सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ माऊली… भाग – 1 – सुश्री संध्या सोळंके-शिंदे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

“काय देती वो तुमची शाळा? तुमाला तुमच्या शाळेचंच पडलंय…इतं भुकेनं आss वासलेली पाच तोंडं हायेत पदरात माझ्या. वरून नवरा तसला पिदाडा. पोटापाण्याचं आदी बागावं का तुमची शाळाच बगावी? नुसती शाळा शिकून पोट भरत नसतंय मॅडम ! आन पयलीचं वर्ष एवढं काय मह्त्वाचं नसतंय.. कायी फरक पडत न्हाई थोडे दिवस शाळा बुडली तर…… मुकादमाकडून 20,000/- रुपय उचल घेतलीय मी घराचे गळके पत्रे दुरुस्त करायला…ती फेडावी लागल का न्हाई? 

आईच्या पदराआड तोंड लपवत, किलकिल्या डोळ्यांनी हे सारं ऐकत होता माऊली ! संध्या मॅडम आपल्या आईला समजावण्यात अयशस्वी झाल्यात, आता सगळं आपल्या मनाविरुद्ध होणार, हे एव्हाना लक्षात आलं होतं त्या चिमुकल्या जिवाच्या !

मॅडम म्हणत होत्या, ” शाळेच्या होस्टेलवर  सोय होईल त्याची राहण्याची. मी विचारते संस्थेला. हुशार आहे हो माऊली, असं मध्येच नेऊन त्याचं नुकसान नका करू! “

” नगं…. पाचीच्या पाची लेकरं घेऊन चाललेय मी. चार पोरीच्या पाठीवर झालंय हे पोरगं मला, त्याला इथं ठेऊन तिथं जीव कसा लागल माजा? “

तब्बल आठवडाभराच्या चर्चेअंती संध्या मॅडमला माऊलीच्या आईकडून मिळालेलं हे निराशाजनक अन् काहीसं कटू उत्तर होतं. पण त्याक्षणी त्या हेही जाणून होत्या की, त्यांना केवळ एक शिक्षणाबद्दल अनास्था असलेला,अशिक्षित पालक बोलत नसून, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गेलेली, पाच लेकरांच्या पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत असलेली हतबल आई बोलत होती.

अखेर परिस्थितीसमोर नाईलाज झाला अन् उद्या प्रथम सत्राचा शेवटचा पेपर देऊन माऊली काही महिन्यांसाठी शाळा सोडून आईसोबत ऊसतोडीसाठी भटकंती करत  गावोगाव फिरणार, यावर शिक्कामोर्तब झालं !

गरिबीचे निकष अन् व्याख्या तिला सोसणाराच सांगू शकतो, इतरांनी त्यावर सांगितलेल्या उपाययोजना केवळ  पुळचट असतात !

दुसरा दिवस…

माऊली मन लावून पेपर सोडवत होता. मॅडम त्याच्याकडे बघत विचार करत होत्या… 

‘ काय भविष्य असेल अशा लेकरांचं ? पोटाला दोन वेळचं अन्न मिळवणं हे आणि हेच अंतिम ध्येय असलेल्या अशा कैक लोकांचं? ‘… मॅडम विचारात असतानाच माऊली त्यांच्यासमोर सोडवलेला पेपर घेऊन उभा राहिला. मॅडम भानावर आल्या.पेपरसोबत त्याने एक छोटीशी कोरी चिठ्ठी मॅडमकडे सरकवली… 

” मॅडम, आमच्यासोबत मावशी पण येणार आहे. मला तुमचा नंबर द्या, मावशीच्या फोनवरून मी कधी मिसकॉल केला तर कराल का मला फोन? “ त्या चिमुकल्या जीवाची ती साधीच मागणी किती आर्त वाटली त्याक्षणी !

पेपरवर नजर फिरवली. किती सुवाच्य अक्षर, अचूकता…! त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून बघितलं मॅडमने.

— घंटा वाजली, शाळा सुटली, अन् एक चिमुकला जीव आपल्या मनाविरुद्ध जगण्यासाठी चकारही न काढता निघून गेला.

लखलखता दिवाळसण…

झगमगाट, रोषणाई, नवनवीन खरेदी, उत्साह, गुलाबी थंडी….. एकुणात सुखवस्तू सण..!

पण जगाच्या एका कोपऱ्यात एक कोवळा जीव कुठेतरी हाच सण ऊसाच्या घनदाट रानात, किर्रर्र अंधाराच्या साक्षीनं केवळ कल्पनेत साजरा करत होता. त्या किर्रर्रर, कर्कश्श रानात, दिवसभर काम करून दमून निजलेल्या माणसांच्या घामाच्या दुर्गंधात, किरकिऱ्यांच्या आवाजात, अठराविश्व दारिद्र्याच्या ओटीत, शिक्षणाची चटक लागलेला पण परिस्थितीपुढे हतबल झालेला एक जीव त्या भयाण शांततेत  मनातल्या मनात किंचाळायचा… 

… गावाबाहेर दूर कुठेतरी उसाच्या फडात तंबू ठोकून राहिलेल्या त्याच्या टोळीत त्याला दुरून एखाद्या फटाक्याचा बारीकसा आवाज, लुकलुकणारा एखादा आकाशकंदील दिसायचा अन् त्या कडाक्याच्या थंडीत अंगावरच्या फाटक्या कपड्यानिशी बाहेर येऊन तो हा सण अधाशागत कानाडोळ्यांनी प्यायचा!… घटाघटा..!!

दिवसा ऊसाच्या चरबट पानांच्या सळसळीत त्याच्या पुस्तकाच्या पानांचा आवाज विरून जायचा.

भाऊबीजेदिवशी दुपारी मॅडमचा फोन अचानक किंचित चमकला, थरथरला…लगेच बंद झाला…

एखादी किंकाळी दाबावी तसा!… Unknown number.

मॅडमने त्यावर फोन लावला. रिंग जाते न जाते, तोच फोन उचलला गेला. एक मृदू, कोवळा,नाजूक, सच्चा पण दबका आवाज… गुपचूप केला असावा …

” मॅडम, मी माऊली! “

” बोल बाळा, कसा आहेस? कुठे आहेस? दिवाळीत आलास का इकडे? “

“मॅडम, आम्ही इकडं खूप लांब आलोत. मला ह्या गावाचं नाव माहीत नाही. सारखंच गाव बदलत जातोत आम्ही ऊसतोडीला ! मुकादम खूप कडक आहे.”

“बरं..! अरे, दिवाळी कशी झाली मग तुझी ? नवा ड्रेस घेतलास ना? आईनं काय काय केलंय फराळाला “

“न्हाई मॅडम, मायजवळ पैशे न्हाईत भाजीचं सामान आणायला. चार दिवस झाले,म्ही रानातली कच्ची पात खायलोत भाकरीसोबत. कोरडा घास गिळतच न्हाई, पाणी पेत पेत जेवावं  लागतंय. इथं मित्र पण नाहीत खेळायला. नयन, अर्णव, रुपेशची खूप आठवण येते.”

….. ओह ! पराकोटीचं दारिद्र्य, दुःख बोलत होतं केविलवाण्या स्वरात !

“मॅडम, मला गणितातली वजाबाकी समजत नाहीय, सांगतात का समजून? “

“अरे, तिथं पण अभ्यास करतोयस की काय? “

“हो मॅडम, मी सगळी पुस्तकं आणलीत इथं. बहिणी, माय कामावर गेल्या की मी अभ्यास करतो. वहीवरच्या तुमच्या सह्या बघून खूप आठवण येते तुमची. शाळा किती तारखेला भरणारयेत मॅडम? आईला विचारलं तर लई खेकसती माझ्यावर !….शाळेचं नुसतं नाव जरी काढलं तरी. सारखं म्हणती.. “ काय दिती रं तुझी ती शाळा?'”

— क्रमशः भाग पहिला 

लेखिका – सुश्री संध्या सोळंके-शिंदे, अंबाजोगाई

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments