जीवनरंग
☆ भूक….भाग ३ ☆ मेहबूब जमादार ☆
(प्रत्येकाच्या डूईवर न फिटावं असं कर्ज करून ठेवलं होतं. एरव्ही मंत्री होण्याकरिता हपापणारे राजकारणी मंत्री व्हायला तयार नव्हती.एवढा मोठा रोष जनतेचा त्यांच्यावर होता.) इथून पुढे वाचा…
सरकारनं अंमलात आणलेल्या सर्व योजना फसव्या होत्या हे जनतेला कळून चूकलं होतं.आता कळून कांहीही उपयोग नव्हता.
तेल, गॅस मागवावा तर तेवढं परकिय चलन देशाकडं नव्हतं.जे काय थोडं फार होतं त्यानं पांच टक्के जनतेच्या गरजा भागत नव्हत्या.साहजिकच मागणी जादा अन पुरवठा कमी असला तर हवी ती किंमत देवून जनतेला ती गोष्ट खरेदी करणं भाग होतं.
गोरगरीब, सामान्य माणसांच्या हातापलीकडच्या नव्हे तर बुध्दी पलीकडच्या गोष्टी आता घडत होत्या.
पण दुशाआजीनं काढलेल्या साध्या उपायामूळे सनखंबे कुटूंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालू होता.चहा पिणं ही चैनीची बाब होवून बसली होती. ते रहातेल्या गावापलीकडंच्या टेकडीवर चहाचे मळे होते.चहा होता, दुध होतं पण साखर नव्हती.गूळ नव्हता.त्यामूळेच चहा पिणं शक्य नव्हतं.मूळात चहानं भूक शमत नव्हती.
आज आरोग्य केंद्राकडील एक नर्स दुशा आजीकडं आलीवती.
“कसं काय आजी बरं वाटतय नां?”
” ये बाय तुला विचारतानां तरी काय वाटतंय का गं?”
“आज, असं का बोलता वो आजी!”
“अगं!तूला काय सरकारी पगार मिळतोय.सारं मिळतय ….तुझं काय?…..”
”आजी खरं सांगू…गेले सहा महिने पगार मिळाला नाय.आरोग्य केंद्रात नांवाला एक गोळी नाय.तिथं जावून तरी काय करायचं म्हणून मी फिरत फिरत तुमच्याकडे आले.”
“खरं म्हणतेस का?”
“काय करू आजी!”
बोलतानां तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं.
आजीच्या लुकलुकणा-या डोळ्यांत ढग दाटून आले.
“अगं गेल्या नव्वद वर्षात असं कधी घडलं नव्हतं.माणसं अन्नाला महाग झालेली मी कवा पाहिली नव्हती.”
नर्सच्या तोंडातून शब्द फूटनां. शेवटी रडत रडत ती बोलली,
“काय करू आजी! एकतर पोरं लहान आहेत.त्यानां दुधही मला देता येईनां”
एवढं बोलून ती हमसून रडू लागली.आजीनं काप-या हातानं तिचं डोळं पुसलं.
“आजी काय करू! जगनं अगदी नकोस झालंय.दोन लेक हायत.एक तीन वर्षाचा अन एक पांच वर्षाचा”
“नको गं बाई,असलं मनांत आणूस.” परत ती आभाळाकडे डोळं करून म्हणाली,
“बघ देवानं दोन सोन्यासारखी लेकरं दिलीत.तोच सगळ्यांचं रक्षण करील.बघ होईल कायतरी.”
तिनं सुनेला हाक मारली.
“अगं अने,या नर्सबाईनां एक बाटलीभरून दुध दे गं.तिचीपण लेकरं लहान हायती”
नर्स नको म्हणत असतानां दूशा आजीनं प्लॅस्टिक च्या बाटलीतून आणलेलं दूध तिच्या पिशवीत कोंबलं.
नर्सनं दुशाआजीला नमस्कार केला.तिनं भरल्या डोळ्यानी दुशाआजीचा निरोप घेतला.
तीन चार वर्षामागं पर्यटनांसाठी बाहेर पडणारी माणसं खूडूक होवून खुराड्यात बसली होती. ना हाती पैका होता ना गाडीत भरायला तेल.माणसानं आकाशाकडं पहाण्याशिवाय त्याच्याकडं कांहीच शिल्लक नव्हतं.
सगळाच रोजगार गेला होता. दुकानं बंद होती. त्यात आलेल्या कोरोनानं मूळात जनतेची वाट लावली होती. आता जरा कुठं उभारी आली होती. तर कर्जाच्या खाईत ऊभा देश उध्वस्त झाला होता. यावर कुठलाच उपाय वा पर्याय शिल्लक राहिला नव्हता.माणूसकी जपण्याला पैसा लागत नाही पण पोट भरायला पैशाशिवाय कांही चालत नाही हे त्रिकाल सत्य होतं.
क्रमशः…
© मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈