सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ भूकंप – भाग 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
आज कितीतरी वर्षांनी, मला कितीतरी जण भेटणार आहेत. किती म्हणजे किती वर्ष झाली बरं? दहा-बारा वर्ष तरी अगदी सहज. हो, सहजच. एमबीबीएस ची चार वर्ष, त्यानंतर एमडी साठी एंट्रन्स ची तयारी करून ती तीन वर्ष आणि नंतर या हॉस्पिटल मधली चार-पाच वर्ष. खरंच ही सगळी वर्षं आपण फक्त काम आणि काम अन काम, अभ्यास एके अभ्यास करत राहिलो. बाकी कशाचाही विचार केला नाही. केला नाही, म्हणून तर इथपर्यंत येऊन पोहोचलो ना!
मी अशी डॉक्टर बनू शकेन याचा विचार काय, स्वप्नही पाहिले नव्हते. त्या वयात असे स्वप्न आणि मी? शक्यच नव्हते. कारण माझी स्वप्नं टोटली वेगळी अन छान होती ना! पंख फुटून आकाशात भरारी मारण्याची होती ती स्वप्नं! सुखद संसाराची होती ती स्वप्नं! त्या माझ्या स्वप्नात खराखुरा राजकुमार होता. नुसता स्वप्नात नव्हता तर मला खरंच भेटला होता. त्याच्यामुळेच तर मी मोरपंखी स्वप्नांमध्ये बुडून गेले होते.
किती सोपे, सरळ, सुखद होते आयुष्य! मी संख्याशास्त्र घेऊन बीएससी झाले आणि माझ्या स्वप्नांचा मार्ग आणखीन सुकर झाला. कारण त्याच वर्षी माझ्या दादाबरोबर तोही इंजिनियर झाला. गलेलठ्ठ पगाराचा जॉबही त्याला मिळाला. दादामुळे त्याची ओळख होतीच, आता तर काय दोन्ही घरच्या संमतीने आमचं लग्न ही पक्क झालं. एकमेकांच्या घरची ओळख होती, माहिती होती, सगळ नक्की झालं होतं. त्यामुळे दादा जॉईन झाल्यावरही आम्ही दोघं भेटत होतो. फिरत होतो. स्वप्न रंगवत होतो.
तो, त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच आमच्या लग्नाची तारीख ठरवली. दोन्ही घरांमध्ये आनंद नुसता ओसंडून वहात होता. आई-बाबांना कशाची म्हणजे कशाची काळजी नव्हती. मलाही फार नवखं, फार परकं, असं काही नव्हतच. त्याची लहान बहिण, तिही माझी मैत्रिण झाली होती.
दोन्हीकडे लग्नाच्या तयारीला उधाण आलं होतं. दोघांकडची घरं रंगवून झाली, पत्रिका छापल्या, वाटूनही झाल्या. पै पाहुणे यायला सुरुवात झाली होती. माझ्या साड्या खरेदी, दागिने खरेदी, नवनवीन ड्रेस, पर्सेस बॅग… सगळं नवीन कोरं. दादाची नवीनच नोकरी असल्यामुळे तो अगदी आदल्याच दिवशी आला. घर पाहुण्यांनी भरून वाहत होतं. चिवडा लाडू घरीच बनवून त्याच्या पिशव्या भरून तयार होत्या. झाडून सगळ्या पै – पाहुण्यांना, मैत्रिणींना, आईच्या माहेरच्यांना भरभक्कम आहेर घेऊन ठेवला होता. गप्पा, हास्यविनोद, चिडवा चिडवी याला उधाण आलं होतं.
आमच्या घराला रोषणाई केली होती. दारात मोठा मंडप घातला होता, तिथं खुर्च्या ठेवून गप्पाटप्पा, चहापाणी मजे-मजेत सुरू होतं. हॉलमध्ये, स्वयंपाक घरात फुलांच्या माळा सोडल्या होत्या. आनंदाला कसं भरतं आलं होतं.
आमच्या घरच्या रिवाजाप्रमाणे आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम झाला. सगळ्यांनी मला चिडवून चिडवून बेजार केलं होतं. मेंदीनं हात भरून रंगले होते. दोन्ही हातांमध्ये हिरवा कंच चुडा खुलून दिसत होता. माझं मलाच आरशात बघताना लाजायला होत होतं. काहीतरी वेगळीच संवेदना सर्वांग फुलवून टाकत होती. त्यात मैत्रिणींचं चिडवणं, सगळं कसं हवं हवंसं, सुखावून टाकणार होतं. आई-बाबा, मैत्रिणी सगळ्यांना सोडून जायची कल्पना डोळ्यात पाणी आणत होती, पण त्याचवेळी त्याची आठवण गुदगुल्या करत होती. त्याची नजर त्याच्याकडे येण्यासाठी खुणावत होती..
क्रमशः – 1
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 9272496385/8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈