☆ जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा ५. गर्वहरण
धारानगरीच्या राजाच्या आश्रयाला दोघेजण रहात होते. त्यापैकी एक ब्राह्मण होता व दुसरा व्यापारी. तो राजा प्रेमाने दोघांनाही वेळोवेळी भरपूर धन देत असे. त्यामुळे ते दोघेही धनवान होऊन सुखाने जीवन जगत होते.
एक दिवस राजाने दोघांनाही विचारले, “कोणाच्या कृपेने तुम्ही सुखी जीवन जगत आहात?” “महाराज, आपल्याच कृपेमुळे मी सुखी जीवन जगतोय”असे ब्राह्मण उत्तरला. व्यापारी मात्र “देवाच्या कृपेमुळे मी सुखी जीवन जगतोय” असे म्हणाला. राजाने त्या दोघांच्याही बोलण्याची परीक्षा घ्यायचे ठरवले.
राजाने एका भोपळ्याला भोक पाडून त्यात मोती भरले. त्यानंतर ते भोक बुजवून तो भोपळा ब्राह्मणाला दिला. व्यापाऱ्याला दोन नाणी दिली. राजाने आपल्याला क्षुल्लक भोपळा दिला म्हणून ब्राह्मणाला खूप वाईट वाटले. भोपळ्यात मोती आहेत याची त्याला कल्पनाच नव्हती.
राजगृहातून बाहेर पडल्यावर ब्राह्मण व्यापाऱ्याला म्हणाला, “मला या भोपळ्याचा काहीही उपयोग नाही. जर तुला हवा असेल तर तू घे व तुझी नाणी मला दे.” “ठीक आहे” असे म्हणून व्यापाऱ्याने त्याला नाणी दिली व भोपळा घेऊन तो घरी आला.
जेव्हा व्यापाऱ्याने भोपळा फोडला, तेव्हा तो मोत्यांनी भरलेला पाहून त्याला खूपच आनंद झाला. तात्काळ राजाकडे येऊन त्याने सर्व वृत्तांत त्याला सांगितला. ती वार्ता ऐकताच ‘मी सर्वांचे रक्षण करतो’ या त्याच्या गर्वाचे हरण झाले व तो अधिक सुखाने राहू लागला.
तात्पर्य – परमेश्वराच्या सहाय्याविना मनुष्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी
कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈