श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘सांज…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆
दुपार ढळत आलेली बिछान्यावरून उठतानाच नकोसे वाटत होते. अलीकडे असेच होत होते. झोप लागते असेही नाही पण उठावं असे वाटत नाही. अलीकडे थकवा जाणवत राहतोच. कितीही नको वाटले तरी उठायला हवेच.
स्वयंपाकघरातून तिची हाक आली आणि पाठोपाठ भांड्यांचा आवाज आला.. ‘उठली वाटते.. ‘ ..मनात विचार आला. आता मात्र उठायलाच हवं. उठता उठता नकळत नजर घड्याळाकडे गेली. चार वाजायचे होते. चार ही दुपारच्या चहाची वेळ. ‘ आलो ‘ तिच्या हाकेला उत्तर दिले आणि उठून लोडाला पाठ टेकून बसलो. आता पूर्वीसारखे झटकन उठून आत जाणे जमत नाही. तिलाही आणि मलाही. तिला ते जाणवले होते त्यामुळे पूर्वीसारख्या एका पाठोपाठ एक अशा हाका ती मारत नाही. मी स्वयंपाक घरात जाई पर्यंत वाट बघत बसते. तिचीही अवस्था तशीच आहे पण ती मला जाणवून मी काळजी करत बसू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करते. मी समोर दिसलो की ठेवणीतली ताकद वापरून चटपटीतपणे वागायचा प्रयत्न करते.
मला सारेकाही ठाऊक असले तरी मी तसे तिला जाणवू देत नाही. मी आत जाऊन खुर्चीवर बसल्यावर ती चहाच्या आदणात साखर घालते. दुसऱ्या बाजूच्या गॅसवर दूध तापवत ठेवले. अलीकडे तिलाही बसाय-उठायचा त्रास होतोच. तिला किती वेळा सांगितले गॅसचा कट्टा करून घेऊया म्हणून .. पण ठामपणे नाही म्हणाली. पूर्वी चूल होती तेंव्हा खाली बसून स्वयंपाक करावा लागत होता..तसा फूटभर उंचीचा स्वयंपाक कट्टा होताच. नंतर गॅस आला तेंव्हा गॅस साठी कट्टा करूया म्हणून किती मागे लागलो पण गॅसवरही खाली बसूनच स्वयंपाक करायचा हट्ट काही तिने त्यावेळीही सोडला नव्हता आणि आत्ता बसाय- उठायचा त्रास हाऊ लागल्यानंतरही हट्ट सोडला नाही.
तिने तिथे बसूनच चहाचा कप माझ्या हातात दिला.
“साखर संपत आलीय. आणायला पाहिजे. “
तिने मला परत आठवण करून दिली. परवापासून तिने मला दोनदा संगितले होते. मी नुसताच हुंकार दिला.
काही महिन्यापूर्वीची गोष्ट असती तर मी लगेच जाऊन साखर आणलीही असती पण मागे एकदा फिरून की दुकानातून काहीतरी घेऊन परत येताना, नेमकं कुठून ते आठवत नाही, पण मला चक्कर आल्यामुळे एकट्याने बाहेर जाण्याएवढाही आत्मविश्वास मला वाटत नव्हता. बरे, दुकानाचे अंतरही थोडे थोडके नव्हते. मुख्य बाजार तर सोडूनच द्या पण जवळचे किराणा दुकानसुद्धा दीड-दोन किमी वर आहे.
मस्त हवेशीर घर हवं..गजबजाटापासून दूर, शांत- निवांत.. मोकळं ढाकळं आवार..स्वतःची छानशी बाग..उजेड, वारा भरपूर.. तिची घराची कल्पना तिने सांगितली तेंव्हाही मला ती आवडली होती. म्हणून तर शहरापासून दूर अशी ही जागा मिळाली तेंव्हा मलाही तिच्याइतकाच आनंद झाला होता. साधेच पण ऐसपैस घर बांधले. पुढे छानसा व्हरांडा. व्हरांड्यात बसून, अंधाराची रजई हळूहळू हळुवारपणे दूर सारत जागी सकाळ अनुभवत, दूरवरच्या डोंगराच्या कुशीतून अलगदपणे उठत अलिप्त होणारा सूर्य न्याहाळत पहिल्या चहाचा आस्वाद घेणे दोघांनाही आवडायचे. आणि ऑफिस मधून परतल्यावर संध्याकाळचा चहा परसदारी मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने कधी नारळ, आंब्याभोवतीच्या पारावर तर कधी परसदारी तिने खास बांधून घेतलेल्या कट्ट्यावर व्हायचा. अगणित दिवस असेच उगवले होते आणि असेच मावळले होते.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈