सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ माऊली… भाग – 2 – सुश्री संध्या सोळंके-शिंदे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(“काय दिती रं तुझी ती शाळा ‘”) इथून पुढे —-

आयुष्याचे कैक उत्सव, इच्छा वेळोवेळी वजा केलेल्या त्या शिष्याला गुरूने गणितातली वजाबाकी समजावून सांगितली…. त्याक्षणी ते ज्ञानही आधाशागत प्राशन करत  होते त्याचे कान.

संवाद संपला… डोळे मिटून मॅडम विचार करू लागल्या…

‘जगण्यासाठी आयुष्याच्या काही अलिखित अटी गुपचूप मान्य केलेल्या असतात प्रत्येकानेच. अश्वत्थाम्यासारख्या असंख्य जखमा आजन्म मिरवत असतात काही जीव ! पोटातली भुसभुशीत दलदल भुकेच्याही बाहेर एक जग असतं हे विसरून जायला भाग पाडते. सादळलेल्या परिस्थितीचे ओले पापुद्रे सोलण्यात उभा जन्म जातो… अस्तित्वावर बुरशी चढवत ! अस्तित्वहीन जन्माची ठणकही जाणवू देत नाही ती भूक. प्रगतीच्या गुरुत्वाकर्षणकक्षेच्या कोसो दूर हुंदडत उभं आयुष्य जातं अन् एक  दिवस अवेळी अंधार पांघरून निपचित निजतं… खरंच… वास्तवाइतकं परखड, पारदर्शी काहीच नसतं… काहीच !

दीर्घ सुट्टीनंतर ,शाळा भरल्या. वर्गावर्गात हजेरी सुरू झाली… 

१.यश बनसोडे….यस मॅडम…!

२.अथर्व आवड…यस मॅडम…!

.

.

.

.

.

.

९.माऊली बडे   ……..शांतता…!

त्याक्षणी त्याच्या डेस्कवरची ती रिकामी जागा खूप काही बोलत होती..! त्याचा मंजुळ आवाज, उत्तर देण्यासाठीची धडपड..!… 

शाळा सुटली.. मुले लगबगीनं वर्गाबाहेर पडली.. मॅडम सामानाची आवराआवर करू लागल्या.. पर्स, टाचणवही, हजेरी, पुस्तके, बॉटल….सगळं दोन हातांत घेणं….केवळ अशक्य !… तिथेही ‘त्याची’ आठवण आली.. तो नित्याने थांबायचा.. मॅडमला हे सगळं घेऊ लागायचा. पाण्याची बॉटल हातात घेऊन सर्वांत शेवटी मॅडमसोबत वर्गाबाहेर  पडायचा… पराकोटीची समज अन् माया असते एखाद्या माणसात !

शाळा सुटल्यावर मॅडम गाडीवर घरी निघाल्या. तोच मागून कुणीतरी… ” मॅडम ss ..” अशी हाक मारली.

गाडी थांबवून मागे पाहिलं तर एक छोटी मुलगी पळत आली अन् म्हणाली,  ” तुम्हाला माऊलीच्या आईनं बोलावलंय.”

” त्या इथं कसं काय? कधी आले ते सगळे इकडे? ” म्हणेपर्यंत तर ती मुलगी पळूनही गेली…आश्चर्य अन् आनंदही वाटला. मनोमन सुखावल्या मॅडम. तशीच गाडी माऊलीच्या घराकडे वळवली. रस्त्यावर मुलं खेळत होती..

“मॅडम,मॅडम “.. हाका मारत होती. पण ह्या सगळ्यांत माऊली कुठेच दिसला नाही. घरासमोर आल्या.

कुडाचं, पत्र्याचं घर ते !.. दुरावस्था झालेलं.. सगळं भकास..ओसाड…

दाराआत डोकावलं तर.. भयाण शांतता….त्या शांततेत घोंगावणाऱ्या माशांचा आवाज, जवळच्या नाल्याची दुर्गंधी,

पावसाळ्यात गळणाऱ्या पत्र्यांच्या छिद्रांतून डोकावलेले, जागोजागी दारिद्र्याची लक्षणे दाखवणारे कवडसे..

मागच्या दाराबाहेर खाटेवर दारू पिऊन बेधुंदावस्थेत पसरलेला माऊलीचा बाप….. अन् कुठल्याशा कोपऱ्यात गुडघ्यांत तोंड खुपसून बसलेली माऊलीची आई!

आत जाताच..” माऊली ” हाक मारली.

तोच त्या आईने छताकडे बघत मोठ्याने हंबरडा फोडला…..” माऊली, तुझ्या मॅडम आल्यात रे ! ये की लवकर !”

…. काळजात चर्रर्र झालं! शंकेची पाल चुकचुकली, पण नेमका अंदाज येईना !

तोच मागून आवाज आला,

” काय सांगावं मॅडम, माऊलीचा घात केला हिनं ! मारून टाकलं ह्या बाईनं त्याला !”

…. भोवताली अगणित किंचाळ्या टाहो फोडत घिरट्या घालत असल्यागत झालं एकदम.

घरमालकीण मॅडमजवळ येत म्हणाली, ” मीच निरोप धाडला होता तुमाला बोलवायला. मॅडम,ही बया एकट्या माऊलीला घरी सोडून, पोरींला घेऊन कामावर गेली, जेवणाच्या सुट्टीत आली तर लेकराच्या तोंडाला फेस, अन् हातपाय खोडत होतं ते !.. माऊलीला सर्प डसला वो, लेकरू तडपडुन मेलं ! त्याला नगं न्हेऊ म्हणलं होतं मी हिला.. मी संबाळते म्हणलं होतं त्याला चार महिने !पण हिला ईश्वास न्हाई ! चार पोरीच्या पाठीवर झाल्यालं नवसाचं पोरगं  म्हणून सोबत न्हेलं हिनं, आन काटा निगाला लेकराचा ! लई भांडून गेली होती ना ही तुमाला? मंग नीट संबाळायचं होतं की त्याला! “

…. तिचे शब्द मॅडमच्या कानात लाव्हा ओतल्यागत शिरत होते. पण मेंदू मात्र थंड पडत होता.

 कोरड्या ठक्क डोळ्यांतून रक्ताचे अश्रू तेवढे बाहेर पडायचे बाकी होते ! तरीही अवंढा गिळून जमिनीकडे खिळलेली नजर विचलित न होऊ देता मॅडमने विचारलं,

” दवाखान्यात नेलं नाही का लवकर? “

” इकडं यायला निगाली होती, पण मुकादमानं  येऊ दिलं न्हाई म्हणं. आधी घेतलेली 20,000 उचल दे म्हणला म्हणं !

तितंच कुण्या जाणत्याला दाखवलं म्हणं. दोन दिवस तडपडत होतं म्हणं लेकरू.दवाखान्यात दाखवलं असतं तर हाती लागला असता मावल्या ! … त्याला सदा एकच म्हणायची…’ काय देती रं मावल्या तुझी शाळा?? ‘ त्याच्या वह्या   पुस्तकावर राग राग करायची, म्हणून त्यानं जाताना कपड्याच्या घड्यात घालून न्हेली पुस्तकं ! अन् आता रडत बसलीय !”…. म्हातारी घरमालकीण पोटतिडकीने बोलत होती.

छताकडं शून्यात नजर लावून ती आई बघत होती ! स्वतःच्या लेकराला वाचवू न शकल्याचा आरोप होत होता तिच्यावर !

… त्याच्या शेवटच्या पेपरमधील त्याचं देखणं अक्षर, आईच्या आडून बघत त्याने डोळ्यांनी केलेली आर्जवे, गुपचूप केलेल्या फोनमधील त्याचा दबका, पण सच्चा आवाज … सारं सारं चित्रफितीसारखं डोळ्यासमोरून जात होतं मॅडमच्या !… 

त्या माऊलीचं सांत्वन न करताच  मॅडम उठून दाराकडे चालू लागल्या… पाषाण हृदयाने, निःशब्द…!

तोच मागून आवाज आला, ” मॅडम…पाच भुकेली तोंडं पोसण्यापलीकडं काहीच करू शकले नाही मी उभ्या 

जन्मात ! मावल्या असा सोडून जाईल,असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं ! लेकरानं तडपडत माझ्या डोळ्यात बघत, माझ्या मांडीवर जीव सोडला. त्याची आठवण आली तर माझ्याकडं त्याचा साधा एक फोटो पण नाही, ह्याचं लै वाईट वाटायचं ! आज त्याचं सामान बघताना एक गोष्ट सापडली…तुम्हाला मी म्हणलं होतं ना…. ‘ तुमची शाळा काय देती म्हणून? ‘ माझ्या जन्माला पुरंल आशी, त्याची सगळ्यात मोठी आठवण दिलीय मला तुमच्या शाळेनं ! “

… असं म्हणत तिनं छातीशी कवटाळलेल्या हाताच्या मुठीतला ऐवज उघडून मॅडमसमोर धरला…

… शाळेनं दिलेलं ओळखपत्र होतं ते…! 

…. तिच्या काळजाचं ! मातीआड झालेल्या एका हसऱ्या, समंजस दुःखाचं !

— समाप्त   —

(शिक्षक म्हणून भोगलेला अनुभव आहे हा ! …दुर्दैवाने..पात्रांची नावं  बदलली आहेत. आजही तितक्याच तीव्रतेने आठवण येते त्याची..!)

लेखिका – सुश्री संध्या सोळंके-शिंदे, अंबाजोगाई

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments