श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ पुरस्कृत कथा – “शिक्षा” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

स्टाफरुममध्ये कमालीची शांतता. सर्व स्टाफ माना खाली घालून बसलेला. प्रत्येकाची चोरटी नजर मात्र दुस-याच्या चेह-याकडे. दुस-याने बोलावे आणि ही शांतता भंग पावावी अशीच प्रत्येकाची इच्छा. पण बोलायला कोणीच तयार नाही. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न ‘‘सरांनी असा कसा निर्णय घेतला?” 

शाळेचे मुख्याध्यापक श्री.देशमुख सर शिस्तीसाठी प्रसिद्ध. कठोर शिस्त आणि उत्तम अध्यापन यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्यात ते जितके प्रिय होते तितकेच अप्रियही. त्यांचं शिकवणं प्रत्येकालाच आवडायचं. वर्ग कसा तल्लीन होऊन ऐकत बसायचा. तासाची घंटा वाजली तरी कुणी जागेवरून हलायला तयार नसायचं. पण जर का त्यांच्या शिस्तीच्या बाहेर गेलात तर मात्र शिक्षा ही होणारच हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. त्यामुळे एकीकडे दरारा तर दुसरीकडे आदर असा संमिश्र भाव सगळ्यांच्याच मनात असायचा. 

पण मग असं काय झालं की सरांनी असा निर्णय घ्यावा? कुणाच्याही दडपणाला बळी न पडणारा हा माणूस आज असा वाकला कसा? 

झालं ते असं… राहूल आठवीच्या वर्गातील एक हुशार विद्यार्थी. कधी पहिला नंबर तर कधी दुसरा. त्याच्याखाली तो कधी गेलाच नाही. नुकतीच वार्षिक परीक्षा संपलेली. त्याला सगळे पेपर सोपे जाणार यात कुणालाच शंका नव्हती. पण एका पेपरला त्यानं केलेलं वर्तन आणि त्यानंतर श्री.देशमुख सरांनी घेतलेला निर्णय हा सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा होता. पेपर होता चित्रकलेचा. कला शिक्षक वर्गावर लक्ष ठेवून होतेच. वर्गातून येरझा-या घालताना त्यांच्या नजरेला एक वेगळाच प्रकार दिसला. क्षणभर त्यांनाही वाटले की असे नसेल, भास असावा. ते भिंतीजवळ उभे राहून मुद्दम लांबून, पण आपले लक्ष नाही असे भासवून बारकाईने पाहू लागले. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला पण नाईलाज होता. ते बाकापाशी आले आणि राहूलला त्यांनी हातोहात पकडले. चित्रे काढण्यासाठी जे विषय दिले होते त्यातील एक विषय होता ‘वन्य प्राणी’. वन्यप्राण्याचे चित्र काढणे राहूलला अशक्य नव्हते. पण त्याने सिंहाच्या चित्राचा एक छाप आणला होता आणि त्यावरून तो उत्तरपत्रिकेत आऊटलाईन काढून घेत होता. हे कला शिक्षकांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्याची रवानगी थेट हेड सर देशमुखांच्या केबिनमध्ये केली. झाला प्रकार त्यांना सांगितला आणि पुढील निर्णय सरांच्या हाती सोपवून ते निघून गेले. 

चित्रकलेचा पेपर शेवटचा होता. देशमुख सरांनी राहूलला आपल्या केबिनमध्ये बसवून घेतले. पेपरची वेळ संपली. बघता बघता शाळा रिकामी झाली. थोड्या वेळानंतर सरांनी राहूलला घरी जाण्यास सांगितले. या मधल्या काळात त्यांचे काय बोलणे झाले आणि निर्णय काय झाला हे कुणालाच समजले नाही. दुस-या दिवसापासून सुट्ट्या सुरू झाल्यामुळे राहूलचे मित्र किंवा इतर शिक्षक यापैकी कुणाचीच भेट झाली नाही. आज निकालाच्या दिवशी शाळा परत एकदा गजबजून गेली होती. सर्वांची निकालपत्रे देऊन झाली होती. आठवीच्या क्लासटिचर कडून एव्हाना राहूलच्या चित्रकलेच्या पेपेरविषयी सर्वांना समजले होते. त्यामुळे राहूलच्या निकालाचे काय झाले याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. पण राहूल आठवीतून नववीत गेला होता. मात्र त्याचा नंबर ‘सातवा’ आला होता. राहूल नापास झाला नव्हता. कॉपी करूनही त्याला शिक्षा झाली नव्हती आणि याचंच सर्व स्टाफला आश्चर्य वाटत होतं. देशमुख सरांनी अशी ढिलाई का दाखवावी हेच कुणाच्या लक्षात येत नव्हतं. शेवटी देशमुख सरही चारचौघांसारखेच निघाले, तोंड बघून निर्णय घेतला या निष्कर्षापर्यंत सगळेजण येऊन पोचले. 

तिकडे स्टाफरुममध्ये काय चाललं असेल, काय कमेंटस् चालू असतील याची देशमुख सरांना कल्पना होतीच. त्यांनी शिपायाला बोलावून घेतले आणि लिहून झालेली नोटीस स्टाफरुममध्ये सर्वांना दाखवायला सांगितली. 

पाच मिनिटातच सर स्टाफरुममध्ये हजर झाले. स्टाफ मिटींगला त्यांनी सुरुवातच केली. शाळेच्या वार्षिक परिक्षेचा चांगला लागलेला निकाल, सहकारी शिक्षक-शिक्षिकांनी वर्षभर घेतलेले कष्ट, विविध स्पर्धातील यश या सर्वांचा उल्लेख करून सर्वांचे कौतुक केले आणि ते समारोपाकडे वळले, 

‘‘माझ्या सहकारी बंधू भगिनींनो, आता मी निरोपाकडे वळत आहे. पण मगापासून असलेली शांतता आणि तुमच्या चेह-यावर असणारी नाराजी याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, ‘‘सर, असं कसं वागू शकतात?” स्वत:ला शिस्तप्रिय म्हणवून घेणा-या सरांची शिस्त आता कुठे गेली? बरोबर ना? नाही, मी तुम्हाला अजिबात दोष देणार नाही. तुमच्या जागी मी असतो तर माझ्याही मनात हेच प्रश्न आले असते. मग मी असा का वागलो? मला माहीत आहे की, आठवीतल्या राहूलने चित्रकलेच्या पेपरला केलेला प्रकार एव्हाना तुम्हाला सर्वांना समजलेला आहे. त्यामुळे त्याला मी सैल का सोडले असं तुम्हाला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याचं स्पष्टीकरण देण्यापूर्वी मी तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगणार आहे. 

तुम्हा सर्वांना माहीत आहेच की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. इथे काहीसं तसंच घडलं आहे. एका मध्यम आकाराच्या शहरामध्ये एक अतिशय उत्तम हायस्कूल होतं. त्या शाळेचा दबदबा अख्ख्या तालुक्यात होता. त्याचं कारण म्हणजे त्या शाळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक! शिस्त आणि अध्यापन या बाबतीत त्यांचा हात धरणारा जिल्ह्यात तरी दुसरा कुणी नव्हता. त्यांच्याच शाळेत असा एक प्रकार घडला की जो आपल्या शाळेत यावर्षी राहूलच्या बाबतीत घडला. त्यांच्या शाळेतील अशाच एका हुशार विद्यार्थ्याने चित्रकलेच्या पेपरमधील वर्तुळातील नक्षी काढण्यासाठी एका साधनाचा वापर केला होता की जे परिक्षेत वापरता येत नाही. त्यावेळेला त्याच्या शिक्षकांनी त्याला हातोहात पकडून त्याच्या हेडसरांपुढे उभे केले होते. आपलं आता काय होणार या विचाराने तो हुशार विद्यार्थी घामाने डबडबला होता. प्रगती पुस्तकावरील ‘नापास’ चा शेरा त्याला डोळ्यासमोर दिसू लागला होता. ‘कॉपी करणारा मुलगा’ हे वाक्य त्याच्या कानात घुमू लागले होते. 

हेडमास्तरांनाही आश्चर्य वाटले. अशा हुशार विद्यार्थ्याकडून कॉपी आणि ते ही चित्रकलेत? त्यांना खरंच वाटेना. खरं तर त्यांचा क्रोध अनावर होत होता. पण पुढे घामाने डबडबलेला आणि कुठल्याही क्षणी डोळ्यातून पाणी ओघळू लागेल अशा अवस्थेतला तो विद्यार्थी पाहून त्यांनी राग आवरता घेतला आणि त्याला खरं काय घडलं ते सांगायला सांगितलं. त्यानं जे सांगितलं ते अगदी खरं होतं. तो म्हणाला होता की, काही मुलांनी त्याला सांगितलं होतं की असा थोडासा वापर केला तर चालतं. त्याला ‘कॉपी’ म्हणत नाहीत. आम्हीपण करणार आहोत. त्याला ते खरं वाटलं आणि त्याने त्या साधनाचा वापर केला की ज्याला परवानगी नव्हती. तो पकडला गेला. त्याच्या सरांनी काही वेळ विचार केला आणि त्याला काही गोष्टी सांगून जायला सांगितले. मी ही तेच केलं. मी ही राहूलला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्याला घरी जायला सांगितलं.”

सर क्षणभर थांबले, हसले आणि म्हणाले, ‘‘नाही पटत माझं स्पष्टीकरण? माहीत आहे मला. पण एकच सांगतो, त्या गोष्टीतला मुलगाच तुम्हाला हे सगळं सांगतोय. यावर विश्वास ठेवा मित्रांनो, होय माझ्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग आहे. अगदी तसाच राहुलच्याही आयुष्यात घडावा याचंच मला आश्चर्य वाटलतंय. माझ्या सरांनी मला त्यावेळी जे सांगितलं आणि जी वागणूक दिली तेच मी राहूलच्या बाबतीत केलं. राहूलचे वडील एक सरकारी अधिकारी आहेत म्हणून मी त्याला शिक्षा केली नाही असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाही. मी फक्त माझ्या सरांचा कित्ता गिरवला. मला त्यावेळी सरांनी नापास केलं असतं तर ते त्यांच्या शिस्तीला धरूनच झालं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यांना खात्री होती की एवढा हुशार विद्यार्थी कॉपी आणि तेही चित्रकलेच्या पेपरात करणे शक्यच नाही. मित्रांच्या चेष्टेला आणि थापांना तो बळी पडला आहे हे त्यांनी ओळखलं. उलट त्याला शिक्षा म्हणून नापास केलं किंवा पालकांना जाऊन सांगितलं तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतील कारण तो विद्यार्थी सरळमार्गी, निरुपद्रवी आणि हुशार होता. त्याच्यावर कायमचा ‘नापास’ चा शिक्का बसला असता. एवढंच नव्हे तर त्यातून तो चुकीच्या मार्गानेही गेला असता. मित्रांनो, शिस्त लावायची म्हणजे फक्त शिक्षाच करायची असा अर्थ होत नाही. शिक्षा हा शेवटचा उपाय असतो. गुन्हा करणारा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे काय हे ही बघायला नको का? मी मित्रांच्या सल्ल्याला बळी पडलो तसा राहूलही पडला आणि फसला तो!

त्याला समजुतीचे शब्द सांगितले आहेत मी आणि गोड शब्दात दमही भरला आहे. एवढेच नव्हे तर चित्रकलेच्या पेपरला जास्त गुण पडत असूनही त्याला पास होण्यापुरते पस्तीसच गुण द्यायला सांगितले आहेत. शिवाय इतर सर्व विषयात त्याचे पाच पाच गुण माझ्या अधिकारात मी कमी केले आहेत. त्याचा परिणाम काय झाला? त्याला मिळायची ती शिक्षा मिळाली आहे. कधीही नंबर न सोडणारा राहूल आज सातव्या क्रमांकावर आहे. त्याच्यासारख्या हुशार आणि सच्च्या विद्यार्थ्याला ही शिक्षा पुरेशी आहे असं मला वाटतं. माझा निर्णय चुकत असेल तर खुल्या मनाने सांगा. त्या चुकीची शिक्षा भोगायला मी तयार आहे.” 

सर्व स्टाफ विचारमग्न दिसत होता. चूक की बरोबर? पण चेह-यावर दिसणारा मगाचा राग मात्र आता कुणाच्याच चेह-यावर दिसत नव्हता. इतक्यात कला शिक्षक पुढे आले आणि सरांकडे वळून म्हणाले, ‘‘सर, आम्ही कला शिकवतो. कलाकार, चित्रकार निर्माण व्हावेत म्हणून प्रयत्न करत असतो. पण विद्यार्थी कसा घडवावा म्हणजे त्यातून माणूस कसा घडेल हे मात्र आज तुमच्यामुळे समजले. तुम्ही तुमच्या सरांच्या विश्वासाला पात्र ठरला आहात, राहूलही आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरेल. कारण तुम्हीच आत्ता म्हणालात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.” 

सर थांबले. टाळ्यांचा होणारा कडकडाट सांगत होता, हेडसरांचा निर्णय अगदी योग्य होता.  

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments