डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ उपरती— ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
नणंद आजारी होती म्हणून तिला भेटायला निरुपमा हॉस्पिटल मध्ये गेली.
“ निरु,रोज येशील ना ग भेटायला? फार कंटाळा येतो ग इथे पडून पडून.” नणंद तिला म्हणाली.
“ येईन की, त्यात काय…. मस्त आराम कर. लेक यायचाय का सिंगापूरहून?”
“ छे ग !त्याला कुठला वेळ बाई.”
“ बरं.आता छान विश्रांती घे. मी येईन हं उद्या परत. “
निरुपमा लिफ्ट जवळ उभी होती. सहजच शेजारी बघितले, तर ओळखीचा चेहरा दिसला.
“ अग, तू संध्या तर नव्हेस? चारुशीलाची बहीण ? “
“ हो,ग, आणि तू निरुपमा ना? इकडे कशी ? “
“ अग माझ्या नणंदेची मायनर सर्जरी झालीय, तिच्यासाठी येते मी.”
संध्या म्हणाली, “ निरुताई, प्लीज चारूला भेटशील का? तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालाय. लवकरच आला लक्षात,
त्यामुळे काळजीचे कारण नाही. पुढच्या आठवड्यात तिची surgery आहे. भेटशील का तिला?”
निरुपमा विचारात पडली. “ पण तिला चालेल का मी भेटलेले?”
“ भेट. बघ तरी काय म्हणते.”
निरुपमा घरी गेली.जाताना तिच्या डोळ्यासमोर मागचा चित्रपट सरकू लागला—–
कॉलेजचे ते फुलपंखी दिवस. निरुपमा,चारू,पद्मिनी, असा सगळ्यांचा तो सुंदर ग्रुप होता. छान सकाळचे कॉलेज करावे आणि घरी यावे. कोणालाच शिक्षणाची फारशी ओढ नव्हती. लग्न होईपर्यंत डिग्री असावी,म्हणून घ्यायची, हाच विचार. निरुपमा भाबडी, अतिशय सरळ आणि दिसायला सुरेख होती. त्यातल्या त्यात धूर्त चारुच होती. स्वार्थ असेल तिथे चारू नेहमी पुढे. निरुपमाच्या हे लक्षात येत असे, पण ती दुर्लक्ष करायची.‘ जाऊ दे ना,कुठे बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचे,’ असे म्हणून सोडून द्यायची. निरुपमा आणि चारुच्या आर्थिक परिस्थितीतही खूप फरक होता.
निरुपमाचे आईवडील मध्यम वर्गीय तर चारुशीलाचे वडील चांगल्या पोस्टवर होतें आणि या दोघी बहिणीच.
दोघींनाही आपल्या जरा उच्च परिस्थितीचा गर्व होताच.
एकदा पद्मिनीचा लांबचा भाऊ तिच्या घरी आला होता. त्याने निरुपमाला बघितले. पद्मिनीला म्हणाला, “ छान आहे ग तुझी मैत्रीण. दे ना ओळख करून.” –तो दुसऱ्या दिवशी कॉलेजवरच आला. कॅन्टीन मध्ये निरुपमा,पद्मिनी, चारू बसल्या होत्या. पद्मिनीचा हा भाऊ आर्मीमध्ये होता. त्याचा तो रुबाबदार युनिफॉर्म, तलवार कट मिशी बघून मुली तर खुळ्याच व्हायच्या. रवीला– म्हणजे पद्मिनीच्या भावाला हा अनुभव नवा नव्हता. चारुशीला तर सरळसरळ प्रेमातच पडलेली दिसली रवीच्या. पण रवीने तिच्याकडे सरळ दुर्लक्ष केले आणि निरुपमाशी बोलू लागला. चारुशीलाचा जळफळाट झाला. निरुपमाला रवी ‘ सहजच भेटलो ‘ असे भासवत भेटू लागला.
वेडं वय आणि हा रुबाबदार पुरुष आपला अनुनय करतोय म्हटल्यावर निरुपमा खुळावली. त्यांच्या भेटी वाढू लागल्या. पद्मिनीच्या हे लक्षात आले.
“ निरु, काय चाललंय तुझं? रवी बरोबर फार भेटी वाढल्यात वाटतं? माझा लांबचा भाऊ आहे, हे खरं,
पण सावध करतेय तुला. अजिबात धड शिकला नाही, मावशीने आणि काकांनी दिले आर्मीत पाठवून. चांगला बॉडीबिल्डर आहे,म्हणून झालाय सिलेक्ट तिकडे. अगदी सामान्य पोस्ट आहे त्याची. तू मुळीच मागे लागू नकोस ग त्याच्या– बघ बाई. मग नको म्हणू–पद्मिनीने सांगितले नाही.”
त्या दिवशी,ती सहज डेक्कन जिमखान्यावर गेली होती, तर तिला भास झाला की रवी आणि चारुशीला मोटरसायकल वरून चालले आहेत. दुसऱ्या दिवशी तिने चारुला विचारले, तर तिने साफ नाही म्हणून सांगितले.
रवीची सुट्टी संपली आणि तो निघून गेला. जाताना निरुपमाला भेटलाही नाही की सांगितलेही नाही. निरुपमाला अतिशय वाईट वाटले.
सहा महिन्यांनी निरुपमाला पद्मिनीने सांगितले,” निरु, चारुशीलाचे लग्न ठरलंय रवीशी. तुला मी सांगितले होते ना,नुसता खेळवत होता तो तुला. बरोबर चारूने डाव टाकला. त्याला घरी बोलावून, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन केले त्याच्यासमोर. दोघे तसलेच उथळ. मूर्ख कुठले ! उलट तू सुटलीस त्याच्या जाळ्यातून. रडतेस कसली वेडे? बाबा बघतील त्या छान मुलाशी लग्न कर. तुझी या रवीपेक्षा खूप चांगला मुलगा मिळण्याची नक्कीच पात्रता आहे वेडे.
बघ. मी खरी मैत्रीण आहे ना तुझी? माझे शब्द खरे होतील बघ.”
सहाच महिन्यात निरुपमाचे लग्न ठरले–महेंद्रशी. महेंद्र चांगल्या कंपनीत होता, आणि खूप शिकलेला होता।
भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल होता त्याचा. निरूपमाने महेंद्रला भेटून रवीबद्दल सगळे सांगितले.
महेंद्र हसला आणि म्हणाला “ होतं ग असं ! आता नाही ना काही तसलं तुझ्या मनात? जा विसरून ते काफ लव्ह !”
निरुपमाला त्याचा उमदा स्वभाव अतिशय आवडला. नंतर ती तिच्या संसारात रमून गेली. सोन्यासारखी दोन मुले, आणि सोन्यासारखाच महेंद्र, यात ती रमून गेली.
आणि आज किती तरी वर्षांनी तिला चारुशीलाबद्दल समजले. दुसऱ्या दिवशी निरुपमा चारुला भेटायला गेली.
निरुपमाला बघून चारुला धक्काच बसला— “ निरु, तू? तू आलीस मला भेटायला?”
“अग हो चारू. माझी नणंद पालिकडच्याच रूममध्ये आहे. मी सहजच तुझे नाव वाचले रूमवर, म्हणून आले भेटायला तुला. कशी आहेस ग चारू तू ?” चारुच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले—-
“ बघतेच आहेस मी कशी आहे ते. परवा माझे ऑपरेशन आहे. मला खूप भीती वाटतेय ग. निरु, मी तुझी अपराधी आहे.”
” अग वेडे, कसली अपराधी आणि काय– तरुणपणातला वेडेपणा ग तो ! काय मनाला लावून घेतेस? ऑपरेशन झाले की आता मस्त बरी होशील बघ.”
“ नाही निरु,मला बोलू दे. मी मुद्दाम तुझ्यापासून रवीला हिरावून घेतला. मला चांगलेच माहीत होते की त्याला तूच आवडत होतीस. तो तुझ्यावरच प्रेम करत होता .पण मी नाना प्रकारे त्याला भुलवले. पुरुषच तो ! अडकला माझ्या पाशात. मला आसुरी आनंद व्हायचा, तो तुला टाळून माझ्याबरोबर हिंडायचा तेव्हा. पद्मिनीने मलाही सावध केले होते. पण तिच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष केले. आणि लग्न केले रवीशी. पहिले काही दिवस बरे गेले,पण मग मात्र त्याचे खरे रंग दिसले मला. अतिशय उथळ, खर्चिक, दिखाऊ आणि कोणतीही जिद्द नसलेला रंगेल माणूस आहे रवी. मी खूप सहन केले पण माझीही सहनशक्ती हळूहळू संपलीच ग. एका घरात राहतो आम्ही, पण अजिबात प्रेम नाही आमच्यात. आई बाबांनी माझ्या नावावर पैसे ठेवलेत म्हणून निदान त्याच्यावर अवलंबून तरी नाहीये मी. नाही तर कठीण होते माझे. मला आता पक्के समजले आहे की ,कोणाच्याही दुःखावर, तळतळाटावर उभा केलेला संसार सुखाचा होत नाही कधी. देवाने शिक्षा म्हणून माझी कूसही रिकामी ठेवली. सगळ्या बाजूने मी हरले निरु.मला क्षमा करशील ना ग– प्लीज ?” –चारुशीला ओक्साबोक्शी रडू लागली.
निरुपमा तिच्या जवळ बसली. तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, “ काय ग हे वेडे. कुठल्या गोष्टी कुठे नेतेस.
असं काही नाही ग. माझ्या मनात असले काहीही नाही. त्यावेळी मलाही खूप वाईट वाटले होते हे कबूल करते मी.
पण मला महेंद्रसारखा उमदा जोडीदार मिळाला. माझी सोन्यासारखी मुले आणि संसार कोणीही हेवा करावा असाच आहे. आणि आता मी आणि तूही पूर्वीचे सगळे विसरून जाऊ या. लवकर छान बरी होशील तू यातून. हे बघ – आता आपण असले हेवेदावे करायचे वय किती मागे टाकून आलोय ना. पूस बघू डोळे. माझ्या मनात आता काहीसुद्धा नाही ग मागचे कटुत्व. चारू, मी नेहमी तुला शुभेच्छाच देईन. चुकूनही मनात काहीसुद्धा ठेवू नकोस.”
निरुपमा तिच्या खोलीतून बाहेर पडली. तिच्या मनात आले ‘ दैवगती तरी पहा, हे सगळे होण्यासाठी चारुशीलाला कॅन्सरच व्हायला हवा होता का ?’ निरुपमाला अगदी मनापासून खूप वाईट वाटले.
पण तितक्याच मनापासून चारुशीलासाठी प्रार्थना करण्याव्यतिरिक्त निरुपमाच्या हातात दुसरे काय होते?
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈