सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ अरूंद वाट प्रेमाची… भाग 3  (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले-  मधुलिकाने खोलीत जाऊन ‘मोहिनी’कडे बघितलं, तेव्हा ती चकीतच झाली आणि तिच्या गळ्यातून सहाजोद्गार बाहेर पडले, ‘वा: काय सौंदर्य आहे. जो कुणी एकदा हिला बघेल, आपलं सारं राज्य तिच्यावर उधळून देईल.’ असं बोलता बोलता तिने आपल्या गळ्यातली मोत्यांची सुंदर माळ काढली आणि मोहिनीच्या गळ्यात घातली. अन्य स्त्री-रूपावर मोहित होऊन तिचा गौरव स्त्रीनेच करावा, अशी ही पहिलीच वेळ असेल आणि इथे तर गौरव करणारी खुद्द मधुलिकाच होती. आता इथून पुढे )

त्या दिवसात ‘मोहिनी’च्या पॅकिंगची तयारी चालू होती. एक दिवस पुन्हा एकदा मधु बिछान्यावर नाही असं पाहून  मधुलिका ‘मोहिनी’च्या खोलीत गेली आणि तिथलं दृश्य पाहून ती हैराणच झाली. मधुने ‘मोहिनी’ला आपल्या बाहुपाशात घेतलं होतं आणि तो तिच्या गळ्यातील मोत्याच्या माळेशी खेळत होता. मधुलिकाने आपल्या मनाला समजावले की तो कदाचित माळेतील मोती सारखे करत असेल. नीट करत असेल आणि एवढ्यात तिला दिसलं की मधुने आपला उजवा हात ‘मोहिनी’च्या वक्षस्थळावर ठेवलाय आणि ओठ ‘‘मोहिनी’च्या ओठांवर. मधुलिकाच्या देहावर जणू काही एका वेळी शेकडो झुरळे सरपटू लागली. ती गुपचुप आपल्या बिछान्यावर परत आली.

दुसर्‍या दिवशी मधुलिका स्वत: बाजारात गेली आणि पॅकिंगसाठी आवश्यक ते सगळं साहित्य घेऊन आली. जितक्या लवकर शक्य असेल, तितक्या लवकर पॅक करून ‘मोहिनी’ ला बाजूला ठेवण्याचा तिचा विचार होता. रात्री ती पुन्हा मधुची बिछान्यावर वाट पाहू लागली. मध्यरात्र सरली पण मधु आला नाही. मधुलिका तडफडली आणि उठून ‘मोहिनी’च्या खोलीत गेली. ‘मोहिनी’च्या खोलीचा दरवाजा अनपेक्षितपणे बंद होता. मधुलिकाने हळूच एक दार उघडलं आणि आत नजर टाकली. आतील दृश्य कल्पनेपलिकचं होतं. तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. मधुने ‘मोहिनी’ला मिठीत घेतलं होतं आणि तो वेड्यासारखी तिची चुंबने घेत होता. तिच्या अंग-प्रत्यंगांशी खेळत होता. मधुलिकाला जसा काही अनेक विंचवांनी डंख मारला. ती आपली शुद्ध घालवून बसली. तिने धडकन दरवाजा उघडला नि ती आत घुसली. मग तिने झपाट्याने पूर्ण ताकद लावून ‘मोहिनी’ला मधुपासून दूर केलं आणि खोलीत असलेल्या मोठ्या पॅकिंग बॉक्समध्ये फेकून दिलं. क्रोध आणि मत्सर यामुळे तिच्या डोळ्यातून ठिणग्या बरसत होत्या. तिने मधुचं मनगट घट्ट पकडलं आणि त्याला जवळ जवळ ओढतच बेड-रूममध्ये घेऊन आली. म्हणाली-

इथे रात्र रात्र मी तुझी वाट बघत बिछ्न्यावर तळमळत असते आणि तू त्या मातीच्या मूर्तीला उराशी धरून रात्र घालवतोस. लाज नाही वाटत तुला? वेडा झालयास का तू? तू असं काय तिच्यात पाहिलंस, जे माझ्यात नाही? … आज एक महिना होऊन गेला, तू मला.. ‘

‘मी अजूनही तुझ्यावरच प्रेम करतो मधुलिका, अगदी सुरुवातीच्या दिवसात करत होतो, तितकंच…’ असं म्हणत म्हणत मधुने मधुलिकाला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.

‘नाही. आज-काल तू माझ्याऐवजी मूर्तीवर अधीक प्रेम करू लागला आहेस.’

‘ती मूर्ती आता तुटून गेलीय मधुलिका. किती परिश्रमाने आणि प्रेमाने बनवली होती ती मूर्ती मी…. आणि तूसुद्धा … प्रदर्शनात आपल्याला पुरस्कार मिळेल म्हणून… ‘

‘मष्णात जाऊ दे ते प्रदर्शन…. आणि त्यातले पुरस्कार. आता तुझ्या-माझ्यामध्ये भिंत होऊन रहाणारी असली मूर्ती पुन्हा या घरात कधीही बनणार नाही.’ मधुलिका एखाद्या सिंहिणीसारखी चवताळून म्हणाली.  

‘जरा विचार कर मधु! अग वेडे, आपल्या दोघांमधे ही मातीची मूर्तीसुद्धा तू सहन करू शकली नाहीस, मग कुणा स्त्रीला कशी सहन करशील? इतकं सोपं नसतं ग सगळं काही. आपले कबीरजी म्हणतात ना, ‘प्रेम गली अति सांकरी, जा में दो ना समाए.’ अग, प्रेमाची ही वाट इतकी अरुंद आहे, तिच्यावरून मी एकीसोबत, तुझ्या एकटीच्या सोबतच चालू शकतो. तिथे दुसरीला जागाच नाही मुळी. तुला हे समजावं, म्हणून तर हे सारं नाटक रचलं मी.’ आणि मधुने मधुलिकाला आपल्या मिठीत घेतलं. आता मधुलिकाने विरोध केला नाही.

बाहेर पाऊस कोसळत होता.  आतमध्ये मधुलिकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या. मधु त्यात किती तरी वेळपर्यंत भिजत राहिला. दोघांमध्ये कोणतंच शून्य आता बाकी उरलं नव्हतं.

समाप्त

मूळ हिंदी  कथा – ‘गली अति सॉँकरी’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
रंजना लसणे

अति सुंदर