जीवनरंग
☆ चांदण्यांची ओटी… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆
ती चहाचा कप घेऊन अंगणात झोपाळ्यावर येऊन बसली… आईचा चौदावा कालच झाला होता… आता ह्या घराचं काय करायचं ते सगळं शेजारी असणाऱ्या काकांशी बोलून ती उद्या परत जाणार होती…
काल पर्यंत सगळे घरात येणारे जाणारे असल्याने वेळ गेला. आता मात्र आईची आठवण जास्त तीव्रतेने येत होती. झोपळ्याच्या उजव्या बाजूला पुजेसाठी लागणारी सगळी फुलं होती… कान्हेरी तर किती आवडायची तिला… म्हणायची, ‘रूप आणि गंध नसला तरी बारा महिने देवाला सेवेत हजर असते ही. फिकट गुलाबी अगदी अंगोपांगी बहरलेली…’ …. मोरपिसासारखा निळा गोकर्ण तर लाडाने गच्चीत चढवून दिला होता तिने…पांढऱ्या चांदण्यांचा चांदणी पाट टोपलीभर फुलं देतो… तुळशी तर किती आल्या आहेत… मागे आपण म्हणालो होतो ‘ आई तुळशी काढून टाक. एखादी ठीक आहे ‘, तर म्हणाली होती, ” माझं ऑक्सिजन हब आहे ते… सकाळचा पेपर मी तिथेच बसून वाचते… आणि सावळ्या विठ्ठलाला गळाभर तुळशीमाळ घातली की छान दिसतो तो… “
आईचं फुलांचं, झाडाचं वेड तिला कायम हिरवंगार ठेवायचं. आण्णा गेल्यावर आपण किती म्हंटल होतं- ‘ चल माझ्याकडे रहायला ‘ –पण नाही आली,… घरातल्या वस्तू वस्तू मध्ये ती होती… छोटीशीच खोली आणि हे अंगण… आपलं लग्न, बाळंतपण, बारसे, आपलं दोन लेकरांसोबत माहेरपण, सगळं हौशीने करायची… आपली लेकरे आज एवढे मोठे झाले तरी एक दिवस तरी राहून जायचे सुट्टीत… प्रत्येकाच्या वयाचं होऊन वागता यायचं तिला, म्हणून जावई काय.. आपल्या सासरची माणसं काय, सगळ्यांना हळहळ वाटली आहे तिच्या जाण्यानं…
जाण्याच्या काही दिवस आधी तर बोलली होती आपल्याशी..” ह्या वर्षी अधिकमास आहे… तू जरा निवांत ये गं.. तुझी ऑफिस धावपळ नको… तुला गरम गरम गुळाचे अनारसे खाऊ घालेन.. हातपाय धड आहेत आईचे तोपर्यंत माहेर आहे गं बाई…… या वेळी तुला साडी नाही, तर सुंदर पुस्तकं देणार आहे…. वामनराव गेले, त्यांची गावातली लायब्ररी बंद केली…. तुला आवडणाऱ्या सगळ्या लेखिकांची पुस्तकं घेतली आहेत अर्ध्या किमतीला विकत… तू लग्नाआधी किती जात होतीस तिथे… नंतर मात्र विसरलीस तुझं वाचन वेड, ते काही मला पटलेलं नाही……
बायकांनी गुरफटून नाही घ्यायचं.. आपलं अस्तित्व टिकवून संसार करता यावा.. जगण्याला आनंद देणारी आपली आवड जोपासावी….. माझं शिवणकाम, बागकाम मी टिकवण्यासाठी प्रयत्न केले, तू बघत होतीस ना……तुम्हाला तर खूप सुख सोयी आहेत… अगदी नळ उघडला की पाणी , बटन दाबलं की मिक्सर… आम्ही मात्र सगळी कामं करून आवडी टिकवल्या, म्हणून शेवटपर्यंत आनंदी राहू शकलो…. संसार सगळयांना आहे गं, पण त्या सोबत आनंद सापडला तर खरी मजा आहे….”
” तुझी चिमणी येईल ना धोंड्याला या वेळी ??? ” तिने विचारलं होतं.. त्यावर आपण म्हणालो,
” नाही गं. १० वी आहे… क्लास असतील…”
त्यावर आई म्हणाली होती , “आपल्या ह्या तिसऱ्या पिढीशी बोलायचं आहे मला आता… ती पण आता मोठी झाली आहे.. मागच्या वर्षी आली नाही ती.. तिला सांग आजीने गम्मत ठेवली आहे करून तुझ्यासाठी…तिची पाळीपण सुरू झाली ना ? स्त्रीपणाकडचा प्रवास तिचा, काही गुजगोष्टी करेन तिच्याशी… बघ.. जमलं तर घेऊनच ये..”
ह्या फोननंतर आई गेल्याचाच फोन आला… ती चहाचा कप ठेवायला आत आली.. छोटासा ओटा, देवघर, शिलाई मशिन, सगळीकडे प्रसन्नता होती.. ती सगळीकडे हात फिरवत होती.. मध्येच डोळे झरझर वाहात होते…
तेवढयात रमाबाई आल्या. ” ताईसाहेब… आजीबाईने निरोप ठेवला होता तुमच्यासाठी…. ती तुमच्यासाठी आणलेली पुस्तकं आणि त्या ट्रँकेत एक ओटी आहे, ती तुमच्या लेकीसाठी ठेवली आहे… आठवणीने घेऊन जा, येते मी..”
तिनं अधाशीपणाने पुस्तकं छातीशी धरली… ती लोखंडी पेटी उघडली.. एका रेशमी कापडात काही तरी बांधलं होतं… तिने पटकन उघडलं, तर त्यात.. छोट्या छोट्या चांदण्या शिवलेल्या होत्या, चमकणाऱ्या कपड्याच्या.. तिला प्रश्न पडला.. हे कापड बघितल्यासारखं वाटतंय ??
त्यात एक चिठ्ठी होती,.. तिने उघडली… सुंदर अक्षर आईचं, अगदी मोत्यासारखं.. चिठ्ठी नातीसाठी होती….
‘ प्रिय चिमणे,
तू एकदा तुझा चंदेरी फ्रॉक इथेच विसरून गेली होतीस … नंतर तुला तो लहान झाला म्हणून नकोच म्हणालीस… एकदा गच्चीत झोपलो तर म्हणाली होतीस, “आजी ह्या चांदण्या ओंजळीत घेता आल्या तर…” मला तेंव्हा आवडली तुझी कल्पना… आपल्या स्त्री-आयुष्याशी निगडीत वाटली…..
तुला आता पाळी आली… स्त्रीच्या पूर्णत्वाकडचा तुझा प्रवास… तुला आजी म्हणून समजवताना तुझ्याच चांदण्यांच्या कल्पनेने तुला समजावणं मला सोपं वाटलं… ह्या चांदण्यांच्या मागे मी काही लिहिलं आहे… आईने तुझ्या ओटीत दिलं कि बघ…’ तिने चांदण्या वळवून बघितल्या… ती चिठ्ठी पुढे वाचू लागली… ‘ सुख, समाधान, दुःख, राग, चैतन्य, हळवेपणा, कठोरपणा… अश्या अनेक चांदण्या आता स्त्रीच्या प्रवासात ओटीत असतात… ह्या सगळ्या सांभाळायच्या… आणि ह्यात सगळ्यात वरती ठेवायची ती शुक्राची चांदणी. तुला आठवते ना आपण आवर्जून बघायचो तिला… चमकदार अशी… त्या चांदणीवर मी लिहिलंय “आनंद”.. काही झालं तरी तो शोधत राहायचा.. प्रत्येक परिस्थितीत... मग बघ सगळ्या चांदण्या ओंजळीत आल्याचा कसा आनंद भेटतो… ‘
तुझी आजी….
(ता. क. — तुझ्या त्या चंदेरी फ्रॉकच्याच शिवल्या आहेत चांदण्या…)
तिला आईचं कौतुक वाटलं. ७५ वयाची आई किती विचारपूर्वक वागते… जगणं सहज सोपं करून सांगते… तिलाही नव्याने स्त्रीपणाचा अर्थ सापडला… डोळे पुसत तिने ती चांदण्यांची ओटी आपल्या पर्समध्ये ठेवली…
©️ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
औरंगाबाद
(माझा अशा नवीन कथांचा संग्रह “टांगा” प्रकाशन पूर्व सवलतीत आजच बुक करा 9822875780 ह्या no वर.. धन्यवाद.)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈