सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ अरूंद वाट प्रेमाची… भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

शहरातील सुप्रसिद्ध मूर्तीकार मगनभाई यांचा मदतनीस म्हणून मधु काम करत होता. मूर्ती बनावण्यातून फारसं अर्थोत्पादन होत होतं, असं नाही. परंतु या कामाचं एका प्रकारचं समाधान, तृप्ती मधुला लाभत होती. त्यांनी बनवलेल्या गणपती, सरस्वती, दुर्गा इ. मूर्ती खरेदी करण्यासाठी दूरवरून लोक येत. आगाऊ रक्कमही देत. या उत्सवी मूर्ती बनवण्यातून वेळ मिळाला की मधु मातीच्या काही कलाकृती बनवत असे. शो-पीस म्हणून लोक त्याही विकत घेत. आपलं हे स्वत:चं कामही तो मगनभाईंच्याच कारखान्यात करत असे. मधुचं स्वत:चं वडिलोपार्जित घर होतं. ते जुनं होतं, पण चांगलं मोठं होतं. मधुची इच्छा असती, तर तो आपलं स्वत:चं काम आपल्या घरीही करू शकला असता. परंतु कारखान्यात असं एक आकर्षण होतं जे मधुला कारखान्याकडे खेचत होतं. त्या आकर्षणाचं नाव होतं मधुलिका.         

मगनभाईंच्या कारखान्यात मूर्तींसाठी माती तयार करण्याचं काम मंसाराम करत असे. मधुलिका त्याची मुलगी. मंसाराम पन्नास-पंचावन्नाचा आसेल. त्याची इच्छाशक्ती तीव्र होती. परंतु गेली कित्येक वर्षे माती तयार करण्यात गुंतलेली त्याच्या हाता-पायाची बोटे आता माती सहन करू शकत नव्हती. एक दिवस पांढरी स्वच्छ माती तयार करता करता त्याच्या रक्ताने लालीलाल झाली. मग मगनभाईंनी कारखान्यात मंसारामच्या जागी त्यांची मुलगी मधुलिका हिला घेतले. मगनभाई मधुला म्हणाले, ‘आपले आई-वडील आणि शिकणारा भाऊ या सर्वांची जबाबदारी मधुलिकावर आहे. त्यामुळे मिळेल ते काम करण्यासाठी ती विवश आहे.

मगनभाई पूर्वी ज्याला त्याला सांगायचे, ‘मधुलिकाची आई मनसा खूप सुंदर होती. ऐन तारुण्यात ती एखाद्या परीसारखी दिसायची. पण गरिबीमुळे मंसारामसारख्या असल्या-तसल्या माणसाशी लग्न करावं लागलं. आता मगनभाई हेही सांगताना थकत नाहीत की मधुलिका आपल्या आईपेक्षा किती तरी जास्त सुंदर आहे. मंसाराम आणि मगनभाई यांच्यातील मालक आणि मजूर म्हणून असलेले संबंध कधीच मागे पडले होते. दोघांच्यामध्ये असे काही भावबंध निर्माण झाले होते की जे रक्ताच्या नात्यावरही मात करतील. दोघांच्यामध्ये खूप चेष्टा-मस्करी चालायची. कधी कधी मगनभाई म्हणायचे, ‘मंसाराम, मी खात्रीपूर्वक सांगतो की मधुलिका तुझी मुलगी नाहीच. तू जन्मभर अकलेच्या मागे लाठी घेऊन फिरत राहिलास आणि इकडे मधुलिका तुझ्या झोपडीत राहून एकामागोमाग एक परीक्षा पास होत गेली.’

‘मग सांगा ना हुजूर की ती आपलीच मुलगी आहे.’

‘अरे, काही तरी लाज बाळग. मनसाभाभीनं ऐकलं, तर तुला जोड्याने बडवेल.’

‘सरळ सरळ का नाही सांगत की मुलगी मानलं, तर लग्न करण्याची जबाबदारी पण डोक्यावर येऊन पडेल ना?’ आणि गप्पांचा आनंद घेत दोघेही खळखळून हसत. 

मधुलिका अतिशय कुशाग्र बुद्धीची होती. घरात अभ्यास करून तिने पदवी मिळवली होती.  आणि आता पदव्युत्तर परीक्षेची ती तयारी करत होती. घरातील इतर कामेही तिला करावी लागायची. त्यामुळे ती सकाळी लवकर कारखान्यात येऊन दुपारी बारा वाजेपर्यंत घरी परतायची. मधुचं घर कारखान्यापासून वीसेक किलोमीटर दूर होतं. खूप प्रयत्न करूनही तो सकाळी दहा- अकरापूर्वी कारखान्यात पोहोचू शकायचा नाही. मगनभाई तर त्याहूनही उशिरा यायचे. त्यामुळे एक-दोन तास असे असायचे की ज्या वेळात निर्जीव मूर्तींमध्ये मधू आणि मधुलिका नावाची दोन तरुण हृदये कारखान्यात एकदमच धडधडत रहायची. अर्थात दोघांच्या स्थितीत जमीन आस्मानाचं अंतर असायचं. कारखान्यात काम करण्यासाठी मधु अतिशय ताजा-तवाना आणि प्रसन्न असायचा, तर मधुलिका चार-पाच तासांच्या परिश्रमानंतर घामेघूम झालेली असायची. कधी कधी मधुलिकाकडे बघून मधुला हसू यायचं. मधुलिकाचे कपडे, केस आणि शरीराचा उघडा भाग मातीने माखलेला असायचा. भुवया, पापण्या आणि हनुवटीवर मातीचा जसा काही एकाधिकार असायचा. अशा प्रकारचं तिचं रूप पाहून एक दिवस मधुने मधुलिकाला म्हंटलं, ‘माझ्या या अर्धवट बनवलेल्या पुरुषभर उंचीच्या मूर्तींमध्ये तू कुठे उभी राहिलीस, तर त्या मूर्तींमधून तुला ओळखणं मोठं अवघड असेल माझ्यासाठी.’

क्षणोक्षणी वाढणार्‍या दोघांच्या जवळीकीमुळे मूर्तींविषयीचं मधुलिकाचं मत मधुला महत्वाचं वाटू लागलं. विशेषत: मधु बनवत असलेल्या कलात्मक मूर्तींबद्दल तिचे विचार जाणून घेणं मधुला गरजेचं वाटू लागलं. त्याच बरोबर तारुण्याने मुसमुसलेली मधुलिका मधुच्या जीवनात कस्तूरी-गंधाप्रमाणे उतरत चालली. मधुलिका मधुने बनवलेल्या मूर्तींमध्ये काही ना काही उणीव दाखवून त्याला चिडवायची. तिला वाटे की मधुने श्रेष्ठ कलाकार व्हावं. एक गोष्ट मग्नभाईंच्याही लक्षात आली होती की मधुलिकाचं कौतुक मिळवणं, मधुसाठी काही सोपी गोष्ट नव्हती. मधु ने अगदी अप्रतीम सुंदर मूर्ती घडवली, तरी मधुलिका त्यात काही ना काही कमतरता शोधून काढायचीच. अनेक दिवस कष्ट घेऊन, अतिशय मन लावून मधुने एका स्त्रीची सुंदर पूर्णाकृती मूर्ती बनवली. मगनभाईंनासुद्धा वाहवा केल्याशिवाय राहवलं नाही. पण मधुलिका अर्धा इंच हसून निघून गेली. बस्स! दुसर्‍या दिवशी नेहमीपेक्षा जरा लवकरच मधु कारखान्यात पोचला आणि त्याने मधुलिकाला विचारलंच, ‘काय कमतरता राहिलीय या    मूर्तीत?’

मधुलिका म्हणाली, ‘आपण आपल्याकडून मूर्ती बनवण्यात काही कसर सोडली नाहीत, फक्त युवतीला योग्य पोझ देणं जमलं नाही तुम्हाला!’

थोडा वेळ थांबून मधुलिका म्हणाली, ’युवती नखशिखांत अनिंद्य सुंदरी आहे. तिच्या अंग-प्रत्यंगातून ती तत्व झरताहेत, जी चंद्राला पाण्याच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी विवश करणार्‍या सागर लहरींमध्ये आहेत. आपण तिला ‘मेनका’ किंवा ‘उर्वशी’ असंही नाव देऊ शकाल. पण ही युवती काही वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या ढंगात उभी राहिली तर…. ‘

‘तर काय?’

‘तर चंद्र नेहमीसाठीच सागरलहरींच्या मिठीत सामावला असता आणि या धरतीवर प्रत्येक रात्र पौर्णिमेचीच रात्र असती.’ मधुलिकेच्या वाणीतून जसे काही वीणेचे स्वर झरत होते.  

‘कोणत्या पोझमध्ये युवतीने उभं राह्यला हवं होतं?’ मधुचा हा प्रश्न, मधुलिकासाठी प्रश्न नसून एक प्रकारे आव्हानच होतं तिला.

मूळ हिंदी  कथा – ‘गली अति सॉँकरी’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments