☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 1☆ सौ. सुनिता गद्रे☆
रोजच्या जागी फळांची हात गाडी घेऊन विजयउभा होता. आज गाड्यावर ‘बिटका’ भरला होता. हापूस आंबाच, पण फळ बारीक म्हणून बिटका.
इब्राहिम चाचानं सल्ला दिला होता,”काय आहे ,या वर्षी बाजारात आंबा खूप आलाय. पण हापूस म्हणजे हापुस! त्याची टेस्ट दुसऱ्या कोणत्याही आंब्याला नाही. बिबट्या चा रेट कमी, त्यामुळे गरिबांना पण परवडतो. त्यामुळे विक्री चांगली होईल बघ.”
“खरंच,चाचा किती करतोय आमच्यासाठी.”विजय विचार करीत होता.
चाचा नेहमीच म्हणायचा,”सदा भैया चे फार एहसान आहेत माझ्यावर. अरे, गावातच राहिलो असतो तर चोऱ्यामाऱ्या,आवारागर्दी करत राहिलो असतो. जिंदगी बरबाद झाली असती. पण भैया मला इथं शहरात घेऊन आला. मला भाजी ची गाडी घेऊन दिली. भाजी कशी व्यवस्थित सांभाळायची, विकायची….. धंद्यातले पेच कसे सोडवायचे… या सगळ्या खाचाखोचा समजावल्या. त्यामुळेच आज मी इज्जतची रोटी खातोय. बायको, मुलं आणि मी त्याचे फार शुक्रगुजार आहोत बघ.”
हातगाडी घेऊन विजय उभा राहिला होता खरा, पण त्याचं आज लक्षच लागत नव्हतं. मनात येत होता मागच्या वर्षी चा हाच दिवस… सगळ्यांचा आयुष्य बदलून टाकणारा…. परकेपणाचा दुःख मागे टाकायला लावून जबाबदारीची जाणीव करून देणारा. आजच बाबांचं श्राद्ध झालं. आठवणीनं डोळ्यात आसवांनी दाटी केली. अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. डोळे पुसत पुसत त्यानं गाडी कडेला लावली…. आणि फुटपाथवर बसकणच मारली.
तो फळांचा गाडा आसवांच्या पडद्याआड नाहीसा झाला. त्याला दिसू लागला हातात बॅट घेतलेला विजय… आठवलं मागचं वर्ष… नुकतीच दहावीची परीक्षा आटोपल्यामुळे मित्रांबरोबरचं खेळणं, दंगा मस्ती! पण हा आनंद जास्त काळ नाही मिळाला.’त्या’ दिवशी सकाळी सकाळीच लवकर आंघोळ करून तो सज्ज झाला होता. एवढ्यात बाबांची हाक ऐकू आली. विजयनं दरवाजा उघडला. भल्या पहाटेच सदानंद फळ मंडईत गेला होता आणि तो आत्ता परतला होता.
“बघ कित्ती मोठं फळ आहे ते. अस्सल हापूसच्या पेट्या आहेत. देवगड हापूस!”
बॉक्सेस कडे बोट दाखवत… त्यातलं एक फळ काढून विजयला दाखवत, त्याच्या हातात देत सदानंद मोठ्या अभिमानाने म्हणत होता,”पुऱ्या मंडईत कुणी इतका महाग माल उचलायला तयार नव्हता. पण मी मोठे धाडस करून उचललाय…. हा सीझन चांगला गेला ना, तर आपला मंडईतील गाळा पक्का. मग असं गल्लोगल्ली गाडा घेऊन फळं नाही विकावी लागणार .”
सदानंद मनातल्या मनात तरंगत होता.
“मी येऊ मदतीला?” विजयनं विचारलं.
“नको रे बाळा, अजून खाण्या खेळण्याचे दिवस आहेत तुझे. चांगली सुट्टी लागली आहे…. मजा कर.”त्याच्या पाठीवर थाप मारून सदानंद म्हणाला होता.
बापलेकाचा चहा पोळीचा नाश्ता सुरु झाला.
“पोट भरून खा रे… खेळाच्या नादात तुझं खाण्या जेवणाकडं लक्षच कुठं असतं!”आई-सुशीला त्याच्याकडं कौतुकानं पहात म्हणाली …. आणि अज्या,संज्या नाश्ता झाला की तुम्ही दोघं लागा अभ्यासाला. परीक्षा व्हायच्यातअजून तुमच्या.”ती गमतीनं दटावत धाकट्या दोघांना म्हणाली.
“करतात गंअभ्यास… ती पण हुशार आहेत.”सदानंद खुश होऊन बोलत होता.”या तिन्ही मुलांमुळे मला खूप हुरुप येतो. कसला क्लास नाही अन् कुठल्याही विषयाची शिकवणी नाही. त्यांना स्कॉलरशिप मिळतेय, बक्षिसं मिळताहेत, हीच मोठी समाधानाची बाब आहे. हवं तितकं शिकू देत. नंतर एखादा धंदा किंवा चांगली नोकरी!”सदानंद ला आज काय बोलू आणि काय नको असं झालं होतं.
“सदा भैया”जोरात हाक ऐकू आली.
इब्राहिम बाहेर उभा होता. त्याचं हे एक वैशिष्ट्य होतं की घराचा उंबरठा ओलांडून तो कधीही आत यायचा नाही. गाडीवर जरुरी पुरता माल भरून झाला तशी ती दोघं बाहेर पडली.
विजय पण सायकल घेऊन बाहेर पडला. आज दूरच्या टेकडीवरच्या मारुतीच्या मंदिरा पर्यंत सायकल रेस होणार होती. रेस झाली अन सपाटून भूक लागली. घरी आला,… जेवला… आणि लगेचच बॅट घेऊन बाहेर पडला.
“आई ऽऽ… संध्याकाळी मला उशीर होईल गं… आज आमची क्रिकेट मॅच आहे.”अंगणातूनच ओरडून त्यांनं सांगितलं.
बिचारे अजू, संजू मोठ्या असू येनं विजय कडे पहात अभ्यास करत होते.
क्रमशः … भाग- 2
© सौ. सुनिता गद्रे,
माधव नगर. मो – 960 47 25 805
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈