सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ ससा आणि कासव — उत्तरार्ध ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
मग त्याने अगदी लगेच आपला नवा दिनक्रम सुरू केला. पण जेमतेम एका महिन्यातच हे असं कशाला तरी बांधून घेण्याचा, ध्येय गाठण्यासाठी नेमाने प्रयत्न करण्याचा त्याला कंटाळा आला. आणि त्याने ठरवलं ….. ‘आता हे सगळं पुरे. झालोय मी आता पुरेसा सक्षम‘ ……आणि बाकी कसलाही विचार न करता तो बाहेर पडला.
‘आता शर्यतीसाठी एकच एक शिखर नाही, तर प्रत्येक प्राण्याबरोबर वेगळ्या वेगळ्या शिखरासाठी स्पर्धा लावायची ….. निश्चित ठरलं. मग त्याने पटापट प्राण्यांचा क्रम ठरवला. ….. आधी हरीण … ते काय… आधी जोरात पळेल, मग लगेच दमून थांबेल…. मग… जिराफ. .. स्वतःची इतकी उंच मान सांभाळत कितीसा लांब जाऊ शकणार आहे तो ?….. मग …हत्ती… त्याचं एक पाऊल म्हणजे माझी बारा- पंधरा पावलं…. तो कसला जिंकणार? … आता त्याचा आत्मविश्वास फारच वाढला होता…. आधी या तिघांना जिंकूया…मग वाघ- सिंह- चित्ता शंभरदा विचार करतील मी त्यांना स्पर्धा लावायची का असं विचारल्यावर….. या आत्मप्रौढीनेच तो इतका फुगला होता…पण त्याला मात्र आपण खूप सशक्त झाल्यासारखं वाटत होतं.
…… मग झाली एकदाची स्पर्धा सुरू … हरणाने त्याला बघता बघता सहज हरवलं….. जिराफ कधी पुढे गेला हे तर त्याला कळलंच नाही…. आणि मिजाशीने हत्तीकडे पहाता पहाता, त्याच्याच पायाखाली तुडवला जाण्यापासून तो थोडक्यात वाचला, आणि नाईलाजानेच थांबला. आणि तेव्हा त्याच्याकडे पाहून कुचेष्टेने हसणारे इतर कितीतरी ससे आणि काही प्राणी त्याला दिसले. त्याच्याही नकळत त्याचा माज उतरायला लागला होता. तिथून कसातरी पळ काढून, धापा टाकतच तो एका जलाशयापाशी पोचला. तहानेने, भुकेने तो अगदी व्याकूळ झाला होता, पण आता त्याला एक पाऊलही उचलवत नव्हते. अगदी म्लान झालेला तो तिथेच काठावर धपकन बसला. इतक्यात अचानक तो वृद्ध ससा तिथे आला. या सशाला पाहून त्याला खूप वाईट वाटले. आता याला सावरायला हवे या विचाराने तो त्याच्याजवळ गेला …… “बाळा दमलास ना पळून पळून? पण जिंकलास का?”
“नाही ना?”
“जाऊ दे. आता पाणी पिऊन घे. इथलं गवत खा. आणि डोकं शांत झालं की विचार कर. सतत नुसता पळत राहिलास. पण इतक्या दिवसात स्वतः साठी किती जगलास? या जलाशयाइतकं शांत, स्थिर मन कधी अनुभवलं आहेस का ? यातले मासे बघ, राजहंस बघ … कसे आनंदात आहेत. त्यांनाही असं जगण्यासाठी खूप धडपडावं लागतं, खूप धावपळ करावी लागते, पळापळ करावी लागते …. पण इतरांना हरवण्यासाठी ते कधीच काही करत नाहीत….
मान्य आहे हे जग आता स्पर्धेचे झाले आहे. पण ती स्पर्धा आता आधी स्वतःशीच करायला हवी. कालच्यापेक्षा आज मी कसा पळलो, आणखी पुढे जाण्यासाठी मी स्वतःच स्वतःत काय सुधारणा करायला पाहिजेत, काय बदलायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, याचा पूर्ण विचार कर. आयुष्यात कितीही ध्येये गाठायची असली तरी एकावेळी एकाच ध्येयाचा ध्यास घेणे श्रेयस्कर असते असं जाणती माणसं म्हणतात म्हणे. तेही नीट लक्षात ठेव……आणि मग निर्धास्तपणे उतर स्पर्धेत.
बघ मग एक दिवस तुझ्याही नकळत तू नक्की जिंकशील”……………………
………पुढे काही वर्षातच ससा खरंच जिंकतो आणि या गोष्टीची इतिश्री होते…….
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈