श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सांज…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी  

आठवणींच्या गाठी कधी अवचित सुटतात, कधी ती सोडत बसते.  त्या कधी सुखावतात कधी मनाला विद्ध करतात . मग आठवणींची दुखरी नस ठसठसत राहते.. बराच काळ. अलीकडे तिचे असेच होते. मग ती कधी त्यातच रमून जाते, कधी एखाद्या आठवणीच्या पोळ्यावरील मधमाशा तिच्या मनाला डसत राहतात. म्हणून मला आठवणींच्या गाठी आपोआप उकलणे आणि सोडवत बसणे नकोच वाटते.. मग मी तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी विषय बदलतो तसाच विषय बदलण्यासाठी मी तिला ते विचारले होते

मी विषय बदलण्यासाठी  ‘आणखी काय आणायचं आहे ‘ हे विचारतोय हे तिच्या लक्षात आले तशी ती हसली. मी पटकन चहा पिऊन कप खाली ठेवला.  तिने चहाचे भांडे, कप पाटीत ठेवले. मी ती पाटी उचलू लागलो तशी ती म्हणाली,

“असू दे उठून मी न्हेते बाहेर आणि धुवून टाकते.”

तिला उठायचाही त्रास होतो. गुडघे तर दुखतातच पण अलीकडे सायटीकाचा त्रास ही होतो म्हणते.. पण तरीही खाली बसून काम करणे सोडत नाही. किती वेळा म्हणले उंच ओटा बांधून घेऊया.. सिंक बसवून घेऊया.. तुलाच बरे होईल… तिचा स्पष्ट नकार. तिला स्वयंपाकगृहाच्याजवळ बाहेरच असणाऱ्या  कर्दळी आणि आळु जवळ असणाऱ्या दगडावर भांडी घासायला- धुवायला आवडतं. तरी बरे त्या दारातून बाहेर पडायला एकच छोटीशी पायरी आहे.

परसदारातून परसात उतरण्यासाठी चार पायऱ्या आहेत..पण तिला त्या उतरून परसात जाणे नकोसे वाटते.  ती सांगत नसली तरी तिला त्याचा त्रास होतो, पायऱ्या चढता-उतरताना असह्य वेदना होतात हे मी जाणून असतो..

“आता आराम खुर्चीतून उठायला जमत नाही पटकन.. जरा त्रासाचेच वाटायला लागलंय मला. “

मी तिला एकदा म्हणालो, ती काहीही न बोलता नुसतीच हसली, सारे काही समजल्यासारखी.  आणि तेंव्हापासून संध्याकाळचा चहा मी परसदारातच पायरीवर बसून घेतो. ती दाराजवळ खुर्ची घेऊन चहा पिता पिता, माझ्याशी बोलता बोलता परस न्याहाळत बसते.. डोळ्यांत साठवून ठेवत असल्यासारखी. अलीकडे बऱ्याचदा सांजेचा चहा ही घरातच होतो. परसातली गुलाबी खुर्ची आताशा रिकामीच असते.

ती चहाचे पातेले, कप धुवून आत आली. ते जास्थानी ठेवेपर्यंत मी ते दार लावून सोप्यात आलो. ती ही पाठोपाठ सोप्यात आली. सोप्यात बसले तरी खिडकीतून दूरवरचे दिसतेच. ती कुंपणभिंतीबाहेरचा रस्ता न्याहाळत बसते. पूर्वी  त्या रस्त्यावरून कधीतरी एखादी सायकल, एखादे वाहन जात- येत असायची पण आता सायकल क्वचित एखादीच दिसते पण दुचाकी, चार चाकीं, माल वाहतूकीची विविध वाहने आणि आणि अधून-मधून जाणाऱ्या-येणाऱ्या बसनी रस्ता तुडुंब भरून वाहत होता..प्रवास हेच जीवन झालंय की काय असे वाटू लागलंय.. वाहनांचे आवाज, हॉर्न चे आवाज.. यामुळे सारा परिसर अगदी पहाटेपासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत फक्त ‘आवाज की दुनिया ‘ होऊन जातो. चिमण्या-पाखरांची मनभावक किलबिल ऐकूही येत नाही.

दिवस मावळू लागला तसे घरट्याकडे परतणारे तुरळक पक्षी आकाशात दिसू लागले. पूर्वीसारखे थवे  आता फारसे दिसत नाहीत…. पूर्वी असे थवे पाहिले की तिला तिचे गाणे आठवायचे आणि ती गुणगुणत राहायची..  ‘ बागळ्यांची माळफुले अजुनी अंबरात…’

आताशा तिला परदेशी झालेल्या, अनेक वर्षे घरी न आलेल्या मुलांची आठवण येते.. तिने ते कधी बोलून दाखवले नसले तरी तिच्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा बोलून जातात. मग मी तिला,  ‘ गार वारा सुटलाय नाही ? चल आत जाऊ. ‘ असे म्हणून आत  तिला घेऊन आत जातो..

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments