जीवनरंग
☆ ‘स्वप्न…’ – लेखक – श्री चंद्रशेखर गोखले ☆ प्रस्तुती – सुश्री श्रेया साने ☆
त्याला शाळा सुटल्या वर एकट्यानेच
घरी जावं लागायचं
कोणाची आई न्यायला यायची तर कोणी आपल्या बाबां सोबत उड्या मारत घरी जायचं
स्कूल बस वाल्यांचा तर वेगळाच रुबाब असायचा
पण याला मात्र आपली इवलीशी पावलं झपाझप टाकत घराकडे धाव घ्यावी लागायची
मग गावाची वेस ओलांडे पर्यंत अंधारून यायचं
त्यात रानातला रस्ता सुरु व्हायचा
मग एक मोठी उतरण यायची
आणि मग जरा खाचखळग्यातून चाचपडत चालल्यावर
त्याचं एका बाजूला असलेलं घर एकदाचं यायचं
इवल्याशा मुठीत धरलेला इवलासा जीव त्याच्या आधी घरात पळायचा
आई ला बघितली की त्याला घरी आल्या सारखं वाटायचं
आणि आई ला ही जिवात जीव आल्या सारखं वाटायचं
मग दोघं माय लेकरं नशिबी आलेला अंधार अर्धा अर्धा वाटून घ्यायचे
चुलीत ज्वाले पेक्षा धूर जास्त असायचा
आणि ताटात घासा पेक्षा मोकळी जागा जास्त उरायची
तरी घासा सोबत दोघं भोवतीचा अंधार गिळून टाकायचे
त्या मुळे च असेल
नदी काठच्या त्यांच्या घरची रात्र लवकर सरायची
भल्या पहाटे घरात अंधूक अंधूक दिसायला लागायचं
भल्या पहाटे आई दारातल्या दोन शेळ्या ना चरण्या साठी घेऊन जायची आणि येताना जमेल तेव्हढा लाकूड फाटा घेऊन यायची
आली की पाहिलं काम शेळ्यांच दूध काढून शेळ्या ना मोकळं करायची
आहे त्यात दोन दशम्या थापायची
आणि उठल्या पासून पुस्तकांत डोकं खुपसून बसलेल्या आपल्या मुलाला शेळीच्या दुधा सोबत गरम गरम खरपूस भाजलेली दशमी खायला लावायची
मग जस जसा दिवस वर यायचा तसं त्यां मायलेकरांच नदी काठचं घर आंगण प्रकाशानी भरून जायचं
अंधार गिळून गिळून त्यांच्या आयुष्याला अंधार असाच संपून गेला
एकदा त्यांच्या घरी असं उजाडलं की पसरलेला उजेड परतलाच नाही
उगवलेला दिवस मावळला च नाही
आई च्या श्रद्धा सबुरी ला फळ आलं
मुलाच्या कष्टा वरच्या निष्ठेला फळ आलं आणि
गावा बाहेर नदी काठी पर्ण कुटीत राहणारी ही माय लेकरं
महानगर्यातल्या उच्चभ्रू वस्तीत पोहोचली
चौसोपी चिरेबंदी घर तर मिळालच त्या सोबत दिमतीला नोकर चाकर ही आले
त्या शिवाय त्या मुलाने मिळवलेल्या सरकारी हुद्द्या मुळे दिवस रात्र त्यांच्या भोवती सिक्युरीटी गार्ड्स तैनात होते
पण तरी कामाच्या व्यापातून कसाही वेळ काढून
आपल्या मुलांना शाळेत पोहोचवायला आणायला तो स्वतः च जायचा
त्याचा हा अट्टाहास बघून त्याची शहरात वाढलेली बायको विचारायची इतका आटा पिटा करायची काय गरज आहे?
तो हसून म्हणायचा बाकीचे व्याप मी आटा पिटा करून पूर्ण करतो
पण मुलांना आणायला जाणं आणि सोडायला जाणं हे मी जपलेलं स्वप्न आहे
जी सुरक्षितता मुलांना आई बापाच्या सोबत जाणवते
ती नेमलेल्या चाकरांच्या सान्निध्यात मिळत नाही.
लेखक – श्री चंद्रशेखर गोखले
प्रस्तुती – सुश्री श्रेया साने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈