सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ मी पण लहानच आहे नं?… भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
नमस्ते. माझं नाव अनुनय. मी सात वर्षाचा आहे. आपल्याकडे जर थोडा वेळ असेल, तर मी आपल्याला काही सांगू इच्छितो. आधी मी एकटा होतो. अर्थात माझे मम्मी-पप्पा आणि मी. बस! पप्पा ऑफिसमध्ये जायचे. मम्मीला घरकामातून फुरसत नसायची. मग मम्मी मला शेजारी सोडून यायची. त्यावेळी शेजारी एक मोठं कुटुंब राह्यचं. माझ्यापेक्षा थोडी कमी अधीक वयाची तीन मुले तिथे होती आणि मी चौथा. आम्ही खूप वेळेपर्यंत खेळत राह्यचो. पण जेव्हा त्यांना माझ्याशी खेळायचं नसेल, तेव्हा ती मला घरी जायला सांगायची. आशा वेळी माझ्या मनात यायचं, माझ्या घरीच जर मला लहान भाऊ किंवा बहीण असती, तर मला हवं तेव्हा, हवं तितका वेळ, त्याच्याशी खेळत राहिलो असतो. ही गोष्ट मी किती तरी वेळा मम्मी आणि पप्पांना सांगितली आणि एक दिवस ती आनंदाची बातमी मला मिळालीच. मम्मी म्हणाली, ‘तुझ्याबरोबर खेळणाराही कुणी येणार आहे.’ मी उसळून मम्मीला विचारलं, ’कोण येणार? भाऊ की बहीण?’ मम्मी म्हणाली, ’कोणीही येऊ शकेल.’ आणि एक दिवस विनय आला. एकदम छोsssटा-सा, क्यूट विनय. विनयला पाहून मी एवढा खूश झालो, एवढा खूश झालो की आपल्याला काय सांगू? शाळेतून आलो की दप्तर एका बाजूला टाकून प्रथम विनयकडे जायचो. कधी तो झोपलेला असेल, तर तो जागा होईपर्यंत मी बेचैन असायचो.
दिवसेंदिवस विनय मोठा होऊ लागला. खोड्या करू लागला. त्याने जेव्हापासून चालायला सुरुवात केली, तेव्हापासून त्याच्या खोड्या आणखीनच वाढल्या. जेव्हा मी मम्मी-पप्पांशी याबाबत बोलतो, तेव्हा ते म्हणतात, ‘लहान मुलं असंच करतात’, आणि पुढे सांगतात, ‘जेव्हा तू लहान होतास, तेव्हा तूही असंच करायचास.’ मी सगळं ऐकत, सहन करत राहिलो पण एक दिवस मला विनयमुळे मम्मी-पप्पांकडून खूप ओरडून घ्यावं लागलं. त्याचं असं झालं की मला सुट्टी होती. मी आणि विनयने बरोबरच दूध घेतलं. मम्मीने सांगितलं होतं, की दूध पिऊन झाल्यावर दुधाचा मग नेहमीप्रमाणे बेसीनमध्ये ठेव. मी माझं दूध पिऊन झाल्यावर माझा मग सेंटर टेबलवर ठेवला. समोर टी.व्ही.वर मिकी-माऊस चालू होतं. विनयने दूध संपवलं आणि माझा मगही घेऊन किचनकडे पळत निघाला. माझं लक्ष जाताच, मीही अरे… अरे… करत त्याच्यामागे पळालो. वाटेत कुठे तरी थोडंसं पाणी सांडलं होतं. त्याचा पाय घसरला आणि तो धडमाडीशी फरशीवर आपटला. त्याचे समोरचे दात ओठात घुसले. थोडंसं रक्तही आलं. तो जोरजोरात रडू लागला. त्याचं रडू पाहून किंवा कदाचित् त्याच्या ओठातून आलेलं रक्त पाहून मलाही रडू आलं. दोन्ही मग फरशीवर पडून फुटले होते. पप्पांनी मुद्दाम आमच्या दोघांच्या चेहर्यागचे फोटो-प्रिंट असलेले मग आमच्यासाठी तयार करून घेतले होते. ते फुटल्यावर पप्पा आणि मम्मी दोघेही मलाच ओरडले. मी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की विनयला दोन मग सांभाळता येणार नाहीत, पाडेल, म्हणून मी त्याला थांबवू इच्छित होतो. मी काही त्याला पकडणार किंवा पाडणार नव्हतो. पण दोघेही म्हणाले, मी मोठा आहे, त्यामुळे मीच लक्ष दिलं पाहिजे.
यानंतर माझ्यावर ओरडा खाण्याची वेळ वारंवार येऊ लागली. विनय चुका करायचा आणि ओरडा मला खावा लागायचा. इथपर्यंत ठीक होतं पण पुढे पुढे माझा त्रास वाढतच गेला. पप्पा आम्हा दोघांना खेळणी घेण्यासाठी दुकानात घेऊन जायचे. मी जाणून बुजून खेळणं पसंत करायची संधी विनयला आधी देत होतो. पण घरी गेल्यावर विनयला माझंच खेळणं हवं असायचं. त्याने पसंत केलेलं नाही. पप्पा म्हणतात, ‘मी मोठा आहे नं म्हणून मलाच समजुतदारपणे वागायला हवं. म्हणजे मी विनयला माझं खेळणं नाही दिलं, तर मी समजूतदार नाही. एकीकडे ते मला आपल्या हक्कासाठी लढणार्याा खरोटीची गोष्ट सांगतात आणि दुसरीकडे आपला हक्क सोडून समजूतदारपणा दाखवायला सांगतात. यामुळे मी अतिशय कन्फ्युज होतो. मागच्या वेळी तर हद्दच झाली. विनयचं असलं वागणं बघून मी विनयने जसा पसंत केला होता, तशाच रंगाचा गॅसचा फुगा पसंत केला. घरी आल्यावर विनयने आपला फुगा पप्पांच्या लॅपटॉपवर ठेवला. आणि फ्रीजमधील पाण्याची बॉटल आणायला आत गेला. त्याचा फुगा फुटला. तो पळत बाहेर आला आणि माझा फुगा आपल्या हातात घेत म्हणाला, ’हेsss दादाचा फुगा फुटला. माझा फुगा नाही फुटला.’ माझ्या हातात विनयच्या फुटलेल्या फुग्याच्या चिंध्या पाहून मम्मी आणि पप्पांना वाटलं, माझाच फुगा फुटला. आणि माझा फुगा हातात घेऊन विनय अंगणात खेळायला पळालासुद्धा. माझ्या डोळ्यातील पाणी पाहून पप्पा पुन्हा समजावू लागले, ‘तू मोठा आहेस ना…’
आता माझ्यासाठी नवीन खेळणं खरेदी करण्यात मला काही रुची राहिली नाही. कधी कधी पप्पा खूप आग्रह करतात, म्हणजे माझा वाढदिवस असला किंवा आम्ही जत्रेला गेलो की ते आग्रह धरतात. पण मी मनातल्या मनात हे म्हणत राहतो की हे माझ्यासाठी नाही विनयसाठी आहे कारण विनयपाशी किती का खेळणी असेनात, त्याला माझ्या हातात जे खेळणं असेल, तेच हवं असतं आणि मम्मी – पप्पांना सांगायला गेलं की ते म्हणतात, ‘तू मोठा आहेस नं, तूच समजूतदारपणा दाखवायला हवास.’
आता यासाठीही मी मनाची तयारी केली. परंतु आज-काल एक आणखीनच अडचण उभी राहिलीय. मी माझी खेळणी नीट संभाळून ठेवली होती. अगदी सगळीच्या सगळी. आता मी ती काढून खेळतो. पण आज-काल विनय आपली खेळणी बाजूला ठेवून माझ्या खेळण्यांवर जसा काही तुटून पडतो. नीट चांगलं खेळतही नाही. समजावायला गेलो, तर आपटून आपटून तोडून टाकतो. आपला विश्वास बसणार नाही पण गेल्या काही दिवसात त्याने माझी आठ – दहा खेळणी मोडून तोडून टाकलीत.
क्रमश:…
मूळ हिंदी कथा – ‘ मैं भी तो छोटा ही हूँ न ’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈