सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ ती साडी… – भाग-२ ☆ सुश्री सुनिता गद्रे
(रेणूने सासूने आणलेली साडी त्यांना अपमानास्पद वागणूक देत घरच्या कामवाल्या मावशीला देऊन टाकली.) आता पुढे….
आशा मावशींना काहीच सुचेना. त्या बुचकळ्यात पडल्या.
“घ्या मावशी, साडी छान खुलून दिसेल तुमच्या अंगावर!”… सासुबाई मनापासून म्हणाल्या. थोडा वेळ गप्पच होत्या. नंतरआपल्या मनातली खदखद व्यक्त करत पुढे म्हणाल्या,”हे जे काही आयुष्यात घडतंय ना त्यामुळे वाईट वाटतं.पण सरते शेवटी ते आपल्या भल्यासाठीच असतं असं म्हणून सोडून द्यायचं. राहणार होते एक,दोन दिवस…. पण आज संध्याकाळीच घरी मुंबईला जाईन.मलाही अमेरिकेला जायची तयारी करायचीय.” सासुबाईंनी आपला नव्याने बनवलेला प्लॅन सांगून टाकला. “एक सांगू का आई तुम्हाला, आता तिकडचा मुंबईतल्या पावसाचा जोर कमी झालाय. पण इकडे जोरात पडणार आहे असं वाटतंय. तुम्ही लवकर सुखरूपपणे घर गाठावं हेच बरं.”सांगितल्यावर, पुन्हा जरा विचार करून आशा मावशी म्हणाल्या,….” आणि हो, इथली.. आणि साहेबांची काळजी अजिबात करायची नाही.या येड्या- बागड्या ध्यानाचा विचित्र स्वभाव ,विचित्र वागणं.. बोलणं, याची आम्हाला सवय झालीय. साहेब म्हणजे देव माणूस… पगार पण चांगला देतात… अडचणीत मदत करतात. त्यामुळंच मी,स्वयंपाकीण काकू, माळी दादा इथे टिकून राहिलोय .नाहीतर आम्हाला गुलाम समजणाऱ्या या बाईकडे आम्ही ढुंकूनही पाहिलं नसतं.” बोलताना आशा मावशीचा सात्विक संताप उसळून आला होता.
संध्याकाळी चहाची तल्लफ आली तशी रेणू खाली उतरली.आणि सासूबाईंची चाहूल लागली नाही त्यामुळे मनातून खुष झाली. आल्याचा वाफाळलेला चहा पिता पिता म्हणाली,”आशामावशी यार, आता हा आठवडा खूप काम आहे मला. मी खाली पण उतरणार नाही. त्यामुळे माझा ब्रेकफास्ट, लंच सगळं सगळंच वर आणून द्यायचं. ओके?”
बाहेर पावसाला खळ नव्हती.नदीचं पाणी वेगानं वाढत होतं…’पूर येणार असं वाटतंय’…. गावभर बोललं जाऊ लागलं होतं.पण रेणूला त्याची खबरबात नव्हती. माळी दादा, स्वयंपाकीण काकू दोघांचे पाठोपाठ फोन आले.घरात पाणी घुसलंय ,त्यामुळे ते येऊ शकणार नव्हते. आशा मावशीनं सगळं रेणूच्या कानावर घातलं. पण तिला कशाचीच फिक्र नव्हती. ऐकल्यावर थोडावेळ ती विचारात पडली,’ ही गोरगरिबांची घरं म्हणजे अशीच असतात नदीकाठी, लोअर एरियात.. त्यामुळे दर पावसाळ्यात पूर ठरलेला.’पुन्हा भूतकाळात शिरून ती विचार करू लागली,”आपला हा अवाढव्यव बंगला, डॅडीने किती विचारपूर्वक अगदी योग्य जागी बांधलाय. बांधकाम पण असं की ना भूकंपाचा डर ना पूराची भीती…. शेवटी सिव्हिल इंजिनियर आणि आर्किटेक्टची बुद्धी’!…. छोटे शहर असले तरी लहानपणापासून सुट्टीत डॅडी बरोबर ती इथे येऊन राहायची. तिचं मन रमायचं.
आईचा स्वभाव वेगळा! मिडलक्लास मेंटॅलिटीतून ती कधी बाहेरच पडली नाही. डॅडीचं आणि तिचं भांडण चालायचं. शेवटी डायव्होर्स झाला ….आई बद्दल कधी तिला प्रेम वाटलंच नाही. आई निघून गेल्यावर तर स्वच्छंद वागणं, पैसा उडवणं ,समाजाचे निती नियम मुद्दामून ठोकरणं यातच तिला आनंद वाटू लागला. शाळा, कॉलेजात पण तिची कुणाशी फारशी मैत्री नव्हती. आपण सगळ्यांपेक्षा वेगळे , उच्च आहोत. ही भावना तिच्या मनात रुजली होती. ती मान्य करत नसली तरी चित्रकलेचा वारसा तिला आईकडून मिळाला होता… आणि स्वभावाचा वडिलांकडून!बेपरवाही, अहंकार, उर्मटपणा हे जणू तिचे दागिनेच होते.
दहा-बारा वर्षाची असताना टीव्हीवर वरचेवर येणारी एक जाहिरात रेणू पहायची. त्यातली मॉडेल स्टार म्हणायची,”समझौता मैं नही करती… चलता है मैं नही कहती… मुझे चाहिए सिर्फ सौंदर्य साबून लक्स…” बस्स, तेव्हापासून तिला जगण्याचा एक फंडाच मिळाला होता.
“व्वाव्,क्या बात है! असंच जगलं पाहिजे. तडजोड ,चालवून घेणं.. छीऽ! असल्या मान खाली घालून जगण्याला काय अर्थ आहे?’ तिचं तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान सगळं या तत्त्वावर उभं राहिलं होतं. ‘मला लक्षात आहे तेव्हापासून तरी आयुष्यात मी कधीच रडले नाही.मी स्ट्रॉंगआहे….कॉन्फिडंट आहे… मला इतर कुणाचीही गरज नाही….मी स्वावलंबीआहे… कुठल्याही संकटाला पळवून लावण्यास मी समर्थ आहे…..’ तिचे विचार चक्र चालूच होते. जेव्हा चंदननं तिला प्रपोज केलं तेव्हा तिने हेच ठासून सांगितलं होतं.’शिवाय पहिला काही काळ आपण लिव्हिंग मध्ये राहू. पटलं तर लग्न…. नाही तर आपले मार्ग वेगळे !’चंदन संगीतकार होता .त्याचा आपला एक बँड- ग्रुप होता. देश विदेशात त्यांचे कार्यक्रम चालायचे. आपली पत्नी एक साधारण गृहिणी असावी अशी त्याची अपेक्षाही नव्हती.त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन छान चालले होते.
क्रमशः …
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈