श्री राजीव गजानन पुजारी
जीवनरंग
☆ आर्यनची नौका – एक विज्ञान कथा…भाग 1 ☆ श्री राजीव ग पुजारी ☆
किर्लोस्करवाडी ! किर्लोस्कर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी असलेली एक वसाहत. ३५०-४०० घरांची एक अतिशय टुमदार टाऊनशीप. हॉटमिक्सचे सुंदर डांबरी रस्ते. एक मुख्य रस्ता व त्यापासून निघालेले प्रत्येक गल्लीत जाणारे उपरस्ते. वसाहत तशी स्वयंपूर्ण. किराणा मालाचे दुकान, रोज सकाळी भरणारी भाजी मंडई, जवळील रामानंदनगरहून रोज येणारा दूधवाला, कर्मचारी व त्यांच्या मुलांसाठी आधुनिक व्यायामशाळा, त्याला लागूनच सेमी ऑलिंपिक मापाचा जलतरण तलाव, लहान मुलांसाठी बालोद्यान, केबल टी. व्ही., सोशल क्लब, बालवाडी ते बारावीपर्यंत शाळा, शाळेशेजारी मारुती मंदिर, त्याच्या शेजारी आखाडा, एक टुमदार विठ्ठल मंदिर, नव्याने बांधलेले गणेश मंदिर, क्रिकेटचे मैदान आणि ग्रामदैवत मायाप्पाचे मंदिर. थोडक्यात काय तर पृथ्वीवरील स्वर्गच ! अत्यंत खेळीमेळीचे वातावरण. पूर्ण गांव म्हणजे एक कुटुंबच जणू ! सर्व ग्रामस्थ सुशिक्षित. त्यामुळे शिक्षणाचे वातावरण. शाळेचा दहावीचा व बारावीचा निकाल १००% ठरलेलाच !
राजेंद्र जोशी व त्यांची पत्नी राजश्री हे येथील एक कुटुंब. राजेंद्र मेंटेनन्स विभागात इंजिनियर, तर राजश्री इतिहास विषयात पोस्ट ग्रॅज्युएट. त्या कॉलनीतील शाळेतच इतिहास विषय शिकवितात. आर्यन त्यांचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासूनच अत्यंत हुशार. दहावी बारावीला बोर्डात प्रथम आल्यावर आय.आय.टी. मुंबईमधून मेकॅनिकल इंजिनीअरींगमध्ये बी. टेक. डिग्री गोल्ड मेडलसह मिळविलेला मुलगा. लहानपणापासूनच अंतराळ विज्ञानाची अतिशय आवड. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आखलेल्या सर्व कार्यशाळांमध्ये त्याने भाग घेतला होता. अंतराळयान, प्रक्षेपक, रोव्हर्स, लँडर्स यांच्या पुठ्ठे, थर्माकोल यांपासून प्रतिकृती बनविण्यात त्याचा हातखंडा. केवळ अभ्यासातच नव्हे तर विविध खेळ, वक्तृत्व यांमध्येसुद्धा तरबेज. वाचनाची व भटकंतीची अत्यंत आवड. बी. टेक. झाल्यावर त्याने अमेरिकेतील जगप्रसिद्ध कॅलटेक् विद्यापीठातून अंतराळ विज्ञान क्षेत्रात एम्.एस्. व नंतर डॉक्टरेटही तेथूनच केली. एम्.एस्.करत असतांना नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीत अनेक प्रोजेक्टस्मध्ये नामवंत शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. डॉक्टरेट झाल्यावर नासाकडून आलेली गलेलठ्ठ पगाराची ऑफर नाकारून त्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’मध्ये काम करायला सुरुवात केली.
किर्लोस्करवाडीमध्ये राजेंद्र जोशी कुटुंबाशेजारी मनोहर देशपांडे यांचे कुटुंब रहात होते. मनोहर प्रोडक्शन विभागात इंजिनिअर, तर त्यांच्या पत्नी सौ. मानसी गृहिणी. दोन्ही कुटूंबांमध्ये अतिशय घरोब्याचे संबंध. मधुरा त्यांची एकुलती एक कन्या. देखणी, हुशार, अतिशय लाघवी. मधुराला लहानपणापासूनच शुद्ध विज्ञानात रस होता. दहावी बारावीला बोर्डात आल्यानंतर तिने इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, बेंगलुरू येथून पदार्थविज्ञानात एम्एस्सी व नंतर एस्ट्रोफिजिक्समध्ये डॉक्टरेट केले. त्यानंतर तिनेही वैज्ञानिक म्हणून इस्रोमध्येच काम करायला सुरुवात केली. विकास इंजिन, जी. एस्. एल्. व्ही.- मार्क II प्रक्षेपक आदि बनविण्यात दोघांचाही सिंहाचा वाटा होता.
किर्लोस्करवाडीमध्ये शेजारी शेजारी रहात असल्याने आर्यन व मधुरा यांचे एकमेकांकडे जाणे येणे होतेच. राजश्री वहिनींनी कांही वेगळा पदार्थ केला तर त्या मधुराला आवर्जून बोलावत. मानसी वहिनीही आर्यनच्या आवडीचे काही केले तर मुद्दाम त्याला बोलावत. नाटकातसुद्धा अनेकदा त्यांनी एकत्र काम केले होते. शाळेच्या गॅदरिंगमध्ये दोघांना ‘मेड फॉर इच ऑदर’, ‘एक दुजे के लिये’ असे फिशपॉंड्स पडत. बेंगलोरला इस्रोत कामास लागल्यावर कामानिमित्त दोघांचे एकमेकांकडे जाणे होई. दोघांनाही एकमेकांच्या कामातील हुषारी व कामाप्रती असलेली समर्पित वृत्ती यांविषयी आदर होता. हळूहळू आदराची जागा प्रेमाने घेतली. एके दिवशी इस्रोच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान आर्यनने मधुराला रीतसर, एक गुढगा टेकून गुलाबाचे फूल देऊन प्रपोज केले. घरच्यांचा काही प्रश्नच नव्हता. एका शुभ मुहूर्तावर सांगलीतील एका नामवंत मंगल कार्यालयात दोघांचे शुभमंगल पार पडले. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात आठवडाभर राहून दोघे कामावर रुजू झाले.
क्रमशः भाग पहिला…
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈