं. आणि आता ती साडीही नेसायला लागली होती. पण हळूहळू तिचं वागणं विचित्र झालं– जास्तच बदलत गेलं. संध्याकाळ झाली की खूप घाबरल्यासारखी वाटायची. मग तिचं रात्री माझ्यासोबत झोपणं बंद झालं. त्यावेळी ती कुठे जायची, कुठे झोपायची, ते मला कळलंच् नाही तेव्हा. असंच एखाद-दीड वर्ष गेलं असेल… आणि अचानक ती आजारी पडली… सारख्या उलट्या व्हायच्या… जेवण जायचं नाही… पडूनच असायची सारखी. मग ती ताईजी इतकी दुष्टपणे वागायला लागली तिच्याशी… संध्याकाळ झाली की अक्षरश: फरपटत खोलीतून न्यायची तिला बाहेर… आणि मी घाबरून रात्रभर त्या खोलीच्या कोप-यात बसून रहायची. आणि अचानक एक दिवस सकाळी ताईजीने मला बोलावून थंडपणे सांगितलं, की ‘‘ तुझी बहीण ढगात गेली… आता तू तरी नीट वाग… मी सांगेन तसंच. नाहीतर…” – बहीण ढगात गेली म्हणजे आता ती मला कधीच दिसणारही नाही याचं दु:ख जास्त वाटत होतं, की त्या ताईजीची भिती जास्त वाटत होती हे माझं मलाच कळत नव्हतं…”
एव्हाना बेबीचे डोळे पाझरायला लागले होते. डॉ.स्नेहल तर हे सगळं ऐकून फारच हादरून गेली होती. पण कसंतरी स्वत:ला सावरत तिने बेबीला विचारलं… ‘‘ मग बहीण गेल्यावरही तू तिथेच रहातेस का अजून?”
‘‘ हो… जायचं म्हटलं तरी जाणार कुठे? पळून जायचा प्रयत्न केला होता एकदा… कारण मीही आता थोडी मोठी झाले होते. तो कोठा म्हणजे घर नाही आणि तिथे माझं म्हणावं असं एकही माणूस नाही हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं. मरण्याआधीची बहिणीची अवस्था आठवत होती. आई कशाने मेली तेही कानावर पडलं होतं…”
‘‘ काय झालं होतं त्यांना? ”…
‘‘ एडस् का काय ते… आणि त्याच भीतीने बहिणीने जीव दिल्याचंही नंतर कधी तरी कळलं होतं. म्हणून तिथून पळ काढायचा होता मला. पण खाली दारावर चौकीदार बसलेलाच होता. म्हणजे नेहेमीच असायचा. त्याने अडवलं, आणि थेट ताईजीच्या समोर नेऊन उभं केलं. आता आपली अजिबात खैर नाही, आणि इथून सुटकाही नाही हे माझ्या चांगलंच् लक्षात आलं. त्या दुष्ट बाईने चार दिवस मला उपाशीपोटी कोंडून ठेवलं, मी रडरड रडले. पण तिथल्या भिंतींना कुठे कान होते? पाचव्या दिवशी खोलीचं दार उघडून ती मावशी आली. मी तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण ती त्या ताईजीचीच बहीण. तिने मला ढकलूनच दूर सारलं. अर्धा कप गारढोण चहा माझ्यासमोर आदळला, आणि निघून गेली. असेच दिवस चालले होते. काही दिवसांनी मीही वयात आले, आणि ताईजी अचानक माझ्याशी चांगलं वागायला लागली. त्याचं कारण जेव्हा मला कळलं तेव्हा मी फार घाबरून गेले. जीव द्यावासा वाटत होता. पण माझ्या बहिणीएवढी मी धीट नव्हते. माझ्या हातात एकच गोष्ट आहे, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा माझ्या मनाचा दगड झाला जणू… मी थंडपणे संध्याकाळी नटून बसायला लागले… रोज नव्याने मरायला लागले. आणि अचानक एक दिवस मला दिवस गेल्याचं माझ्या लक्षात आलं.”
‘‘ अरे बापरे… मग काय केलं त्या ताईजीने? ” आता डॉ.स्नेहल फारच अस्वस्थ झाली होती…
‘‘ अहो तिला हे कळलं असतं तर तिने काहीतरी केलं असतं ना? ”
‘‘ म्हणजे?”
‘‘ ताई, अहो एव्हाना मीही जरा शहाणी झाले होते. मी आपणहून कुणालाच काही सांगितलं नाही. आणि सुदैवाने मला फारसा त्रासही होत नव्हता. त्यात मी अशी हडकुळी… अशक्त… सहा महिने होईपर्यंत पोटच दिसत नव्हतं… कुणाला शंकाही आली नव्हती. संध्याकाळी नटून बसणंही मी मुद्दामच थांबवलं नाही. कारण मीही अशी मरतुकडी… फारसं कुणी बघायचंही नाही माझ्याकडे… कमी पैसे मोजू शकणारे जेमतेम तिघे-चौघेच आले असतील माझ्याजवळ… आणि त्यावरूनही ताईजीची मी कितीतरी बोलणी खात होते. पण आता तीच गोष्ट माझ्या पथ्यावर पडते आहे, अशी मी स्वत:ची समजूत घालत होते. सातवा महिना लागला आणि मग मात्र मला काही ना काही त्रास व्हायला लागला. सगळ्यांना खरं काय ते कळलं. ताईजीची धुसफूस-चिडचिड सुरू झाली. मला डॉक्टरकडे नेलं. पण आता मूल पाडता येणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं, आणि ताईजीचा नाईलाज झाला. आता नऊ महिने भरेपर्यंत तरी, माझी संध्याकाळ फक्त माझी असेल म्हणून मला आनंद वाटत होता— आणि ताईजी कितीही चडफडली तरी माझ्याबाबतीत नाईलाजाने का होईना पण तिला गप्प बसावं लागत होतं, याचा तर फारच जास्त आनंद झाला होता. पण बघा ना… नशीबच फुटकं… सातवा संपायच्या आतच इथे यावं लागलं…पुढचं तर तुम्हाला माहितीच आहे.”
‘‘हो गं. किती वाईट अवस्था झाली होती तुझी… जगतेस का मरतेस अशी… पण वाचलीस बाई.”
– क्रमशः भाग दुसरा …
© मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२