श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सगळीकडे गडबड-गोंधळ उडाला होता. सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. शहराच्या प्रत्येक काना-कोपर्‍यातून भयध्वनी गुंजत होता. एकापासून दुसर्‍याकडे, दुसर्‍यापासून तिसर्‍याकडे असं करत कोरोना व्हायरस एलेग्ज़ेंडर नर्सिंग होमच्या उंबरठ्यावर येऊन धडकला होता. तिथे काही वयस्क मंडळी आधीपासूनच बिछान्यावर होती. सीनियर सिटीझनच्या या केअर होम मध्ये  अधिकांश लोक पंचाहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे होते. कुणी हिंडु-फिरू शकत होते, तर कुणी बिछान्यावर पडलेलेच असायचे. आपली दिनचर्या चालवण्यासाठी कुणाला मदतीची गरज नसे, तर कुणीकुणी पूर्णपणे दुसर्‍याच्या मदतीवरच अवलांबून असायचे. कुणी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही बाबतीत अस्वस्थ असायचे, तर कुणी फक्त मानसिकदृष्ट्या. ते चाला-फिरायचे पण असे की जसा काही त्यांच्यात जीवच नाही. त्यांच्याकडे बघताना वाटायचं जीवन तुटून-फुटून गेलय. कसे बसे ते तुकडे गोळा करून ते चालताहेत पण कुठल्याही क्षणी ते विखरून पडतील.

करोनाचा प्रहार सहन करण्याची ताकद या वयस्क मंडळींमध्ये खूपच कमी होती. त्याचा फायदा उठवून व्हायरस,    शहरातल्या अशा प्रकारच्या नर्सिंग होम्सना  आपलं लक्ष्य बनवत होता. आत्तापर्यंत सुरक्षित असलेलं हे नर्सिंग होम आता त्याच्या पकडीत सापडलं होतं. एका मागोमाग एक असे अनेक लोकांचे रिपोर्टस पॉझिटिव्ह येत चालले होते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं जाऊ लागलं होतं. चोवीस तास सरता सरता दहा जणांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या साथीदारांमध्ये निराशा आणि दहशत पसरवत भिंतींना धडकून गोंधळ निर्माण करत होती. मृत्यूचं दृश्य डोळ्यांच्या अगदी जवळ येऊन टकटक करत होतं.

भीती आणि धोके यांच्याशी झुंजत, आणि आपल्या जिवाची काळजी करत इथले कर्मचारी ही परिस्थिती हाताळत होते. कुणी पॉझिटिव्ह झाल्याने घरी एकांतवासात होते, कुणी पॉझिटिव्ह होण्याच्या शंकेने घरी राहू इच्छित होते, पण नाईलाजाने काम करत होते. एका मागोमाग येणार्‍या आशा बातम्यांनी रोझा विचलित झाली होती. आपला शेजारी स्टीव्हबद्दलच्या बातमीची उतावीळपणे वाट बघत होती.

जीवनातले शहाऐशी वसंत पार केलेल्या रोझावर मृत्यूच्या बातम्यांचा आतंक आशा तर्‍हेने पसरला होता, की टी.व्ही.च्या स्क्रीनवरून  तिची नजर हटतच नव्हती. गेली दहा वर्षे हे नर्सिंग होम हेच तिचं घर होतं. गेले काही दिवस इथले कर्मचारी आशा तर्‍हेने घाबरत घाबरत आपले काम करत होते, जसे काही बिछान्यावर पडलेले हे लोक, त्यांच्यासाठी मृत्यूचा संदेश घेऊन उभे आहेत. सगळ्यांनी आपल्याला पूर्णपणे कव्हर केलं होतं. कळतच नव्हतं कोण कोण आहे. काम करणारे त्यांच्या अवती-भवती रोबोटप्रमाणे वावरतील, अशी स्थिती आत्तापर्यंत कधीच आली नव्हती.  हलक्या निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक कव्हरमध्ये झाकलेले किंवा असं म्हणता येईल की प्लॅस्टिक गाऊन घातलेले , हातात हातमोजे, तोंडावर मास्क असे सगळे सजलेले होते. चष्म्याच्या मागे लपलेल्या डोळयांशवाय त्यांचं काहीही दिसत नव्हतं.

नर्सिंग होम ची रिसेप्शनिस्ट सूझन आली आणि तिने दिवंगत झालेल्या व्यक्तींची नावे सांगितली. त्यात स्टीव्हचं नावही होतं. रोझाच्या डोळ्यांच्या पापण्या जशा काही उघड-झाक करायच्या विसरूनच गेल्या.  अनेक स्नेह्यांबरोबर तिचा खास मित्र  स्टीव्हही तिला सोडून गेला होता. ती दोघे नेहमी गप्पा मारत. दोघांनीही इथलं जीवन खुशीने स्वीकारलं होतं. आता कुणालाही आपला परिवार, मुलं-बाळं यांची प्रतीक्षा नव्हती. दोघेजण एकमेकांचे चांगले साथीदार झाले होते.

त्या मोठ्या खोलीत चार पलंग होते. एका बाजूने दुसर्‍या बाजूपर्यंत कापडाचा पडदा होता. ती त्यांच्या खोलीची सीमा होती. त्यांचं आपलं घर होतं. कोण कुणाच्या चार भिंतींच्या आत डोकावत नसे. बसून बसून, झोपून झोपून बोलायचे. मोठमोठ्याने हसायचे. लंच-डिनरच्या टेबलवर एकमेकांची सोबत करायचे आणि फिरायलाही बरोबर जायचे.

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments