श्री मेघ:श्याम सोनावणे
जीवनरंग
☆ आव्हान ! — (एक सत्यकथा)… भाग – 1 — श्री प्रमोद टेमघरे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
मॅनेजर साहेब केबिनमध्ये, डोके गच्च धरून बसले होते. त्यांच्या अविर्भावाकडे पाहून माझ्या लक्षात आले की, नुकताच वरिष्ठ कार्यालयातून फोन येऊन गेलेला दिसतोय. एक बरे असते, डोके हातात धरले की स्वतःला डोके आहे याची खात्री पटते.
मी बावळट चेहरा करून आत शिरलो. चिंता जास्त असली की साहेबांच्या कपाळावरचे आठ्यांचे आडवे जाळे अधिक विस्तारते. मी त्यांना दुःखी सूर काढून विचारले, ” काय झाले साहेब? “
डबल दुःखी स्वरात साहेब उत्तरले, ” नेहमीसारखे- वरचे साहेब झापत होते. आपल्या शाखेत अजून सहाशे लोन डॉक्युमेंट, ‘टाइमबार’ आहेत म्हणून. ताबडतोब रिन्यू करा म्हणाले.”
ही गोष्ट १९८२ सालची. मी नुकताच बँकेच्या या पेण शाखेत अधिकारी म्हणून बदली होऊन आलो होतो. बँकेने कर्ज दिल्यानंतर, कर्जाच्या कागदपत्रांचे दर तीन वर्षांनी, ‘नूतनीकरण’ करावे लागते. म्हणजे कर्जदाराला प्रत्यक्ष भेटून या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घ्याव्या लागतात. अशी सहाशे कर्जदारांची कागदपत्रे ‘मुदतबाह्य’ झाली होती.
तांत्रिक दृष्ट्या हा प्रश्न नक्कीच गंभीर होता. पण वस्तुस्थिती अशी होती की, ही सर्व ‘खावटी’ कर्जे आदिवासी, कातकरी आणि ठाकर जमातीला पूर्वी दिली गेली होती. एका राजकीय समारंभाची ही देणगी होती.
हे सारे कर्जदार, पेणला लागून असलेल्या सह्याद्रीच्या उपरांगातून दुर्गम जंगलात राहत होते. तिथे जायला फक्त डोंगरात चढत जाणारी पायवाट आणि सोबत जाणकार असेल तरच ती पायवाट सापडेल अशी स्थिती. सगळ्या कर्जदारांना भेटायचे तर पन्नास साठ किलोमीटर जंगलात चालत, भटकावे लागणार. कर्जदाराऐवजी वाघाची गळाभेट होण्याची शक्यता जास्त ! त्यामुळे कोणाचीही या कामासाठी जाण्याची हिम्मत नव्हती.
प्रत्येक कर्जदाराच्या कर्जबाकीची रक्कम काही फार मोठी नव्हती. अगदी रुपये तीस पासून दोनशे पर्यंत फक्त. व्याजदर ४%. पण एकूण कर्जदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे मुदतबाह्य कागदपत्रेही खूप. कागदपत्रांवर पत्ता शोधला तर विराणी कातकरी पाडा, ठाकरपाडा, वाघमारे पाडा, पड्यार पाडा, अशी अनेक पाड्यांची नावे होती.
मी मामलेदार ऑफिसमध्ये जाऊन, गाववार इलेक्शन यादी शोधण्याचा प्रयत्न केला. पण हे पाडे आणि माणसांची नावे काही आढळली नाहीत. (त्यावेळच्या इलेक्शन यादीत हे आदिम मानव भारताचे नागरिकच नव्हते). थोडक्यात, प्रत्यक्ष जाऊन शोध घेणे हाच मार्ग बाकी होता.
पेण परिसरात कातकरी आणि ठाकरं या आदिवासी जमाती जंगलात राहात आहेत. पूर्वी या महाल मिऱ्या डोंगरात, खैराची झाडी विपुल होती. कातकरी आदिवासी या खैराच्या झाडांना बुंध्यावर कोयत्याने खाचा पाडायचे. यातून जो चीक/काथ (खायच्या पानात वापरताच तो), गोळा होईल तो, जवळच्या गावात जाऊन विकायचा. काथ विकणारे हे ‘काथोडी’ म्हणजेच कातकरी.
यांच्यासारखीच आदीम जमात ठाकरांची. ठाकरं डोंगरात अजून दुर्गम भागात वीस- पंचवीस कुटुंबांचे पाडे करून वस्ती करतात. दिवसभर कष्ट करून झाडावरची सुकी लाकडे गोळा करायची, त्याची मोळी बांधायची आणि पेणला येऊन विकायची. मध गोळा करायचा, हरडा, बेहडा, वाघनखी, नरक्या, रानहळद, काळी मुसळी, यासारख्या औषधी वनस्पती गोळा करायच्या आणि गावात येऊन मुकादमाला विकायच्या. हे मुकादम आदिवासींकडून अत्यंत कमी किमतीत या औषधी वनस्पतींची खरेदी करून, औषध कंपन्यांना जास्त किमतीत विकून गब्बर झालेले होते.
ठाकरं डोंगर उतारावर नाचणी पिकवायचे. जंगलातून कंद, फळे, रानभाज्या मिळवायचे. ओहळात बांबूच्या सापळ्यात, नाहीतर लुगड्यात, मासे पकडायचे. अधून मधून घोरपड, रानडुक्कर, भेकर, ससे यांची शिकार करायचे. पेणमध्ये दर मंगळवारी बाजाराच्या दिवशी, ओले काजूगर, बोंडू, जांभळे, तोरण, करवंदे,मध, रानभाज्या आजही ही ठाकरं आणि कातकरी विकतात.
माझे मूळ गाव पेण, त्यामुळे या परिसराची मला माहिती होती. त्यातच, कॉलेजच्या वयात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जवळजवळ तीनशे किल्ले भटकलो होतो. जंगलात मुक्काम केला होता. अरण्य वेद, वनस्पतिशास्त्र, याचा थोडाफार अभ्यास होता. पेण परिसरातील, पेणपासून सात-आठ किलोमीटर अंतरावरचा सांकशीचा किल्ला, महाल मिऱ्या डोंगर परिसर, जवळचे सुधागड, धनगड, सरसगड, अवचित गड, तळगड, कर्नाळा, प्रबळगड, माणिक गड, असे सारे किल्ले भटकलो होतो. त्यामुळे नोकरीतले, कागदपत्रे नूतनीकरणाचे आव्हान मी स्वीकारले. सोबतीला कोणीतरी असणे आवश्यक होते.
आमच्या शाखेत भावे म्हणून क्लार्क होता. यूथ होस्टेलमार्फत हिमालयात भटकून आलेला. तो लगेच माझ्यासोबत यायला तयार झाला. पेणमध्ये सहकार खात्यात, वडगावचे ठाकुर पाटील कर्जवसुली अधिकारी होते. माझी त्यांची ओळख होती. तेही सोबत यायला तयार झाले. त्यांनी त्यांच्या शेतावर काम करणार्या, ‘मंगळ्या’ नावाच्या ठाकर जमातीतल्या तरुणाला, पायवाटा शोधणारा माहितगार म्हणून बरोबर घेतले.
मग ठरले. मी साहेबांना सांगितले, “आता तीन-चार दिवस आम्ही या कागदपत्रे नूतनीकरण मोहिमेवर जंगलात जातोय. आमचा संपर्क नसेल. पण मोहीम फत्ते करूनच येऊ.” घरच्यांना कल्पना दिली. चार दिवस पुरेल असा शिधा सोबत घेतला. बँकेत बसून, सहाशे नूतनीकरणाचे सेट, स्टॅम्प पॅड, पावती पुस्तक, कर्जदारांची यादी, सोबत घेतली. सर्वात महत्वाचे म्हणजे, हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून, पाटील यांनी त्यांची परवाना असलेली ‘ठासणीची बंदूक’ सोबत घेतली. सर्व तयारी होईपर्यंत दुपार झाली. बँक मॅनेजर साहेबांच्या आशेने भरलेल्या डोळ्यांकडे पाहत, आम्ही पेणचा निरोप घेतला.
वडगावमार्गे सह्याद्रीच्या डोंगरावर पायवाटेने चढायला सुरुवात केली. जंगल सुरु झाले. आजूबाजूला ताम्हण, कुंभा, पळस, पांगारा, उंबर, बहावा, आंबा, जांभूळ, चिंच, काजू, यासारखी वेगवेगळी झाडे, झुडपे आणि रानवेली लागत होत्या. सारा चढ होता, पण हातापायात तरुणाईच बळ होतं, निसर्गाचं वेड होतं, आणि भटक्यांची सोबत होती.
मंगळ्याच्या तीव्र दृष्टीला दूरवर एका उंच झाडावर चढलेले कातकरी दिसले. चला, पंधरा-वीस कातकरी भेटणार म्हणून झपाट्याने त्या दिशेने निघालो. जवळ गेलो तर ते सारे तिथून पळून जाताना दिसले. हाका मारल्या तरी सर्व गायब झाले. अस्वलाच्या अंगावर केस असावे तशी आजूबाजूला गर्द झाडी होती. त्या झाडीत ते गुडूप झाले.
कातकरी आणि ठाकरांना भेटण्याची आमची कामगिरी किती कठीण आहे ते लक्षात आले. आमचे शहरी कपडे, सोबत बंदूक पाहिल्यावर, आम्ही वनखात्याची माणसे आहोत असे समजून ते पसार झाले होते.
उंच कुंभ्याच्या झाडाजवळ पोहोचल्यावर लक्षात आले की, ते घोरपड पकडत होते. कातकरी घोरपडीच्या मागे धावत आले, की ती झाडावर चढते. ती आजूबाजूच्या फांद्यांवर न जाता मधल्या भागातील सरळ शेंड्याकडे चढत जाते. घोरपडीचे हे वैशिष्ट्य आदिवासींना माहीत असते. ते सरळ चढत झाडाच्या शेंड्यापर्यंत जातात आणि तिची शेपटी पकडतात. या शेपटीची गाठ मारली की, घोरपडीला वाटते की, तिला बांधून ठेवले आहे. ती एकाच जागी थांबते. कातकरी मग तिला पकडून तिचे मांस खातात. चरबीचे तेल औषध म्हणून विकतात.
आधाराला एक काठी आणि अपयश हातात घेऊन आम्ही जंगलातून पुढे निघालो. वाटेत मध्येच पळणारा एखादा कोल्हा, ससा आढळत होता. काळोख पडायला सुरुवात झाली. आता आम्ही जंगलातल्या व्याघ्रेश्वराच्या देवळाजवळ येऊन पोहोचलो होतो.
— क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री प्रमोद टेमघरे, पुणे
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈