श्री राजीव गजानन पुजारी
जीवनरंग
☆ आर्यनची नौका – एक विज्ञान कथा…भाग 3 ☆ श्री राजीव ग पुजारी ☆
( तसेही पूर्ण ग्रहाभोवती एखाद्या पदार्थाचे आवरण घालणे व्यवहार्य वाटत नाही. त्यामुळे आपणास दुसरा उपाय शोधावा लागेल.) इथून पुढे —-
वातावरणाचे पुनरुज्जीवन केल्यानंतर पुढची पायरी म्हणजे, मंगळाच्या वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढविणे, जेणेकरून मनुष्याला विनाऑक्सिजन सिलिंडर व मास्क मंगळावर वावरता येईल. यासाठी एक उपाय म्हणजे, सध्या प्रायोगिक स्वरूपात असणाऱ्या ‘मॉक्सि’ उपकरणासारखी, पण त्यापेक्षा जास्त क्षमतेची उपकरणे मंगळावर वेगवेगळ्या ठिकाणी बसविणे, त्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे विघटन होऊन श्वसनयोग्य असा प्राणवायू पूर्ण मंगळभर उपलब्ध होईल. पण मंगळाचे क्षेत्रफळ पाहता हा उपाय व्यवहार्य वाटत नाही. दुसरा उपाय म्हणजे सूर्यप्रकाश व पाणी यांच्या उपस्थितीत प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बन डाय ऑक्साइड घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडणारे ‘सायनोबॅक्टेरिया’ जीवाणूंचे कंटेनर्स मंगळावर नेऊन हेलिकॉप्टरद्वारे वेगवेगळ्या पाणथळ भागांमध्ये पसरणे. यामुळे वातावरणातील प्राणवायूची उपलब्धता वाढेल. काही सुधारणांसह हा उपाय योग्य वाटतो.
प्राथमिक अहवाल तयार करतांना सौ. मधुरा जोशी यांनी प्रत्येक गटाला मार्गदर्शन करण्याचे व सर्व गटांमध्ये समन्वयाचे काम उत्तमरित्या केले.
सर्व गटांनी श्री.आर्यन जोशी यांचेसमोर प्राथमिक अहवालाचे सादरीकरण केले. आर्यनने प्राथमिक अहवाल वेळेत सादर केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले. त्यानंतर त्यांनी तीनही गटांना मंगळाच्या चुंबकीय क्षेत्राचे पुनरुज्जीवन, मंगळावरील तापमान वाढवून मंगळाच्या वातावरणाची घनता वाढविणे आणि मंगळावरील प्राणवायूचे प्रमाण श्वसनयोग्य करणे, यासाठीचे अंतिम शास्त्रीय व व्यावहारिक उपाय आणि त्यांना येणारा खर्च यांचा अहवाल तयार करण्यास सांगितले. त्यासाठी मुदत ठरली एक वर्ष.
तीनही गट झडझडून कामाला लागले. संगणकीय सिम्युलेशन्स, वेगवेगळ्या संकल्पनांप्रमाणे प्रतिकृती (प्रोटोटाईप) तयार करून त्यांच्या चाचण्या घेणे, यांत तीनही गट मग्न झाले. सौ. मधुरा जोशी यांनी तर अक्षरशः रात्रीचा दिवस केला. श्री.आर्यन जोशींचे सर्व कामावर बारीक लक्ष होते. एक वर्षानंतर तीनही गटांची बैठक श्री आर्यन जोशी यांच्या उपस्थितीत झाली. तिन्ही गटांनी आपापली सादरीकरणे केली. सौ. मधुरा जोशी यांनी तीनही गटप्रमुखांना सादरीकरणाची संधी दिली.
पहिल्या गटातर्फे श्री अश्विन मल्होत्रा यांनी मंगळाचे चुंबकीय क्षेत्र कसे पुनःस्थापित करावे याविषयी सादरीकरण केले. ते म्हणाले, “आपण प्राथमिक अहवालाच्या चर्चेमध्ये म्हटलेच होते की, मंगळाचे चुंबकीय क्षेत्र पुनःस्थापित करण्यासाठी मंगळाचा गाभा वितळविणे किंवा पूर्ण मंगळाभोवती विद्युतचुंबकीय आवरण बसविणे या दोन्ही गोष्टी व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहेत. त्याऐवजी एक डायपोल चुंबक मंगळ व सूर्याच्या L1 बिंदूत स्थापित करणे शक्य आहे. हा ‘डायपोल’ चुंबक असा असेल जो मंगळाभोवती एक ते दोन टेस्ला ताकतीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. याला आपण चुंबकावरण (मॅग्नेटोस्फिअर) म्हणूया. हे चुंबकावरण अंतरिक्ष प्रारणे व सौर वादळांना परतवून लावेल. (L1म्हणजे लॅगरेज बिंदू क्रमांक एक. अंतराळातील दोन मोठया गोलकांमध्ये असे काही बिंदू असतात, जेथे त्या मोठया गोलकांचे गुरुत्वाकर्षण व केंद्रापसारक शक्ती (सेंट्रिफ्युगल फोर्स) एकमेकांना तोलून धरतात. मंगळ व सूर्य यांच्यातील L1 बिंदू हा मंगळभूपृष्ठापासून १०,००,००० कि. मी. अंतरावर आहे.) सौर वादळांना परतवून लावल्यामुळे मंगळावरील वातावरणाचा ऱ्हास होणार नाही. डायपोल चुंबक एका उपग्रहावर बसवलेला असेल. अशा प्रकारचा उपग्रह व डायपोल मॅग्नेट बनविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल व खर्च आठशे कोटी रुपये येईल.”
मंगळावरील तापमान कसे वाढवता येईल, याविषयी के. नागप्पा यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले, “आपण सर्वांनी प्राथमिक अहवालात पाहिलेच आहे की , मंगळाचे तापमान वाढविण्यासाठी मंगळाजवळ अणुस्फोट घडविणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. तसेच पूर्ण मंगळाभोवती ऐरोजेलचे आवरण बसविणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. त्याऐवजी मंगळाच्या भूस्थिर कक्षेत त्याच्या ध्रुवाजवळ १२५ कि. मी. त्रिज्येची ऍल्यूमिनिमचा पातळ थर दिलेली ‘PET’ (पॉलिइथिलीन टेरेफ्थालेट) फिल्म प्रस्थापित केली, तर ती आरशासारखे काम करेल व सूर्याकडून येणारी ऊर्जा मंगळाकडे परावर्तित करेल. त्यामुळे मंगळाचे तापमान वाढण्यास थेट मदत मिळेल. यामुळे ध्रुव प्रदेशातील गोठलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचे वायूत रूपांतर होईल. त्यामुळे हरितगृह परिणाम होऊन मंगळाच्या भूपृष्ठावरील तसेच वातावरणातील उष्णता अंतराळात उत्सर्जित केली जाणार नाही. तसेच ध्रुव प्रदेशातील, जमिनीखालील व खडकांच्या भेगांतील गोठलेले पाणी द्रवरूप होऊन नद्या, नाले, तलाव दुथडी भरून वाहतील. उष्णतेमुळे नद्यांतील पाण्याची वाफ होऊन ती वातावरणात उंच जाईल व थंड हवेने द्रवरूप होऊन पावसाच्या रूपाने ती खाली येईल व ऋतूचक्र सुरु होईल. सुरुवातीला ही PET फिल्म घडी केलेल्या स्थितीत एका उपग्रहावर बसवलेली असेल. मंगळाच्या भूस्थिर कक्षेत उपग्रह स्थापन झाल्यावर ती उलगडेल. ही फिल्म व उपग्रह बनविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल व खर्च एक हजार कोटी रुपये येईल.”
मंगळावर ऑक्सिजनचे प्रमाण कसे वाढवता येईल याचे सादरीकरण श्री अँथोनी डिसोझा यांनी केले. ते म्हणाले,
“प्राथमिक अहवालात म्हटल्याप्रमाणे मंगळावर सायनोबॅक्टेरिया जीवाणूंचे रोपण पाणथळ जागांवर करून हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढविण्याचे आम्ही ठरविले आहे. पण आम्ही एक गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे या जीवाणूंचा जीवनकाल जेनेटीक सायन्सच्या मदतीने आम्ही वाढविणार आहोत. तसेच त्यांचा विभाजनाचा कालावधी आम्ही कमी करणार आहोत. आणखी एक गोष्ट आम्ही करणार आहोत ती म्हणजे, प्रकाश संश्लेषण करून प्राणवायू उत्सर्जित करण्याची त्यांची क्षमता आम्ही अनेक पटीने वाढविणार आहोत. म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईडचे रूपांतर प्राणवायूत करण्यास लागणारा वेळ आम्ही कमी करणार आहोत. आपले यान मंगळावर उतरल्यानंतर एक वर्षाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हे जिवाणू पाणथळ जागांवर पसरवण्यात येतील. डायपोल मॅग्नेट उपग्रह L1 कक्षेत प्रस्थापित केल्यानंतरसुद्धा पूर्वीची सौर वादळे व अंतरिक्ष प्रारणांचा परिणाम कमी होण्यासाठी, तसेच मंगळाच्या भूस्थिर कक्षेत PET फिल्मवजा आरसा बसवून मंगळाचे सरासरी तापमान ५° सेंटीग्रेड होण्यासाठी व मंगळावरील गोठलेले पाणी द्रवरूप होण्यासाठीही एक वर्षाचा कालावधी लागेल,असे मधुरा जोशी मॅडमच्या संगणक प्रारूपावरून सिद्ध झालं आहे. त्यामुळेच सायनोबॅक्टेरिया जीवाणूंचा वापर आम्ही यान मंगळावर उतरल्यानंतर एक वर्षाने करणार आहोत. जिवाणूंमध्ये जनुकीय बदल करण्यासाठी दोन वर्षे लागतील व दोनशे कोटी रुपये खर्च येईल.”
तिन्ही अहवालांचा गोषवारा आणि समारोप सौ. मधुरा जोशी यांनी केला. त्या म्हणाल्या, ” डायपोल मॅग्नेट L1 कक्षेत बसवल्यावर चुंबकावरण तयार होईल. त्यामुळे सौर वादळे व अंतरिक्ष प्रारणे मंगळापर्यंत पोहोचणार नाहीत. पण पूर्वीची सौर वादळे व अंतरिक्ष प्रारणांमुळे दूषित झालेले वातावरण सामान्य होण्यासाठी साधारण एक वर्ष लागेल. PET फिल्म मंगळाच्या भूस्थिर कक्षेत बसविल्यानंतर मंगळाचे सरासरी तापमान ५° सेंटीग्रेड होण्यासाठी सुद्धा तेव्हढाच कालावधी लागेल. या सर्वांत ब्रेक थ्रू असे संशोधन आपणास करायचे आहे, ते म्हणजे सायनोबॅक्टेरिया जिवाणूंची प्रकाश संश्लेषण करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढविणे. म्हणजेच कार्बन डाय ऑक्साइड वायू घेऊन प्राणवायू बाहेर सोडण्यास लागणारा वेळ अनेक पटीने कमी करणे, जेणेकरून मंगळावरील हवेतील प्राणवायूचे प्रमाण पुढील दहा वर्षांत २१% होईल. आम्ही त्यादृष्टीने थोडे प्रयोग सुरु केले आहेत.”
श्री.आर्यन जोशी यांनी तीनही गटांचे व सौ. मधुरा जोशी यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ते म्हणाले, ” तुम्ही सर्वांनी अथक प्रयत्न करून जे अहवाल सादर केले आहेत ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर, व्यवहार्य आणि आर्थिक दृष्टीनेही अत्यंत योग्य आहेत. मी हे तीनही अहवाल एकत्र करून आपल्या माननीय चेअरमन साहेबांना सादर करीन. त्यानंतर ते सदरचा अंतिम अहवाल केंद्र सरकारच्या अंतरिक्ष विभागाकडे पाठवतील. त्यांच्याकडून निधी मंजूर झाल्यानंतर आपण कामास सुरुवात करू.”
श्री बी. सिवाप्पा यांनी अंतिम अहवाल केंद्र सरकारच्या अंतरिक्ष विभागाकडे पाठवला. पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घातल्याने आठ दिवसांतच अहवालास मंजुरी मिळून निधी मंजूर सुद्धा झाला.
श्री.आर्यन जोशी यांनी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. श्री जोशी म्हणाले, ” मित्रहो, आपण पाठविलेला अहवाल केंद्रीय अंतरिक्ष विभागाने मंजूर केला आहे, व त्यासाठी लागणाऱ्या निधीला विशेष बाब म्हणून अर्थमंत्रालयाने मंजूरी दिली आहे. आता आपण कामाला लागले पाहिजे. या विश्वातील मानवाच्या अस्तित्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आपल्या देशाला हजारो वर्षांचा वैज्ञानिक वारसा आहे. तोच आपण मंगळावरही पुढे चालवायचा आहे.”
क्रमशः भाग तिसरा …
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈