? जीवनरंग ?

☆ कथा उणा आनंद… लेखक : श्री प्रसाद कुळकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

 टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रंगमंचावरून मानसच्या नावाची घोषणा झाली,

” आणि आपल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे, पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत……….”

 संपूर्ण सभागृह त्याच्या रंगमंचाकडे येण्याची प्रतीक्षा करत होतं.  उत्तेजनार्थ क्रमांकापासून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या घोषणेपर्यंत तो ही टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करत होता, आणि मनातून निराशही होत होता.  प्रचंड रहदारीमधून बसचा दीड पावणेदोन तासाचा प्रवास करून आला होता तो बक्षीस समारंभाला.  ही स्पर्धा त्याच्यासाठी फार महत्त्वाची होती.  गेली तीन वर्ष , पहिल्या तीन क्रमांकात येण्यापासून या स्पर्धेने मानसला हुलकावणी दिली होती.  आजवर अनेक काव्यस्पर्धांवर त्याने आपल्या काव्यरचनेची मोहोर उमटवून यश प्राप्त केलं होतं.  आजही घरून निघताना, मानसने प्रत्येकाची चाचपणी करून पाहिली, आपल्यासोबत येण्यासाठी.  काही ना काही कारण सांगून, प्रत्येकानेच नकार दिला होता.  आणि तसंही  आजवर त्याला मिळालेल्या प्रत्येक पारितोषकासोबत तो एकटाच घरी आला होता.  सवय झाली होती, तरीही प्रत्येक वेळी घरच्या कुणी सोबत यावं, असं मनोमन वाटायचं त्याला.  उत्तर माहीत असूनही तो प्रत्येकाला विचारायचा, आणि अखेर एकटा चालता पडायचा.  आजही तो एकटाच उपस्थित होता त्या भरलेल्या सभागृहात.

रंगमंचावर, प्रमुख पाहुण्यांसोबत पहिल्या तीन क्रमांकात आलेल्या स्पर्धकांसाठी खुर्च्या मांडलेल्या होत्या.  मानसची खुर्ची पाहुण्यांच्या अगदी बाजूला होती.  खुर्चीत बसून समोरच्या प्रेक्षकांकडे पाहताना त्याच्या मनात एक उर्मी आणि आनंद दाटून येत होता.  फोटोग्राफरची क्लिक क्लिक सतत सुरू होती.  आज बक्षीस समारंभाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांकडून पारितोषिक स्वीकारण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली होती.  स्पर्धेचे परीक्षक त्याच्या बक्षीसपात्र कवितेमधली सौंदर्यस्थळं उलगडून सांगू  लागले आणि विचारातून मानस भानावर आला.  त्याची नजर प्रेक्षकांत भिरभिरत फिरत होती, कुणीतरी आपलं शोधायला, होत असलेल्या आपल्या कौतुकात त्याला सामील करून घ्यायला.  पण सगळे अनोळखी चेहरे दृष्टीला पडत होते. 

कार्यक्रम संपला, विजेत्या स्पर्धकांचा पाहुण्यांसोबत चहा फराळ झाला, आणि मिळालेल्या स्मृती पारितोषिकासह तो घरी निघाला.  पुन्हा एकदा तास दीड तासाचा प्रवास करायचा होता.  जसजसा मानस घराच्या जवळ येऊ लागला, तसतशी त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली.  हे ही नेहमीचच.  विजेता होण्याची ही काही त्याची पहिलीच वेळ नव्हती, आजवर मानसने अनेक नामांकित काव्यस्पर्धांवर आपल्या नावाची मोहोर उमटवली होती.  अनेक काव्य संमेलनांमधून रसिकांच्या भरघोस टाळ्या घेतल्या होत्या.  तरीही  प्रत्येकवेळी त्याचं असच व्हायचं.  आज मिळालेल्या पारितोषिकावर घरातली प्रतिक्रिया कशी असेल? मुळात प्रतिक्रिया असेल का ? सगळ्यांना किती आनंद होईल ? प्रत्येकजण काय विचारेल ? आपण कुठून करायची सुरवात सांगायला ? अशा अनेक प्रश्नांसोबत मानसने दारावरची बेल हलकेच दाबली.  मधुवंतीने डाव्या हातातल्या मोबाईलसह दरवाजा उघडला आणि मानसच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य फेकत आणि मोबाईलचा volume जराही कमी न करता, ती त्यात शिरली,

“अरे, सीरियलचा शेवटचा भाग सुरू होता, कसा झाला तुझा कार्यक्रम ?”

मधुवंतीने विचारलेल्या प्रश्नावर, मानसने उत्साहाने उत्तर देण्यासाठी तोंड उघडण्याआधी तीच पुढे म्हणाली,

“जेवणार आहेस ना ? म्हणजे, अरे खाऊन वगैरे आलेला नाहीस ना ?”

मानसने उघडलेलं तोंड मिटून नकारार्थी मान हलवली.

“बरं, मग तू चटकन फ्रेश होऊन ये, मी वाढते तोपर्यंत.  आता बोलत बसू नकोस उगाच, आधी जेवून घे.  मलाही मग आटपायला उशीर होतो.”

मधुवंती किचनकडे वळली, आणि या दोघांचा आवाज ऐकून भैरवी आपल्या बेडरूममधून बाहेर आली,

“किती उशीर बाबा ! बराच लांबला वाटतं तुझा कार्यक्रम?”

लेकीच्या प्रश्नाने पुन्हा एकदा उत्साहित होत मानस काही बोलणार……इतक्यात भैरवी पुढे बोलती झाली,

“बाबा, आज अरे kbc चा पाहिला एपिसोड मस्तच झाला.  अमितजीना हॉट सीटवर बसलेलं पाहाणं म्हणजे तुला सांगते काय आनंद असतो.  त्यांना बघत राहण्यासाठी तिथे मी अगदी नेहमी, एका पायावर जायला तयार आहे.”

इतक्यात तिचा मोबाईल वाजला आणि,

“बाय बाबा !”

म्हणत, आणि फोनवरच्या त्या कुणाला “हाय” ! करत ती आपल्या बेडरूममध्ये अंतर्धान पावली.

इतक्यात पुन्हा एकदा दरवाजाची बेल वाजली, आणि मधुवंती किचनमधून ओरडली,

“मानस, बघ रे कोण आहे, केदराच असणार बहुतेक.  जेवायचा असेल तर दोघांना एकदमच वाढते.”

दारात केदारच उभा होता ,

“हाय बाबा, अरे आज खूप दिवसांनी एका jazz concert ला गेलो होतो आम्ही फ्रेंड्स्.  खूप धमाल आली.”

“आई, मी जेवणार नाहीय ग, भरपूर झालंय खाणं, बाबा, तू कधी आलास ?”

प्रश्न विचारून, आणि उत्तराची फारशी अपेक्षा न करता, चिरंजीव आपल्या बेडरूममध्ये शिरले सुद्धा.

 मानसने मिळालेल्या पारितोषिकाची पिशवी एका बाजूला ठेवली, आणि कपडे बदलून, फ्रेश होऊन तो जेवणाच्या टेबलावर आला, तर मधुवंतीने ताट वाढून ठेवलेलं होतं.

 मानसला वाटलं, ती आपल्यासोबत बसेल, तेव्हा सांगू सगळा वृत्तांत.  पण मानसला बसलेला पहाताच मधुवंती म्हणाली,

 “तुला अजुन काही लागणारय का ? नाहीतर बाकीचं अन्न मी फ्रीजमध्ये ठेवून देते.  खूप दमायला झालंय आज, मी जाते झोपायला.”

तशीही मानसला फारशी भूक नव्हती.  पण चार घास खाऊन, उरलेलं अन्न फ्रीजमध्ये सरकवून दिलं आणि हात तोंड धुवून रिलॅक्स होत त्याने पिशवीतलं पारितोषिक बाहेर काढलं.  त्याच्याकडे पहाताना, का कोण जाणे, पण ते आपल्याकडे पहात खिजवून हसतय, असं मानसला उगीचच वाटू लागलं.  सोबतचा, आता पार कोमेजून गेलेला लहानसा पुष्पगुच्छ , केराच्या टोपलीत टाकून, मिळालेली पहिल्या क्रमांकाची ती ट्रॉफी, समोरच्या काचेच्या शेल्फवर, आधीपासून लागलेल्या पारितोषिकांसमवेत ठेवून, तो ही बाहेरचा लाईट मालवून झोपायला आपल्या बेडरूमकडे वळला.  मुलांच्या खोलीच्या दरवाजाखालून त्यांच्या मोबाईलचा प्रकाश काळोखात लख्ख पडत होता.  मधुवंती कधीच गाढ झोपी गेली होती.  मानसने बेडवर अंग टाकलं.  बराच वेळ त्याला झोपच येत नव्हती. 

सकाळी केदारची कॉलेजला जाण्याची तयारी सुरू होती.  आपलं आवरता आवरता केदार मानसला विचारता झाला,

“बाबा, पण तू काल कुठे गेला होतास, सांगितलं नाहीस ?”

आणि मानसने नव्या उत्साहाने सांगायला सुरवात केली,

“अरे, काल मी भाग घेतलेल्या एका काव्यस्पर्धेचा…”

काव्य हा शब्द ऐकताच केदार गडबडीने उत्तरला,

“ओके ओके, आपल्याला काय कळतंय त्यात.  चला मी निघतो.  आई येतो ग.”

मानसचं सगळं सांगायला उघडलेलं तोंड तसच उघडं राहिलं.

 राधाबाई डस्टिंग, झाडूपोछा करायला आल्या, तेव्हा मानस बाहेरच वर्तमानपत्र वाचत बसला होता.  अचानक त्याच्या कानावर शब्द पडले,

 “सायेब, कालपर्यंत हितं नऊच भावल्या होत्या, ही धावी कदी आली म्हनायची ? कालच्याला मी येऊन गेले तेव्हा तर न्हवती हिकडं.  सायेब, तुमच्या या वाढत जानाऱ्या भावल्या माजं सफाईचं काम वाढवत नेतायत बगा.”

 कुणाचं काय तर कुणाचं काय.  पण, आपल्या पारितोषिकात, अजून एका बक्षिसाची झालेली वाढ, कुणाच्यातरी लक्षात आली, इतक्यावरच समाधान मानून, मानसने समोरचा चहाचा कप तोंडाला लावला.

प्रासादिक म्हणे – प्रसाद कुळकर्णी

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments