श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
जीवनरंग
☆ स्वयंप्रकाशी रवी… भाग – २… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
(खरं तर मला पुढे काय बोलू हेच कळत नव्हतं. पण उत्सुकता सुद्धा तितकीच वाढलेली होती.) इथून पुढे —-
“ देव आहे साहेब. भेटतो कुठे ना कुठे, कोणत्या तरी रुपात. बहिणीचं कार्य उरकून हिला घेऊन मुंबईत येत होतो. अशीच वेळ होती रात्रीची. ट्रेनमधे विशेष कोणी नव्हतं. कसाऱ्यावरून ट्रेन सुटली, जेमतेम खर्डीला पोचली आणि पोरीने गळा काढला, ती पुढचा एक दीड तास रडत होती. बाटलीने दूध पाजत होतो, तर तेही घेत नव्हती. ही बाई सुद्धा त्याच डब्यात होती. तो तास दीड तास नजर रोखून बघत होती माझ्याकडे. डोंबिवली येता येता एका क्षणाला पोरगी अचानक रडायची थांबली. श्वास घट्ट धरून ठेवलेला. छाती भरल्यासारखी वाटली. चेहरा निळा पडायला लागला. माझं अवसान गळून पडलं. मला वाटलं खेळ खलास. तेव्हा ही बाई अचानक जागेवरून उठली. तिच्या कडेवरचं मूल बाजूच्या माणसाकडे देत, माझ्या अंगावर जवळपास किंचाळली. तिच्या डोळ्यांत आग आणि पाणी एकत्र दिसत होतं. पुढचं एक दीड मिनिट तिच्या भाषेत संतापून काहीतरी बोलली ज्यातला मला एकही शब्द कळला नाही. शेवटी तिने तिचे दोन्ही हात पुढे केले. मी काहीही कळण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी चुपचाप पोरीला तिच्या हातात दिलं. ती तिथेच थोडं वळून पोरीला छातीशी घेऊन बसली. दहा मिनिटानी तिने पोरीला परत माझ्याकडे दिलं. पोरगी समाधानाने झोपली होती. इतकी शांत झोपलेली मी तिला कधीच पाहिलं नव्हतं.”
भेटल्यापासून पहिल्यांदा त्याचा आवाज भरल्यासारखा वाटला. डोळे सुद्धा भिजल्यासारखे वाटले. त्याने नजर फिरवली..
“ मग, पुढे?? ”
“ मग काही नाही साहेब.. तिच्या सोबत असलेल्या त्या माणसासोबत तोडक्या मोडक्या हिंदीत बोलता बोलता कळलं की ते लोक इथे राहतात म्हणून.”
“रोज येतो का मग इथे?”
“ रोज नाही गरज पडत सर. पण कधी कधी रात्र झाली की ही पोरगी रडायची थांबतच नाही. तेव्हा मग तिला घेऊन मी इथे येतो. ही अम्मासुद्धा मी येताना दिसलो की तिचं स्वतःचं मूल छातीपासून खेचून लांब करते आणि हिला आधी जवळ घेते. ”
माझ्या डोक्याला मुंग्या येत होत्या. मेंदू सुन्न पडत चाललेला..
“ मी सोडू का तुला घरापर्यंत? मी इथेच समोर राहतो. पटकन गाडी घेऊन येतो.”
“ नको साहेब, आमच्या गावाकडचा एक मुलगा इथं कॉल सेंटरला बस चालवतो. शिफ्टवाल्याना सोडून या वेळेला रिकामी बस घेऊन जातो तो या बाजूला. तो सोडतो मला बांद्रा कोर्टापर्यंत. मग तिथून जातो मी चालत.”
नशीबाने खेळलेल्या प्रत्येक चालीवर उत्तर शोधलं होतं त्याने. त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक माझे शब्द आटत चाललेले. मला कळत नव्हतं काय बोलू? शब्दच नव्हते उरलेले, ना याच्या जखमांवर फुंकर मारू शकणारे, ना त्याच्या झगड्याचं कौतुक करू शकणारे..
अर्ध मिनिट शांततेत गेलं. पाऊस थांबला होता. आम्ही रस्ता क्रॉस करून समोरच्या बाजूला आलो, जिथून त्याच्या त्या मित्राची बस जाणार होती.
“ तुम्ही जा सर, मी जाईन इथून ”
“ पुढे काय करणारेस? ठरवलं आहेस काही? ”
“ प्रयत्न सुरू आहे सर. मागच्या वर्षीची पीएसआयची मुख्य परीक्षा पास केलीये . मुलाखतीचा कॉल पण आलेला सर. पण हे कोविडमुळे अडकून पडलं सगळं सर. आणि एम ए सुरू आहेच. बघू सर, जमेलच कुठेतरी काहीतरी..” नशिबाचे सगळे फासे उलटे पडत असताना सुद्धा त्याचा नशिबावरचा विश्वास जराही कमी होत नव्हता. कदाचित त्याला त्याच्या जिद्दीवर जास्त विश्वास असावा.
“ तुझा मोबाईल नंबर देतो का ?”
“ तुमचा सांगा सर..” खिशातून मोबाईल काढून त्याने माझा नंबर टाईप केला.
“ मिस्ड कॉल दे मला ”
“ नको सर, राहू देत ”
“अरे दे की, काय झालं?”
“ नको सर, राहू देत. मला शोधत मदत करायला याल. नकोय मला ते सर. आयुष्यात काही झालोच तर स्वतः पेढे घेऊन येईन तुम्हाला. इथेच राहता ना तुम्ही?? ” त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं स्माईल होतं.
“……….” कुठून आणत असेल हा इतकी सकारात्मता.
“ बस आली सर, ती बघा ”—
तरीही जाता जाता याच्या हातात थोडे पैसे ठेवतोच असं मनात ठरवून मी समोरून येणाऱ्या बसकडे बघता बघता पाकिटाला हात घातला. शंभर-पाचशे देऊ की हजार-दोन हजार देऊ असा विचार करेपर्यंत त्याने स्वतःच्या खिशातून दहादहाच्या तीन नोटा काढून माझ्या बॅगच्या कप्प्यात टाकल्या,
“ हे तुमचे तिकिटाचे पैसे सर.. त्या दिवशी घाईघाईत राहून गेलेले..”
मी काहीही म्हणेपर्यंत तो बसमध्ये चढला होता आणि बस पुढे निघालीही होती,
“ पुन्हा भेटू सर..”
मी बराच वेळ पुढे जाणाऱ्या बसकडे बघत बसलो.
मी अर्धा एक मिनिट तिथेच उभा होतो. नक्की कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेऊन “लढ” म्हणायला हवं होतं, याचा विचार करत.
मी चालत घराकडे निघालो. सिग्नलवर सायकलवरच्या कॉफीवाल्याकडे एक कॉफी घेतली. आणि सुन्न डोक्याने घरी आलो. असं म्हणतात, की असे प्रसंग तुम्हाला आयुष्यात नवीन ऊर्मी देऊन जातात. मला याच्या अगदी उलट वाटतंय. आत खूप मोठी आणि खोल पोकळी तयार झाल्यासारखी वाटतेय. रितेपणाची जाणीव. वन बीएचकेचा टू बीएचके आणि हॅचबॅकची सेडान करण्याइतपतच खुरटी स्वप्नं बाळगणाऱ्यांना ही जगण्याच्या खऱ्याखुऱ्या लढाईची गोष्ट अंगावर येते. तूपात घोळवलेली आणि साखरेत लोळवलेली दुःखं चघळायची सवय झालेल्या शहरी मध्यमवर्गाला ही दाहकता पेलवत तर नाहीच, पण ऐकवतही नाही. ‘बलुतं’ किंवा ‘झोंबी’ सारखी दुःखानी डबडबलेली आत्मचरित्रं वाचल्यावर आपल्यात जी शून्यत्वाची भावना निर्माण होते तीच भावना. पण सगळीच पुस्तकं लायब्ररीत मिळत नाहीत. काही पुस्तकं तुम्हाला अशीच रस्त्यावर, पूलाखाली चालता बोलता भेटतात. तुमच्याशी गप्पा मारतात.. जिवंत होऊन.
सलाम आहे रवी तुला.. हो रवीच.. स्वयंप्रकाशी रवी..
……. आणि हो, गरवारेच्या पूलाखाली पार्ल्यातली काही सर्वात श्रीमंत कुटुंबं राहतात. बेघर असतील पण गरीब नक्कीच नाहीत.
— समाप्त —
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूपच सुंदर श्यामभाऊ! पण लेखकाचे नाव अज्ञात का?