सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ ससा आणि कासव (क्रमशः — पूर्वार्ध) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

लहानपणी आपल्यापैकी  बहुतेक सर्वांनीच ‘ ससा आणि कासव‘ ही गोष्ट ऐकलेली आहे. पण बहुतेक तेव्हा ती गोष्ट पूर्ण सांगितली जात नसावी, असं मला नेहमी वाटतं.

मग कशी असायला हवी होती ती पूर्ण गोष्ट?… अशी असेल का ? ……………….

अतिशय हळू चालणाऱ्या कासवाला आपण नक्कीच हरवू या मिजाशीत ससा मधेच झोपला, आणि ती शर्यत हरला. ……… अर्थातच त्याचा अहंकार दुखावला. आणि त्याने वेगळ्या मार्गावरून परत शर्यत लावण्याचे आव्हान कासवाला दिले. अर्थातच कासवाने लगेच ते स्वीकारले आणि स्पर्धा जास्तच त्वेषाने सुरू झाली.

त्या नव्या मार्गावर मधेच एक तलाव होता आणि सशाला ते माहितीच नव्हते. तिथपर्यंत तो अगदी सहज पोचला. पण मग पुढे जाण्यासाठी दुसरा रस्ता शोधणे भाग होते. त्याला एक रस्ता सापडला, जो त्याच्या अपेक्षेपेक्षा फारच लांबचा होता पण हे अंतरही आपण नक्कीच कासवाच्या आधी पार करू अशी त्याला खात्री होती. आणि तो धावायला लागला. नंतर कासवही त्याच्या गतीने त्या तलावापाशी पोचले. पण ‘ आता काय ‘ हा प्रश्न त्याला पडण्याचे कारणच नव्हते. ते तलावात उतरले… पोहत पोहत त्याने सहज दुसरा काठ गाठला आणि चिकाटीने उरलेलं अंतर कापत ते ठरल्याजागी जाऊन उभे राहिले. लांबचा वळसा घालून आलेला ससा धापा टाकत तिथे पोचताच, त्याच्या आधीच कासव तिथे पोचलेले पाहून जाम चडफडला. आणि‘ तू नक्कीच काहीतरी चीटींग केलं आहेस ‘ असं म्हणत तणतणत तिथून निघून गेला.

….. पण पुन्हा एकदा त्याच कासवाबरोबर हरल्याची बोच त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने आता ठरवले की,  ‘कासवासारख्या चिल्लर प्राण्याशी स्पर्धा करण्यात आपण आपला मोलाचा वेळ वाया घालवला. आता आपल्यापेक्षा, किंवा निदान आपल्याइतक्या तरी चपळ असणाऱ्या प्राण्याशी स्पर्धा लावून ती जिंकून दाखवायला पाहिजे. ‘

असा प्राणी कोण याचा विचार करत भटकत असलेल्या त्याला, एक दिवस एक वृद्ध ससा भेटला. याने त्याला आपला निर्धार सांगितला. वृद्ध ससा किंचितसा हसला. या सशाच्या चेहेऱ्यावरचा ताठा, आणि स्वतःच्या कुवतीबद्दल – चा फाजील आत्मविश्वास त्याला स्पष्ट दिसत होता. पण आत्ता याला कुठलाही थेट सल्ला देण्यात काहीच अर्थ नाही हेही त्याच्या लक्षात आलं होतं. कारण स्वतःची नेमकी क्षमता किती, ठरवलेलं ध्येय योग्य आहे का, यासारखा विचारही याला कधी करावासा वाटलेला नाही, हे त्या अनुभवी सशाला प्रकर्षाने जाणवत होतं.

स्वतःची सर्व प्रकारची कुवत ओळखून, किती उंचावरचे ध्येय आपण गाठू शकू याचा त्रयस्थपणे विचार करून, ते ध्येय निश्चितपणे गाठण्याची क्षमता असणारे अगदी मोजकेच ससे असतात ,हे इतक्या वर्षात त्याने अगदी जवळून पाहिले होते. आणि बाकीच्या सशांची धाव मात्र….. आपणही स्पर्धेत उतरलो आहोत याचाच त्यांना मोठा अभिमान वाटत असतो.

… पण हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव कितीही उपयुक्त असला, तरी हे सगळं या सशाला आत्ता पटणार नाही, हे त्याच्या आविर्भावावरून त्या वृद्ध सशाला खात्रीने कळलं होतं. मग तो त्या सशाला म्हणाला…..” हे बघ बाळा, तू मोठं स्वप्न पहायला काहीच हरकत नाही. पण एखाद्या दणकट प्राण्याबरोबर एका उंच शिखरावर पोचण्याची स्पर्धा लावण्याआधी तू स्वतःची ताकद, स्वतःची क्षमता सर्वतोपरी वाढवायला पाहिजेस. तू एक काम कर. मला वाटतं तुझ्या घराच्या जवळच एक गाजराचे शेत आहे. हो ना ? तो शेतकरी खूप चांगला आहे. त्याला नम्रपणे विनंती केलीस तर तो तुला रोज तीन – चार तरी ताजी गाजरे नक्कीच देईल. शिवाय तिथेच शेजारी मऊ गवताचे कुरणही आहे. तिथलं पिवळी फुलं येणारं गवत तुला खाता येईल. तिथेच पळण्याचा थोडा जास्तव्यायाम करता येईल. तुझी ताकद वाढली आहे असा विश्वास तुला वाटेपर्यंत हे सगळं करत रहा. आणि मग कुणाशी स्पर्धा लावायची ते ठरव.”…… जिंकण्याची अती घाई झालेल्या सशाला हे लगेच पटलं, आणि त्या वृद्ध सशाचे आभारही न मानता तो लगेच तिथून पळाला.

(क्रमशः)

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments