श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘सांज…’ – भाग – 5 ☆ श्री आनंदहरी ☆
वरकरणी कितीही काहीही म्हणले तरी अनेक वर्षे मुले आलेली नाहीत ही मनाची दुखरी बाजू होती आणि प्रत्येक आईबापांच्या मनात असतेच. ती असतील तिथे सुखात असावीत असे प्रत्येक आई-बापाला वाटत असतेच पण कधीतरी त्यांनी यावे, चार दिवस सोबत राहावे असेही वाटतेच. पाखरे आकाशी झेप घेतात आणि घरट्याकडे परततही नाहीत. घरटी व्याकुळ होऊन त्यांची वाट पाहत सुकत चाललीत, विरु लागलीत.. तेच घरट्याचे व्याकुळपण तिच्या पापण्यात थबकून राहते.. माझ्या मनात साठून राहते.. पण तो साठपा दिसत नाही, मी दाखवतही नाही..
पूर्वी कुणी ना कुणी कधी काही कामासाठी, कधी सहज गप्पा मारायला येत होते.. नाही म्हणलं तरी दिवसभर राबता होता. इतर काही विचार मनात यायला मनाची दारे मोकळी नसायचीच.. हळूहळू हे सारे कमी झाले.. काही समवयस्क गेले.. ,काहींची अवस्था माझ्यासारखीच झालेली. हळूहळू छान एकांत देणारे घर एकाकी होऊ लागले.. कुणाचे येणे- जाणे नाही तर कुणाकडे येणे -जाणे नाही. थकलेल्या गात्रांचे जगच नव्हे तर अंगणही क्षणाक्षणांगणिक पावला-पावलाने आकुंचन पावत असते.. लहान होत असते.
‘साखर संपत आलीय’ ची आठवण झाली. ‘काय करावे ?’ मनात प्रश्न. आपले परावलंबित्व वाढत चाललंय याची जाणीव नाही म्हणलं तरी मनाला कुरतडत असतेच.. साधे रस्ता ओलांडून जायचे म्हणले तरी जमत नाही.. गतीने वाहणाऱ्या वाहतुकीची भीती सांज ढळताना अंधार दाटून येतो तशी दाटून राहिलेली आहे. त्यात खूप दिवस झाले ऐकायलाही कमी येऊ लागलेय.. आपल्याला ऐकायला येत नाही हे आपल्याला ठाऊक असले तरी समोरच्या व्यक्तीला ठाऊक नसते.. चालताना मध्येच पाय लटपटायला लागतात..आधाराला काठी असूनही पडतोय की काय अशी भीती वाटू लागते. भीती मरणाची वाटत नाही, वेदनेचीही नाही.. पण पडून हाड-बीड मोडले तर येणाऱ्या परावलंबित्वाची वाटते.
काही दिवसांपूर्वी तिचे एक औषध संपले म्हणून निघालो होतो.. जाणाऱ्या रिक्षाला हात केला.. ती शंभर फुटावर जाऊन थांबली. रस्त्यावरून अगदी कडेने सावकाश चालत जात असताना एक दुचाकी अगदी कर्कश हॉर्न वाजवत जवळ आली.. पाय लटपटले, तोल गेला सुदैवाने बाजूलाच विजेचा खांब होता.त्याचा आधार मिळाला म्हणून पडलो नाही..
“धड चालायला येत नाहीत तर म्हातारे घरात बसायचे सोडून रस्त्यावर कशाला येतात मरायला.. कुणास ठाऊक ? ” अंगावर खेकसत दुचाकीवाला निघून गेला.. खांबाच्या आधाराने थरथरत उभा राहून सावरण्याचा प्रयत्न करत काही क्षण उभा राहिलो तर रिक्षावाला मागे वळून पाहत काहीतरी पुटपुटत निघून गेला.. ती काळजी करत राहते म्हणून तिला काही सांगितले नाही.
दोन-तीन वेळा रस्त्यापर्यंत जाऊन आलो.. जाणाऱ्या – येणाऱ्या मध्ये चुकून कुणी ओळखीचे दिसतंय का पहात होतो.. पण अडचणीच्या वेळी मदतीला ओळखीचे कुणी सहसा भेटत नाही हेच खरं !. गेली अनेक वर्षे ज्या दुकानातून सामान घेत होतो तिथे फोन केला. दुकानदाराबरोबर व्यवहार – व्यापारापलीकडचे तसे जिव्हाळ्याचे, काहीसे घरोब्याचे संबंध.. पण तिथेही आता केवळ व्यावसायिक दृष्टिकोण ठेवणारी पुढची पिढी असते.
“साहेब, फक्त एक-दोन किलो साखर एवढया लांब घरपोच करणे परवडत नाही. त्यात आज कामगारही कमी आहेत. “
एवढेच बोलून तिकडून फोन ठेवला देखील. कामगारही कमी आहेत हे इच्छेचा अभाव लपवण्याचे व्यवहारी कारण. महिन्याचे सारे सामान त्याच दुकानातून घेत असूनही असे.. आताशा सारी गणिते पैसा आणि वेळेची असतात..
खरंतर असे इथं एकाकी राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात जाऊन राहणे खूप चांगले.. निदान अवती भवती माणसे असतात, सोबत ही असते असे खुपदा वाटते. एकदा तिला तसे म्हणालो देखील.. पण तिने मानेनेच नकार दिला.. तिचे तिने उभारलेल्या घरावर नितांत प्रेम आहे.. तसे माझेही आहेच.. पण तिला वाटते तिने तिचा अखेरचा श्वास याच घरात घ्यावा.. खरंतर सोडावा.
कोण आधी जाणार, कोण नंतर,.कुणाचा अखेरचा श्वास कधी असणार हे कुणालाच ठाऊक नसतं.. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तिची संगत- सोबत असावी असे आजवर वाटत होते. पण आताशा माझ्यामघारी तिचे काय होईल याची काळजी वाटू लागलीय. माझ्यासमोर,माझ्याआधी तिने अनंताच्या प्रवासाला निघून जावे असे वाटू लागलंय.. तिच्या डोळ्यांतही माझ्यावरच्या प्रेमाबरोबर माझ्यासाठीची हीच काळजी दाटून आलेली आहे.. माझ्याबाबतीत तिच्या मनात तोच विचार येत असतो हे ही मला ठाऊक आहे…
सांज सरून गडद काळोख दाटून यायला सुरुवात झाली होती.
ती स्वयंपाकघरातून भाताचा कुकर लावत म्हणाली,
“बाहेरची खिडकी लावा. सोप्यातला, बाहेरचा लाईट लावा. “
मी लाईट लावून सोप्यातील खिडकी बंद केली पण मला मनाची खिडकी बंद करताच आली नाही.. सांज ढळून तिच्या काळजीचा गडद काळोख माझ्या मनभर दाटतच राहिला होता.
◆◆◆
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈