जीवनरंग
☆ भूक….भाग १ ☆ मेहबूब जमादार ☆
माणसांच पोट रिकामं राहिलं कि ते त्याला स्वस्थ बसू देत नाही.भले ती भूक राजाची असो वा सामान्य जनतेची. भूक ही भूकच असते.पण घरात अन्न नाही.घर आहे पण रिकामे.कुठल्याही डब्यात खायला काहींच शिल्लक नाही. डोक्यानं काम करून नको त्या कल्पनांचा विस्तार करून काय पोट भरत नाही. गेले दोन महिने ‘मुदूल’ टेकडीवरील ब-याच कुटूंबांच असच चाललं होतं. या टेकडीवर राहणा-या सनखंबे कुटूंबाची हीच हालत होती.मूळात देशच कर्जात वाकला होता, बुडाला होता. कर्ज भागवायचं सोडा,मूळात व्याज द्यायला ही पैसे नव्हतें. तिथं या सा-या कुटूंबांच तरी काय होणार?.
सकाळीच अर्जुना सनखंबेचा मुलगा दिशान मोटर सायकल घेवून जवळच्या शहरातील पेट्रोल पंपावर तेल भरण्यासाठी गेला होता. दुपार टळून गेली तरी त्याचा पत्ता नव्हता.न खाता गेलेला पोर केंव्हा येणार याची चिंता अवघ्या कुटूंबाला लागून राहीली होती.आज घरात फक्त भात केलेला होता. आमटीसाठी कांहीच नव्हतं.
त्या टेकडीवर जेमतेम तीसभर घरं होती.किराणा मालाची दोन दुकानं होती. तीपण ओस पडली होती.दुकानांत मालच नव्हता. माल आणायला पैसे नव्हतें. शहरात जावूनही माल मिळत नव्हता. किरकोळ माल आणून त्यानीं कांही दिवस चालवले.आतां त्यानां शटर ओढून दुकान बंद ठेवणेची वेळ आली होती. प्राप्त परिस्थिती पुढे कांही ही पर्याय शिल्लक राहिला नव्हता.
गाववाल्यांची चिंता दुकान बंद असलेने वाढली होती. दुकानात माल नव्हता हे जरी खरं असलं तरी माल घ्यायला कोणाकडे पैसेही नव्हतें. अख्ख्या देशाला महागाईनं व मालाच्या टंचाईनं ग्रासलं होतं.त्यात तो तरी बिचारा काय करणार?
ब-याचदा शहरातील लोक रस्त्यावर उतरत.सरकार विरोधी घोषणा देत.रणरणत्या ऊन्हात रस्त्यावर गर्दी व्हायची.खुद्द सरकार यावर कांही करू शकत नव्हतं.त्याचबरोबर आंदोलने,मोर्चे काढून काय भूक भागत नव्हती.
दुपार टळली होती.कांही वेळात दुशांत टेकडीवर चढतानां दिसला.सोबत मोटर सायकल नसलेचे पाहून त्याच्या पप्पाचं डोकचं फिरलं.गेले पंधरा दिवसात हा आठवा फेरा होता तरीही त्याला तेल मिळालेलं दिसत नव्हतं.उलट शिल्लक असलेलं तेल मोटर सायकलनं खाल्लं होतं.त्यामुळें दुशाननं गाडी टेकडीखाली लावलेली होती. तो जवळ आला तसं पप्पांनी विचारल,
” आरं गाडी कुठं हाय?”
“दादा खाली लावल्या तुमच्या दोस्तांच्या सपरांत.तेल तिथंच संपल.गाडी लॅाक करून आलोय”
“आरं आज भी तेल मिळालं नाय?”
“नाय मिळालं.पंपात होतं तेवढं तेल मिल्ट्रीवाल्यांच्या गाडीत टाकून मालक मोकळा झाला.”
“मगं कसं करायच रं!कुठं तातडीनं जायचं म्हणजे……!”
“आता कुठं जायाच दादा!खिसं मोकळं झाल्यात.दुकानं ओस पडल्यात..रस्त निवांत पडल्यात.”
“ते भी तूझं खरं हाय.पण कुणाला दवा पाणी लागलं तर?”
“कशाचं औषध आणताय दादा!.बाहेर परिस्थिति वाईट हाय.गॅसचा हंडा चार हजार रुपये तर साखर दोनशे रु.किलो.काय घेताय अन काय खाताय…..”
“आरं अशानं कसं व्हायचं? डोकं चालायचं बंद झालंय बघ.”
दुशान थोडावेळ थांबला.कांहीवेळानं तो म्हणाला,
“हे बघा पप्पां,रात्री तुमच्या दोन्ही भावानां बोलवा.बसू सगळी.बिनपैशानं कसं जगता येईल असा कांहीतरी मार्ग शोधला पाहिजे”
क्रमशः…
© मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈