सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पुनर्जन्म –  भाग ३  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

(‘‘हो गं. किती वाईट अवस्था झाली होती तुझी… जगतेस का मरतेस अशी… पण वाचलीस बाई.”) इथून पुढे —

‘‘ कशाला वाचले असं झालंय मला ताई. त्या बाळाबरोबर माझाही जीव गेला असता तर फार बरं झालं असतं.”

‘‘ असं बोलू नको बेबी. अगं नव्याने जन्म झालाय तुझा असं समज. तुला तुझं बाळ गेल्याचं किती दु:ख होत असेल, ते मी समजू शकते…”

‘‘ छे,छे… त्याचं दु:ख आजिबात होत नाहीये मला…” डॉ.स्नेहलला मध्येच थांबवत ती अगदी तिरीमिरीने म्हणाली. यावर स्नेहल काही बोलणार इतक्यात बेबीच पुन्हा बोलायला लागली…जरा जास्तच ठामपणाने —-

‘‘ अहो अशा बिनबापाच्या… शेंडा ना बुडखा म्हणावं अशा मुलांचं जगणं, म्हणजे जिवंत राहून रोज मरणंच असतं हो… मी स्वत: तशीच तर जगत आलेय् इतकी वर्षं… प्रचंड अगतिक होऊन… माझी आईही तशीच… बहीणही तशीच… आणि मीही… मेलेल्या माणसाचं जिवंत उदाहरण आहे मी… माझ्यानंतर त्या बाळीचा याच लाईनीत नंबर लागला असता की हो, त्यापेक्षा जन्मत:च सुटली … भाग्यवानच म्हणायची …” असं म्हणता म्हणता बेबी रडायला लागली… अगदी घळाघळ अश्रूंचे पाट वहायला लागले. इतके दिवस… नव्हे इतकी वर्ष मनात कोंडलेलं दु:ख, यातना, निराधारपणाची नकोशी आणि अतिशय वेदनादायक जाणीव, असहाय्यतेचा मनावर बाळगलेला प्रचंड दबाव…काय काय सांगत होते ते अश्रू… डॉ.स्नेहलने तिला थांबवलं नाही. नुसतीच तिच्या खांद्यावर…पाठीवर थोपटत राहिली. खरं तर तिला सुचतंच नव्हतं बेबीला काय आणि कसं समजवायचं… कसं शांत करायचं… पण ब-याच वेळाने बेबी आपणहूनच शांत झाली. स्नेहलने तिला पाणी प्यायला लावलं, आणि तिच्यासाठी कॉफी मागवली. आता तिचा चेहरा वेगळाच दिसायला लागला होता… ती हात जोडत स्नेहलला म्हणाली… ‘‘ ताई तुम्हाला एक विनंती करू का?…”

‘‘ अगं बोल ना… काही सांगायचंय् का? ”

‘‘ हो, तुम्ही ना, मला उद्याच इथून जायची परवानगी द्या… म्हणजे मनातल्या मनात द्या… मी इथून गुपचुप पळून जायचं ठरवलंय्…” 

‘‘ पण कुठे जाणार आहेस? ” — बेबीच्या या विचारापासून तिला ताबडतोब परावृत्त करावं असं स्नेहलला त्याक्षणी का वाटलं नाही, हे तिलाही कळत नव्हतं.   

‘‘ कुठेही जाईन… पण पुन्हा त्या ताईजीच्या नजरेलाही पडणार नाही, अशा कुठल्या तरी जागी. मला कल्पना आहे की तिची माणसं कधी ना कधी मला शोधून काढतील… सहजासहजी पैसे मिळवण्याचा मी एक मार्ग आहे ना तिच्यासाठी…”

‘‘ तुला कळतंय का बेबी, त्यांच्या हाती सापडलीस तर तुझे किती हाल करेल ती बाई, आणि तिची माणसं… असला काही वेडेपणा करू नको.”

‘‘ म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय का की मी पुन्हा त्या खाईत जाऊन रोज मरत रहावं… त्यापेक्षा मीच एका क्षणात माझा जीव देईन… माझ्या बहिणीसारखा…” बेबीचा आवाज नकळत चढला आणि डॉ.स्नेहल एकदम चपापली. बेबीला तिचाच संशय यायला लागल्याचं तिला जाणवलं. आता तिला कसं समजवावं हे स्नेहलला कळत नव्हतं. बेबी एकदम तिथून उठून तिरीमिरीने खोलीबाहेर पडली, आणि स्नेहल कमालीची घाबरून गेली. तिने पटकन् बाहेर जाऊन बेबीचा हात घट्ट पकडून तिला पुन्हा कॉटवर आणून बसवलं. ती खूपच अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट जाणवत होतं… स्नेहलची पाठ वळताच ती झटक्यात हॉस्पिटलमधून पळ काढणार, याची स्नेहलला खात्री वाटायला लागली होती…

… आणि क्षणार्धात वीज चमकावी तसा स्नेहलच्या मनात एक विचार चमकून गेला, आणि तितक्याच लगेच त्याचं रूपांतर निर्णयात झालं… बेबीच्या अगदी समोर बसून तिने तिचा हात हातात घेतला, आणि शांतपणे तिला विचारलं… ‘‘ बेबी तुला खरंच त्या नरकातून सुटका हवी आहे ना?” बेबीने मनापासून मान डोलावली. ‘‘ अगं मग त्यासाठी जीव देण्याची काय गरज आहे ? ” 

‘‘ मग दुसरं काय करू शकणार आहे मी, ज्यामुळे माझी तिथून सुटका होईल? ” 

‘‘ माझ्याकडे एक मार्ग आहे. शांतपणे ऐकणार असशील … विचार करणार असशील तर सांगते…” बेबीने आशेने तिच्याकडे पाहिलं… 

‘‘ हे बघ, मी आजच तुला इथून डिस्जार्च देते. पण माझी ड्यूटी संपेपर्यंत तू इथेच थांब. संध्याकाळी माझ्याबरोबर माझ्या घरी चल. मी आणि माझी आई, आम्ही दोघीच असतो घरी. आईला काय सांगायचं ते मी पाहीन. आणि तीही सगळं नक्कीच समजून घेईल, याची मला खात्री आहे. १५-२० दिवस तू माझ्या घरी पूर्ण विश्रांती घे. तोपर्यंत पुढच्या गोष्टींचा नीट विचार करता येईल आपल्याला. आणि एक सांगते… तू आमच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायला हरकत नाही. तू आयुष्यभर सुरक्षित रहाशील, आणि जुनं आयुष्य पूर्णपणे विसरून, एक नवं… वेगळं… ताणमुक्त आणि शांत, समाधानी आयुष्य जगू शकशील, अशी तुझी सोय करण्याची पूर्ण जबाबदारी माझी. तशी सोय नाहीच झाली, तर तू तुला वाटेल तितके दिवस… अगदी कायमचीही आमच्या घरी राहू शकतेस. पण पुन्हा जीव देण्याचा विचार मात्र कधीही मनातसुद्धा आणायचा  नाहीस.”

‘‘ ताई अहो कशाला माझं लोढणं आपणहून गळ्यात बांधून घेताय? माझा काय उपयोग होणार आहे कुणाला?”

‘‘ का नाही होणार उपयोग? माझ्या आईला, मला जमेल तशी मदत कर… जमेल तेवढ्या गोष्टी शिकून घे… अगदी लिहायला, वाचायलाही शीक…आई शिकवेल तुला. आहेस ना यासाठी तयार? पुढच्या आयुष्याचा नीट विचार कर ” बेबीने लहान मुलासारखी मान हलवली…

‘‘ मग झालं तर… चल, आता स्वच्छ आवरून तयार हो. माझी निघायची वेळ झाली की गुपचुप चलायचंस माझ्याबरोबर… आणि हो, इथल्या कुणालाही याबद्दल काहीही सांगायचं नाही… कळलं ? ”… डॉ.स्नेहल शांतपणे खोलीबाहेर पडली .. .. एका अनामिक समाधानाने.  

आणि बेबी … …

बेबीने पाठमो-या स्नेहलकडे बघत हात जोडले… ‘‘ देवा, मला कळत नाहीये की या ताईच्या रूपाने तू अचानक कसा काय प्रसन्न झालास माझ्यावर?.. तेही माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच… तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, आणि फेडू तर मुळीच शकणार नाही.”… आताही तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या, पण त्या होत्या कृतज्ञतेच्या–मन शांत, आश्वस्त आणि  नितळ झाल्याचं द्योतक असल्यासारख्या … आणि नमस्कार करून वर झालेला चेहराही आधीच्या बेबीपेक्षा वेगळाच वाटत होता… एका वेगळ्याच, आत्तापर्यंत कधीच न अनुभवलेल्या आनंदाने, अनोळखी आशेने चमकणारा… जणू पुनर्जन्म झालेल्या बेबीचा. 

— समाप्त —

© मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments