जीवनरंग
☆ ओढा… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
ओढ्याची आपली नित्याची चुळबूळ चालू होती आणि म्हणूनच नदीची चिडचिड चालू होती. काठावरल्या वाढत्या इमारती आणि घटती शेती, त्यात पडणारा राडारोडा आणि आकसत चालेले अंग, अशी रोजची तक्रार ओढा नदीपाशी मांडत होता.
नदी बिचारी काय सांगणार? “अरे लेका तू निदान जिवंत तरी आहेस. माझे बाकीचे कित्येक ओढे तर मरून गेले.” नदीने असे सांगितल्यावर मात्र ओढा थोडा वरमला. एवढे गेले, आपण अजून जिवंत आहोत या समाधानानेच त्याला हुरूप मिळाला.
त्यांचा हा संवाद चालूच होता की पावसाळा ऋतू आला. पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडू लागले तसे दोघे खूष झाले. पाहता पाहता सरी वाढू लागल्या. ओढ्याचे वाढते पाणी नदीला धक्का मारू पाहू लागले. नदी चिडली,-
“इतक्यात शेफारू नकोस हो. फार खळखळाट नको उगाच.”
ओढ्याचे मात्र वेगळेच चाललेले होते. आपल्या वाढत्या पाण्याने काठावरच्या लोकांची वाढणारी चिंता त्याला आनंद देत होती. थोडे पाणी काठाबाहेर आले की लोकांची उडणारी त्रेधातिरपीट पाहून तो खदखदून हसत होता, आणि आणखी जोमाने उसळत नदीस येऊन मिसळत होता. वर वर जरी नदी रागे भरत होती, चिडत होती तरी आतून मात्र त्याच्या या बाललीला पाहून सुखावत होती.
पावसाचा महिना दीड महिना पुढे सरकला, पण त्याने काही फार जोर धरला नाही. ‘आता आपण पुन्हा आटणार का? आपले पात्र आणखीनच आकसणार का?’ याची चिंता ओढ्याला सतावू लागली. नदीला हे दिसत होते पण तिच्या समोरचे प्रश्न याहून काही वेगळे नव्हते.
इतक्यात एके दिवशी भल्या पहाटेच पावसाच्या सरी सुरू झाल्या. एक नाही दोन नाही तीन नाही , चांगला आठवडाभर पाऊस कोसळत होता. आता जिथे नदीचेच पात्र वेगाने वाढू लागले तिथे ओढ्याची काय कथा. नदीला जागा मिळेल तशी ती वाट काढत होती. ओढ्याला सामावून घेणे आता तिला अशक्य होऊ लागले, तशी ती त्याला मागे रेटू लागली.
इतक्यात धरणातून पाणी सोडणार याची चाहूल तिला लागली. आता आपले काय होणार, आपल्या भरवश्यावर आपल्या काठावर विसावलेल्या गावांचे काय होणार, वाटेत येणाऱ्या शहराचे काय होणार…… तिला सगळे कळत होते पण वळायला जागाच उरली नव्हती. धरणातून पाणी सोडू लागले तशी नदी उधाणली. आता ती कोणाचेच ऐकायला तयार नव्हती. वाट मिळेल तशी पसरत होती, वाटेत येईल ते उखडून टाकत होती.
तिचे असे हे रौद्ररूप पाहण्याची संधी ओढ्याला क्वचितच यायची. इकडे त्याचेही पाणी वाढत होते. कितीही जोर दिला तरी नदी त्याला दाद देत नव्हती, त्याचे पाणी सामावून घेत नव्हती. ओढ्याचे पाणी मागे हटू लागले तसे ते आजूबाजूच्या घरांमध्ये, इमारतींमध्ये घुसू लागले. रस्ते तर त्याने कधीच व्यापले होते, आता पुलांचीही काही खैर नव्हती. जीव मुठीत धरून काठावरचे लोक घर सोडत होते. जे जमेल ते सोबत नेत होते, जे उरले ते ओढा वाहून नेत होता.
पण यावेळी मात्र त्याला खूप दुःख होत होते. आपले पाणी नदी स्वीकारत नाही आणि आपण या वाड्या – वस्त्यांमध्ये घुसत आहोत, याचा त्याला राग येत होता. काठावरल्या ज्या घरांचे संसार उभे राहताना ओढ्याने पाहिले होते, त्यांनाच आज खाली कोसळताना तो पाहात होता. हे सारे त्याला असह्य होत होते. पण करणार काय बिचारा? पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. आणि त्याशिवाय त्याची किंवा नदीची पाणी पातळी कमी होणार नव्हती.
शेवटी पाऊस दमलाच. परमेश्वराने साऱ्यांच्याच प्रार्थना ऐकल्या बहुधा. आताशी धरणातून पाणी सोडणे बंद झाले. तशी नदी आधी संथ आणि मग शांत झाली. तिने ओढ्याला जवळ घेत चुचकारले, ” दमलास का रे? “, प्रेमाने विचारले. तो मात्र झाल्या विध्वंसाने आतून बाहेरून हादरून गेला होता. तो सावरला असला तरी त्याचा काठ अजून सावरला नव्हता. त्याची ओळखीची माणसे अद्याप परतली नव्हती. जी परतली होती त्यात ओळखीची सापडत नव्हती. या साऱ्याचा दोषी कोण याचे उत्तर त्याला सापडत नव्हते.
नदी मात्र यावेळी शांत होती. तिने जे पाहिले, सोसले, ते तिने ओढ्याला सांगितले असते, तर तो आणखीनच दुःखी झाला असता. म्हणूनच ती ओढ्याला कुशीत घेऊन शांत वहात राहिली.
पावसाळा सरला आणि हळूहळू ओढा पुन्हा आकसला. त्याला त्याच्या आकसण्याचे फारसे दुःख नव्हते.
पण आजूबाजूची माणसे काहीच शिकली नाहीत याचे वाईट मात्र नक्कीच वाटत होते.
लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)
C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७
+९१ ८९७५३ १२०५९ https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈