जीवनरंग
☆ “माफी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
नुकताच काॅलेजात जायला लागलेलो.
एकटाच रहायचो.
आजोबांची जागा होती मुंबईत.
तिथंच रहायचो.
आजोबा, आई, बाबा सगळे पुण्यात.
शोभामावशी.
आजी, आजोबांकडे गेली तीस पस्तीस वर्ष काम करायची.
धुणं ,भांडी,केर, लादी पुसणं, पोळ्या,सब कुछ.
कामाला चोख,अतिशय प्रामाणिक.
अगदी घरच्यासारखी.
आजी गेल्यानंतर आजोंबांना एकटं राहू द्यायचं नाही,
म्हणून बळजबरीनं पुण्यात आणलेलं.
तरी सुद्धा शोभामावशीकडे घराची किल्ली असायचीच.
एक दिवसाआड ती घर घासून पुसून लख्ख ठेवायची.
मी रहायला आलो तेव्हा आजोबा बरोबर आलेले.
आजोबांनी बजावलेलं, “नातवाला सांभाळून घे माझ्या”.
शोभामावशी मनापासून हसली फक्त.
फार कमी बोलायची ती.
आजोबा पुण्याला परत गेले अन् मी ऊधळलो.
ते दिवस, वय आणि मी.
रात्र रात्र वाचत बसायचो.
कथा, कादंबर्या, आत्मचरित्र.
अभ्यासाचं सोडून काहीही चालायचं.
पेटींगचं वेड लागलेलं.
सकाळी लवकर ऊठणं व्हायचं नाही.
घरभर पसारा.
इथं तिथं पसरलेली पुस्तकं.
कॅनव्हास, पॅलेट अन् रंगपंचमी.
कपड्यांचे बोळे.
विस्कटलेली चादर, फेकलेली पांघरूणं.
ओट्यावर सांडलेली खरकटी भांडी.
पूछो मत!
सकाळी शोभामावशी येऊन गेली की,
जादू व्हायची.
घर लख्ख.
ती बिचारी न बोलता, मान खाली घालून,
सगळं निमूट आवरायची.
पोळी भाजी करून डबा भरून ठेवायची.
जाता जाता मला हलकेच ऊठवून जायची.
बाबा, काका तिला शोभामावशी म्हणायचे म्हणून ,
मीही म्हणायचो.
खरं तर सख्ख्या आजीईतके लाड करायची माझे.
खरंच सांभाळून घेतलं तिनं मला.
सांगतो.
खरं तर माझीच मला लाज वाटतेय सांगायला.
तरीही सांगायलाच हवं.
माझ्या मुंजीत आजीनं मला एक गोफ केलेला.
तीन साडेतीन तोळ्याचा असेल.
ईतके दिवस लाॅकरमधेच होता.
मी काॅलेजमधे जायला लागलो तेव्हा आईनं घालायला दिला.
‘नेहमी शर्टाच्या आत, बनियनखाली लपवून ठेवायचा.
थोडं तरी सोनं अंगावर हवं .
अडी अडचणीला तेच ऊपयोगी पडतं’
आई ऊवाच.
रोज आंघोळीला जाताना गोफ टेबलवर काढून ठेवायचो.
आंघोळ झाली, डोक्याला तेल थोपटलं की पुन्हा गळ्यात.
रात्री वाचताना गळ्यातला गोफ दातानं सहज चघळायचो.
सवय.
एकदा रात्री वाचत होतो.
सहज गळा चाचपला.
रविवारच्या शाळेसारखा शून्यरिकामा.
मला पक्कं आठवतंय.
काल सकाळी आंघोळीआधी मी टेबलवर काढून ठेवलेला.
नंतर ?
शोभामावशी…
मी ताबडतोब घरी फोन लावला.
बाबांनी सोलून काढला मला.
“तुलाच सांभाळता येत नाहीत गोष्टी.
पाडला असशील कुठे तरी.
ऊगाचच आपलं पाप दुसर्याच्या माथी मारू नकोस…”
‘मी काय सांगू ?
आपलेच दात अन् आपलेच ओठ.
एखाद वेळी होतो मोह.
आपलं माणूस म्हणून सोडून द्यायचं.
तू मावशींना काहीही विचारू नकोस.
त्यांना ऊगाचच वाईट वाटेल…”
आई म्हणाली.
“शक्यच नाही.
घरातच असेल कुठे तरी.
नीट शोध.
मी येऊ का तिथे ?”
आजोबांचा सकाळी सक्काळी फोन.
‘नको, मी बघतो.’
सगळं घर शोधून झालं.
नाही….
शोभामावशी रोजच्यासारखी यायची.
निमूट काम करून निघून जायची.
माझ्या नजरेला संशयाचा मोतीबिंदू झालेला.
शोभामावशीला जाणवलं असावं.
“का रे पोरा काय बिनसलंय सद्द्या ?’
‘काही नाही’
मी ऊगाचंच म्हणलं.
गुंतून चालणार नव्हतंच.
ईलेक्ट्राॅनीक्सची ओरल आलेली तोंडावर.
आज रात्री अभ्यासाला मूहूर्त लागायलाच हवा.
रात्री व्हीके मेहता ऊघडलं अन् ,
पान चकाकलं.
वेटोळं घालून पहुडलेला गोफ दिसला.
लाज वाटली…
झोपच येईना.
सकाळी सकाळी आवरून तयार.
नाक्यावरच्या हलवायाकडनं पेढे आणले.
पूजा करून नैवेद्य दाखवला.
शोभामावशीची वाट बघत बसलो.
मावशी आल्याआल्या तिचे पाय धरले.
पेढे दिले.
” चुकलो मी !’
तिला काही कळेना.
सगळी हकीगत सांगितली.
ती नेहमीसारखी, मनापासून हसली फक्त.
‘रस्त्यावर सापडलं असतं तर एक वेळ मोह जाला बी असता.
ह्ये तर माजंच घर हाये.
माफी देणारा न्हाई,
मनापासून माफी माग्नाराच देवाला आवडतो.
ऊठा.
परीक्षा हाई ना आज…’
आजोबांना फोन केला.
ईनफाईनाईट टाईम्स साॅरी म्हणलं.
परीक्षाच होती.
काठावर पास झालो ईतकंच.
चुकीला माफी…आहेच.
मनापासून मागितली की झालं.
* माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही *
© कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈