सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ खेळण्याचे दिवस (भावानुवाद) – डॉ. कमल चोपड़ा ☆ सौ. उज्ज्वला केळकर

घरातलं कपाट खेळण्यांनी भरून गेलं होतं. पत्नीचा विचार होता, कुठल्या तरी भांगारवाल्याला खेळणी विकून टाकावीत. मुले मोठी झाली होती. ती आता खेळण्यांकडे बघतही नव्हती. ती वैतागाने  पुटपुटली, त्यातली काही खेळणी सोडली, तर बाकीची अगदी नवीच्या नवी आहेत. ‘दर वर्षी वाढदिवस साजरा करायचो. खूप खेळणी यायची. त्यावेळी, इतर मुलांच्या वाढदिवसाला त्यातलीच काही खेळणी दिली असती, तर खेळण्यांचा असा ढीग लागला नसता. दर वेळी इतर मुलांच्या वाढदिवसाला बाजातून आणून नवीन नवीन खेळणी देत राहिलो. आता भांगारवाला काय देणार? शे-पन्नास.’

भाऊसाहेब म्हणाले, ‘जे झालं ते झालं. आपल्या मुलांचं लहानपण खेळण्यांशी खेळण्यात गेलं, ही आनंदाची गोष्ट आहे. आता तू म्हणालीस तर मी ही खेळणी गरीब मुलांच्यामध्ये वाटून येतो. बाकी काही नाही, तरी एक चांगलं काम केल्याचं समाधान’ 

पत्नी काहीच बोलली नाही, तेव्हा तिचा होकार गृहीत धरून त्यांनी एका मोठ्या पिशवीत खेळणी भरली आणि ते इंडस्ट्रीयल एरियाच्या मागे बनलेल्या झोपडपट्टीकडे गेले. त्यांच्या मनात येत होतं, मुलं किती खूश होतील ही खेळणी पाहून. भाजी-भाकरी काय, मुलं कशीही खातातच. शरीर झाकण्यासाठी कापडे कुठून कुठून, मागून मागून मुलं मिळवतात. पण खेळणी त्यांच्या नशिबात कुठून असणार? ही खेळणी पाहून त्यांचे डोळे चमकतील. चेहरे हसरे होतील. त्यांना असं प्रसन्न पाहून मलाही खूप आनंद वाटेल. यापेक्षा दुसरं मोठं काम असूच शकत नाही.              

झोपडपट्टीजवळ पोचताच त्यांना दिसलं की मळके, फटाके कपडे घातलेली दोन मुले समोरून येत आहेत. त्यांना आपल्याजवळ बोलावून ते त्यांना म्हणाले, ‘मुलांनो, ही खेळणी मी तुम्हा मुलांना देऊ इच्छितो.  यापैकी तुम्हाला पसंत असेल, ते एक एक खेळणं तुम्ही घ्या….अगदी फुकट.’

मुलांनी हैराण होऊन त्यांच्याकडे पाहिलं. मग एक दुसर्याखकडे पाहीलं. मग खूश होत त्यांनी खेळणी उलटी-पालटी करून पाहिली. त्यांना खुश झालेलं बघता बघता भाऊसाहेबांनाही आनंद झाला. काही क्षणात त्यांना दिसलं, मुलं विचारात पडली आहेत. त्यांचा चेहरा विझत विझत चाललाय. 

‘काय झालं?’

एका मुलाने खेळणं परत त्यांच्या पिशवीत टाकत म्हंटलं, ‘मी नाही हे घेऊ शकत. जर मी हे खेळणं घरी नेलं, तर आई-बाबांना वाटेल की मी मालकांकडून ओव्हरटाईमचे पैसे घेतले आणि त्यांना न विचारता त्याचं खेळणं घेऊन आलो. कुणी फुकटात खेळणं दिलय, हे त्यांना खरं वाटणार नाही. संशयावरूनच मला मार बसेल.’

दूसरा मुलगा खेळण्यापासून हात बाजूला घेत म्हणाला, ‘बाबूजी, खेळणं घेऊन करणार काय? मी फॅक्टरीत काम करतो. तिथेच रहातो. सकाळी उजाडल्यापासून ते रात्री अंधार पडेपर्यंत काम करतो. केव्हा खेळणार? आपण ही खेळणी कुणा लहान मुलांना द्या.’

मूळ हिंदी  कथा – ‘खेलने के दिन’  मूळ लेखक – डॉ. कमल चोपड़ा

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments