श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ गुरुदक्षिणा भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
अनुप कालपासून खूप बेचैन होता. काहीही करून त्याला आपल्या गावाला जावेसे वाटत होते. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने गाव सोडले होते, खरे म्हणजे त्याला सोडावे लागले होते, आणि त्यावर त्याने आज ३८ वर्षे झाली तरी परत त्याच्या गावाला पाय लावले नव्हते. पण कालपासून त्याला आपल्या गावाची खूप आठवण येत होती.
हुशार असलेल्या अनुपने त्याची दहावीची परीक्षा मुंबईतच दिली. चांगल्या मार्क्सने पास झालेल्या अनुपला सायन्समध्ये प्रवेश मिळून इंजिनिअर बनता आले असते. पण त्याला गावच्या पाटीलसरांसारखे मास्तर व्हायचे होते म्हणून त्याने आर्ट्सला प्रवेश घेऊन, पुढील शिक्षण पुरे करून पदवी मिळाल्यावर कायद्याचे ज्ञान घेतले आणि वकील झाला. वकिली न करता त्याने पुढे एका शाळेत लहान मुलांना शिकवायला सुरवात केली. तीस वर्षांच्या पुढच्या प्रवासात त्याने कधी मागे वळून बघितले नाही. आपले घर आणि आपला संसार सांभाळून तो आता एका प्रतिष्ठित अशा कॉलेजचा प्रिन्सिपल झाला होता.
काल झालेल्या गुरुपौर्णिमेला त्याला भेटायला आलेल्या विद्यार्थाना बघून त्याला आपल्या गावच्या पाटीलसरांची आठवण झाली आणि तो बेचैन झाला होता. जेव्हा तो मुंबईला आला होता तेव्हा त्याला मुंबईचे काहीच माहित नव्हते. ‘ पाटीलसरांनीच त्यांच्या एका ओळखीच्या तनपुरेकाकांना एक चिट्ठी लिहून, त्यांना भेटायला सांगितले होते आणि तनपुरेकाकांनीच आपली पुढची सगळी सोय केली होती. आपली रहायची, शाळेतल्या ऍडमिशनची, खानावळीची सगळी सोय तेच बघत होते.’ आज एवढ्या वर्षांनी अनुपला आपला सगळा भूतकाळ डोळ्यासमोर येत होता. आपल्या आईवडिलांनी अचानकपणे एकाच वेळेला विहिरीत उडी मारून केलेली आत्महत्या. त्यानंतर १३ दिवसांनी पाटीलसरांनी आपल्याला मुंबईला पाठविणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर येत होत्या. त्यावेळेला आपल्या रहाण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च कोणी केला असेल, ह्या विचाराने तो ग्रासला होता आणि त्याने ठरविले आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही पाटीलसरांकडेच मिळतील आणि त्याने पाटीलसरांना भेटायला गावाकडे प्रस्थान केलं.
अचानक आलेल्या अनुपला सत्तरीच्या आसपास असलेल्या पाटीलसरांनी दारात बघितले आणि ते बघतच राहिले. अनुपने त्यांना विचारले, “पाटीलसर ?” अनुपने त्यांना ओळखले नसले तरी पाटीलसरांनी त्याला ओळखले होते.
“अरे अनुप तू, हो हो , मीच पाटील. आज अचानक कसा गावाकडे फिरकलास. खूप वर्षांनी दिसतोयस. ये ये आत ये. ” पाटील सरांनी त्याला आपल्या छोटेखानी घरात आत यायला सांगितले. अनुपला पूर्वीचे त्यांचे घर काही आठवत नव्हते. त्या घरात मोजकेच सामान होते आणि पाटीलसर एकटेच दिसत होते. आपल्याला एवढ्या वर्षानंतर भेटूनसुद्धा पाटीलसरांनी ओळखले कसे ह्याचे अनुपला आश्चर्य वाटले होते. पाटीलसर सत्तरीला पोचलेले असले तरी शरीराने एकदम फिट दिसत होते. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर घरातल्या पडवीत बसून पाटीलसरांनी बनविलेला चहा घेऊन अनुपने विषयाला सुरवात केली. ” पाटीलसर मला माझ्या बालपणीचे काहीच आठवत नाही. फक्त मी सातवीला असतांना एके दिवशी तुम्ही मला एसटीमध्ये बसवून मुंबईला तनपुरेकाकांकडे एक चिट्ठी घेऊन पाठविले एवढेच आठवते. माझा त्यावेळच्या शिक्षणाचा, जेवणाचा, रहाण्याचा सगळा खर्च कोण करत होते? माझे आईवडील वारले आणि त्यांचे तेरावे झाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही मला मुंबईला पाठविले होते. त्या दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या का केली ? मला काहीच माहित नाही. तेव्हा तनपुरेकाकांना मी खूप प्रश्न केले होते, पण त्यांनीही मला काहीच सांगितले नाही. ते फक्त तुमचा एकच निरोप नेहमी देत की,’ अभ्यास व्यवस्थित कर आणि मोठा हो.’ आज मी एका कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. खूप मुलांना मी गुरुस्थानी असलो तरी माझ्या कायम मनात हेच येत असते की, माझ्या ह्या आयुष्याला मार्ग दिलात तो तुम्ही. लहानपणापासून तुम्ही मला चांगली शिकवण दिलीत आणि दहावीला मला मुंबईला पाठविले. त्यामुळेच आज मला हे यश आणि प्रतिष्ठा मिळाली आहे. सर तुम्ही माझे गुरु आहात. सर आज ह्या तुमच्या शिष्याला मोकळेपणाने सगळे सांगा. त्यावेळी कायकाय झाले होते ते “. अनुपने पाटीलसरांना कळकळीने मनातले सांगितले. पाटीलसर जरा गंभीर झाले.
“अनुप तू मला खरंच जर गुरु मानत असशील तर मी तुझ्याकडे मागेन ती गुरुदक्षिणा मला देशील का ?”
अनुपने लगेच उत्तर दिले, ” सर हे काय बोलणे झाले का ? सर तुम्ही काहीही मागा, मी खरंच देईन.”
पाटीलसरांनी पुढे बोलायला सुरुवात केली, ” ठीक आहे. मला वस्तूरूपात काहीही नको. मला तू फक्त एक वचन द्यायचे आहे की, मी जे काही सांगेन त्यानंतर तू ते फक्त ऐकून घ्यायचे आहे. त्याच्या मुळाशी जाऊन पस्तीस वर्षांपूर्वी गाढलेले मढे परत उकरून काढायचे नाहीस. बदल्याची भावना मनात न आणता तुझ्या भावी आयुष्याची वाटचाल तू चालू ठेवावीस. असे जर मला तू वचन देत असशील तरच मी तुला जे काही घडले ते सगळे सांगेन.”
— क्रमशः भाग पहिला
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈