सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मात… भाग – 1 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

काचेचा भारी दरवाजा एका हाताने ढकलून मी आतल्या या दुसऱ्या जगात आलोय. गाड्यांचा गजबजाट, लोकांची धक्काबुक्की आणि घामाघूम करणारी गरमी यातून आल्यावर तर याला दुसरं जगच म्हणावं लागेल. या जगात एअरकंडिशनरचा सुखद गारवा आहे, धूसर उजेड आहे, मंद सुरातली कुठलीतरी विदेशी धून आहे. आणि नाजूकपणा व भलाई साकार झाल्यासारखे वाटणारे लोक आहेत. तुम्हालाही माहीत असेल,’वेंगर्स’ तर या शहरातलं पॉश रेस्टॉरंट आहे ना!सगळं काही माझ्या चांगलंच परिचयाचं आहे. बाजूची आरसेवाली भिंत, बिलोरी काचेचं झुंबर, पितळेच्या नक्षीदार फ्रेममध्ये लावलेलं लँडस्केपचं पेंटिंग, एवढंच नाही, तर उजवीकडचा तो खांबही. त्याच्यापाठी चार वेगवेगळी टेबलं आहेत.

त्यातल्याच एका टेबलावर मी शालिनीबरोबर बसत असे. बरेचदा आलोय इथे. शालिनीबरोबरच नाही, तर त्यापूर्वीही दुसऱ्या मुलींबरोबर. कितीजणी झाल्या, ते आता आठवतही नाही.

हं. तेव्हा आणि आतामध्ये एक फरक आहे. खूप मोठा फरक. आज मी बेपर्वाईने पैसे उधळणारा ‘बडे बाप का बेटा’ राहिलेलो नाही.

डॅम इट! मला त्याची अजिबात पर्वा नाही.

काही बाबतीत मी बऱ्यापैकी बेशरम आहे.

मी ठामपणे पुढे जातोय. मला जाणवतायत लोकांच्या नजरा.चौकस, प्रश्नार्थक.’मी इथे काय करतोय?’असं विचारणाऱ्या. मी बघून न बघितल्यासारखं करतो.

मला माहीत आहे, साबण, क्रीम न लावल्यामुळे माझा चेहरा कळाहीन दिसतोय. बुटांवर पॉलिश नाहीय. कपडेही मळके, चुरगळलेले आहेत.

सो व्हॉट? हे पब्लिक प्लेस आहे. खिशात पैसे असतील, तर कोणीही इथे येऊ शकतो. ठीक आहे. जास्त पैसे नाहीयेत जवळ. पण कपभर कॉफी तर नक्कीच घेऊ शकेन.

इतके पैसे इकडे फुंकलेयत आतापर्यंत, की आजही मला इकडचे सगळे ओळखतात.

आजच्यासारख्या अवस्थेतही मी इथे आलेलो आहे. असं नजरेनेच तोललं -मापलं जाण्याचाही अनुभव घेतलाय. हे लोक आधी कुतूहलाने, मग तुच्छतेने बघतात. आणि मी शरमत नाही, असं दिसलं, की चिडतात -‘ हा एवढा घाणेरडा माणूस बड्या लोकांची बरोबरी करायचं धारिष्ट्य करू पाहतोय ‘.

खरी मजा तर मला नंतरच वाटते. मी ऐटीत बसल्यावर लोक विचार करू लागतात – मळलेले असले, तरी माझे कपडे महाग आणि नव्या डिझाईनचे आहेत. बूट जुने असले तरी किमती आहेत. आणि यावर ताण म्हणजे माझ्या चेहऱ्यावर खेळणारी बेपर्वाई आणि हेकेखोरपणा. मी मनातल्या मनात हसतो.

लोकांनी माझ्याकडे बघावं आणि माझ्याविषयीच बोलत राहावं, असं मला नेहमीच वाटतं. ही इच्छा अपुरी राहिलीय, असंही नाही. शेवटी सुप्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डॉ. प्रेमदत्त आहुजांचा मी एकुलता एक मुलगा आहे.खरं तर, ‘आहे’  नाही, ‘होतो’ म्हटलं पाहिजे. कारण ना आता ते वडील राहिले, ना मला जे व्हायचं होतं, ते मी बनू शकलो. फर्गेट इट.

मी अजून आशा सोडलेली नाही. खरं तर, माझा सर्वात मोठा प्लॅन उद्ध्वस्त झालाय आणि मला नैराश्य आलंय. फालतू लोकांसमोर हात पसरावे लागतायत. ‘अपडाऊन तर चालूच असतं,’ वगैरे वाक्यं आता तोंडपाठ झालीयत.

खांबाकडून थोडं आत जाताच मी बघितलं – जवळजवळ सगळ्याच खुर्च्या भरल्यायत. फक्त एक रिकामी आहे. तिच्यावर एक पर्स ठेवलीय. नवरा आणि मुलाबरोबर तिथे बसलेल्या  त्या बाईची असणार ती पर्स.

मी जवळ जाऊन खुर्ची ओढली आणि पर्स टेबलावर ठेवत ‘एक्स्क्युज मी,’ म्हटलं. गोरापान रंग, स्लीव्हलेस ब्लाउझ, कापलेले केस. त्या बाईने आधी कुरकुरत आणि मग कपाळाला आठ्या घालून माझ्याकडे बघितलं. पर्स मांडीवर ठेवून तक्रारीच्या सुरात तिने नवऱ्याकडे पाहिलं. सोंगटी मारणाऱ्या स्ट्राईकरसारखी नजर होती तिची. नवऱ्याने फक्त माझ्याकडे रागाने बघितलं. अगदी डोळे वटारून. काही बोलला मात्र नाही.

मी आरामात मागे टेकून बसलो. खिशातून सिगरेट आणि लाईटर काढला. नाटकी मुद्रा करून त्या बाईच्या बाजूला झुकलो आणि विचारलं, “तुमची हरकत नाही ना, मॅडम?” त्या बाईने नजरेनेच नवऱ्याला डिवचलं.तरीही तो काहीच बोलत नाही, म्हटल्यावर ती चिडक्या आवाजात बोलली, ” माझी हरकत आहे.”

मी सिगरेट आणि लाईटर खिशात टाकला. ती आणखीनच कडक आवाजात म्हणाली, ” मिस्टर, तुम्ही दुसरीकडे बसला असतात, तर बरं झालं असतं.”

“नाईलाज आहे, मॅडम. तुम्ही बघताच आहात ना?दुसरी कोणतीच खुर्ची रिकामी नाही,” मी जरासं हसतच म्हटलं. त्या बाईने जळजळीत नजरेने माझ्याकडे पाहिलं. मीही तिच्याकडे टक लावून बघत राहिलो. तिच्या चेहऱ्यावर अशी घृणा होती, की जणू काय मी पाल होतो आणि डायरेक्ट तिच्या प्लेटमध्ये जाऊन पडलो होतो.

क्रमश:…

मूळ हिंदी  कथा – सुश्री भावना  

भावानुवाद –  सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments