श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘सांज…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆
3 जीवनरंग:
सांज….2
आनंदहरी.
कथा :- सांज
आनंदहरी
भाग : दुसरा
लग्नाआधी तिने एकदा स्वतःच्या घराचे स्वप्न सांगितले होते. लग्नानंतर घर बांधायचा विषय निघाला तेंव्हा तिने ते पुन्हा सांगितले होते.. नुसतेच सांगितले होते असे नाही तर त्याबरहुकूम बांधूनही घेतले होते. परंपरा आणि नवता यांचा सुंदर संगम तिने घर बांधताना साधला होता.
“मी केवळ स्वयंपाक घराची नव्हे तर संपूर्ण घराची स्वामीनी आहे.. सारे माझ्या मनाजोगतं करून घेणार आहे.. चालेल ना रे तुला ? ”
घर बांधायचा विषय निघाला तेंव्हा ती हसत हसत म्हणाली होती.
इतरवेळी ‘अहो- जाहो ‘ असे आदरार्थी संबोधणारी ती , जेंव्हा तिला तिच्या मनासारखे करून घ्यायचंच असते तेंव्हा ‘ चालेल ना रे तुला ? ‘ असे हमखास म्हणते.. ते ही हसत हसत.
“अगं, तुझ्या मनाचे अवघे घरच मला देऊन टाकलंयस.. तिथे या घराचे काय घेऊन बसलीयस ? “
“म्हणजे ? तुझ्या मनाचे घर मला नाहीस का दिलेले ? आणखी कुणी आहे वाटते “
“तुम्ही बायका म्हणजे.. कोणत्या बोलण्यातून कोणता अर्थ काढाल काही सांगता येत नाही.”
“तुम्ही पुरुष म्हणजे कधी काय कसे आणि नेमक्या कोणत्या अर्थाने बोलाल .. काही सांगता येत नाही ? स्पष्ट असे कधी बोलायचंच नाही. बरे, त्यातून काही बोलायला, विचारायला गेलं की आहेच ‘ तो मी नव्हेच ‘ चा प्रयोग. “
मी हसलो होतो. तिचं हे शेवटचे वाक्य म्हणजे तिच्या बोलण्यात अनेकवेळी हमखास येणारे वाक्य. सुरवातीला मी त्यावरही बोलायचा प्रयत्न करायचो पण काही दिवसातच लक्षात आले ते वाक्य म्हणजे त्याविषयावरील संवादाला तिने दिलेला पूर्णविराम आहे.
“ए, आपण घरात काहीच फर्निचर आणायचे नाही हं.. घर कसे मोकळे -ढाकळे हवे.. उगा फर्निचर ची गर्दी नको. हां..फक्त तुझ्यासाठी मी दोन आरामखुर्च्या तेवढ्या आणणार आहे हं ! तुला आरामखुर्चीत बसून वाचायला आणि वाचता वाचता चहा ढोसायला आवडतो ना म्हणून.. “
सारे जग चहा पिते, मी मात्र चहा ढोसतो हे तिचे माझ्या चहाच्या आवडीबद्दलचे प्रामाणिक मत.
“आगं, एक आहे ना आरामखुर्ची ? आणखी दोन कशाला ? “
” एक व्हरांड्यात आणि दुसरी परसात ठेवणार..”
” आगं, घडीची आरामखुर्ची सोप्यातून हवी तिथे घेऊन जाता येईल की..”
” राजे स्वतःचं सिंहासन घेऊन इकडे तिकडे फिरतायत… कसे वाटेल ते बघताना ? मला नाही हं आवडणार ते..”
ती खट्याळपणे हसत म्हणाली होती.
“आगं, पण म्हणून आणखी दोन..? हवेतर तू ठेवत जा इकडे तिकडे. “
” गृह राज्याची स्वामींनी कोण आहे ? “
” तू .”
” हो ना ? मग ‘हुकूम की तामिल हो!”
शेवटी तिने दोन आरामखुर्च्या आणल्याचं त्याही वेगवेगळ्या रंगाच्या कापडाच्या..”
” आगं, काय हे गुलाबी कापड ? व्हरांड्यातल्या खुर्चीला हिरवं.. सोप्यातल्या खुर्चीला निळं.. आणि परसातील खुर्चीला गुलाबी ? “
” हं ! तुझी सकाळ हिरवीगार प्रसन्न व्हावी.. दुपार शांत निळाई लेवून यावी असे वाटते रे मला आणि..”
ती ‘ आणि ‘ म्हणून थांबली. तिची ही नेहमीचीच सवय. एखाद्यावेळी लक्ष पूर्णपणे वेधून घ्यायचे असेल आणि उत्सुकता वाढवायची असेल तर ती ‘ आणि..’म्हणून थांबते.
” आणि काय..? “
” आणि काही नाही. “
माझी उत्सुकता आणखी वाढली.
” सांग ना .. आणि काय ? “
” असा कसा रे तू ठोंब्या.. तुला काहीच कसे कळत नाही. ता वरून ताकभात सुद्धा कळत नाही तुला…”
ती काहीशी लटक्या रागाने पहात म्हणाली.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈