सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
जीवनरंग
पितृपक्ष — अ.ल.क. सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
अलक १-
नातू : आई,आज किती छान जेवण केलं आहेस! आणि किती प्रकार!
नात : आई,आज आजोबांचं श्राद्ध म्हणून हे केलंस ना? ह्यातलं काय आवडायचं आजोबांना?
सून : नाही गं, राणी. मला माहीत नाही. बाबा लहान असतानाच आजोबा गेले. तर मी त्यांना कुठून बघणार? आणि त्यांची आवडनिवड मला कशी कळणार? मी आपली माझ्या मनाने करते आणि कावळ्याला ठेवते. एक ब्राह्मण वाढते. त्यालाच दान करते. पितर तृप्त तर आपण सुखी .
नातू : अग आई, आजी तुला केव्हाची हाक मारतेय. तिला काय हवं ते बघ.
सून : त्यांचं काय? त्यांना किती केलं तरी त्यांचं समाधान नाही. ही म्हातारी स्वतः सुखाने जगायची नाही आणि मला जगू द्यायची नाही .
अलक 2-
सून : माझा चिनू अगदी गुणी आहे. दोन वर्षाचा असला तरी किती समज आहे! माझ्या सुशिक्षित आईच्या तालमीत तयार झाला आहे. नाहीतर इकडे सगळाच उजेड!
मुलगा : उजेड काय आणि सुशिक्षितपणा काय?
आज मी ज्या पदाला आहे आणि तू जी काही कामधंदा न करता ऐशारामात आहेस, ती त्याच अशिक्षित बाईने बाबांच्या मागे केलेल्या कष्टाची फळं आहेत..
14 वर्षानंतर
सून :चिनू इतका गुणी आहे. 10वीचा रिझल्ट लागला. त्याने देवाला पेढे ठेवले. लगेच बाहेर कावळ्याला तीन पेढे ठेवले.
चिनूची आत्या : अग तीन कोणाला?
सून : माझे बाबा, आणि तुमचे आई, बाबा. अगदी न चुकता तिघांची आठवण ठेवतो. माझी शिकवणच आहे त्याला तशी!
चिनूची आत्या : पण आई असताना तर अडाणी बाई म्हणून तिच्या वासवाऱ्याला पण फिरकायचा नाही.
सून : जाऊ दे,अहो ताई, तो इतिहास. गेलेल्या माणसांची न चुकता आठवण ठेवावी अशी माझ्या आईची शिकवणच आहे.
अलक 3-
सून : राजा, जरा थांब ना आता कावळेदादा येतील त्यांनी माम केले की आपण करायचे. तोपर्यंत थांब हा. सकाळी उठून इतका मन लावून स्वयंपाक केला पण कावळ्याचा पत्ता नाही.. सगळीकडे खाऊन सध्या भूक नाही वाटतं, नाहीतर रोज दहीभात ठेवला तरी पटकन येतो.
नणंद : वहिनी, बघ पटतं का? राजाला भरव. सगळ्यांना वाढ. सगळे जेवले कि मग झटकन कावळा येईल. आज नानांचं श्राद्ध आहे. सगळे तृप्त झाले तरच नानांना समाधान. हा तर त्यांचा गुण. जिंदगीके साथ भी आणि जिंदगीके बाद भी जीवन आनंद नव्हे सदानंद (नाना )
आत्या आजी : होय ग सुनबाई, नानाचा पहिल्यापासून स्वभावच तसा. आम्हाला आईवडिलांच्या मागे एखाद्या बहिणीसारखं, आईच्या मायेने वागवले. तो आमचा भाऊ नाही ताई, आई सगळाच.
आणि काय गंम्मत सगळे जेवले आणि कावळा लगेच आला.
जित्याची खोड (गुणदोष )
मेल्याशिवाय काय मेल्यावर पण जात नाही हेच खरं.
अलक ४-
भाऊ : ताई, अजून कसा ग कावळा येत नाही? मला जेवून ऑफिस गाठायचं आहे.
ताई : बाबांना मांसाहारी जेवणाची आवड ना म्हणून कावळा येते नसेल कदाचित. थांब हा मी बघते.
(ताई बाबांच्या फोटोसमोर उभी राहिली. हात जोडून डोळे मिटून म्हणाली “आजची वेळ हे जेवण घ्या. उद्या मटणाचे ताट ठेवीन.”)
आणि काय चमत्कार कावळा पटकन आला.
अलक ५-
फोटोतली आजी, फोटोतच बाजूला आजोबांना सांगते
आजी : आपण खरच भाग्यवान तेव्हा पण जिवंतपणी मुलांनी, सुनांनी, नातवंडानी आपले हसतमुखांनी न कंटाळता केले.
मी इतके दिवस अंथरुणात होते पण कोणी कुरकुरले नाही. आळीपाळीने रजा एडजस्ट करुन आपल्याला सांभाळले. आता पण नातवंडे एकत्र येऊन आपल्या बद्दलच्या आठवणी कश्या काढतात. सुना आपल्या आवडीचे पदार्थ नं चुकता करतात. नाहीतर शेजारी बघा
रानडेकाकूंच्या आजारपणात कोणाला वेळ नव्हता अगदी नातवंडाना सुद्धा. म्हणून २४तासाला दोन बायका ठेवल्या. ते पण रानडे काका, काकूंच पेंशन होते म्हणून.
आणि काकू गेल्यावर काकांची सरळ वृद्धाश्रमात रवानगी चक्क दोन वर्षे. तिकडेच त्यांचे बर्थडे साजरे करणे वगैरे तिकडेच.
आता कालपासून बघा सगळे एकत्र जमले आहेत. काय तर म्हणे त्या निमित्ताने गेट टुगेदर. एरवी कुठे भेटायला मिळते.
पण एखाद्या कोजागिरीसारखे साजरे करतात रात्री डी जे काय? लॉन्ग ड्राईव्हला जाऊन आली सगळी मंडळी. उद्या बाहेर ऑर्डर दिली. म्हणे कुठूनही पितरांची आठवण ठेवली कि झाले.
आपण भाग्यवान तेव्हाही आणि आताही
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈