सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
जीवनरंग
☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
(मागील भागात आपण पहिले– ज्यांची त्वचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी उजळ होती, त्या सगळ्या लोकांवर लिवी आपल्या काळ्या त्वचेचा राग काढत होता. माझ्याशी मात्र त्याचं कोणत्याही प्रकारचं वैर नव्हतं, माझ्याशी तो अगदी मोकळेपणानी बोलत असे. त्याला बहुधा आमच्या दोघांमध्ये काहीतरी साम्य वाटत असावं. म्हणूनच तर तो आपला रागही बेधडकपणे व्यक्त करत होता. आता इथून पुढे)
त्याचं काम मला आवडू लागलं होतं. बाहेरचं काम त्याने दोन दिवसात उरकलं, तेंव्हा मला वाटलं, की घराच्या आत सुद्धा कित्येक वर्षात रंग रंगोटी, सफाई केलेलीच नाहिये. भिंतींचा रंग जाऊन त्यावरची चमक तर कधीचीच गेलेली होती आणि आता तर कुठे कुठे वरचं प्लॅस्टर आणि रंगांचे तुकडे पडून आतली बिनरंगी भिंत दिसू लागली होती. तेंव्हा हेही काम करून घ्यावं. तो जेंव्हा काम उरकून निघाला, तेंव्हा त्याचे आजच्या कामाचे पैसे देऊन मी त्याला घरातल्या रंग-रंगोटी बद्दल बोलले. त्याने एका नजरेत घराकडे बघून पक्का अंदाज केला, की हे घर तीन बेडरुमचं आहे. घराच्या बाहेरच्या आकाराकडे बघून आतल्या लांबी-रुंदीचा बरोबर अंदाज घेता येत होता त्याला.
त्यानं ते काम करायचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी येताना रंगाचे डबे, ब्रश, रोलर हे सगळं सामान घेऊन येण्यासाठी त्याला 500 डॉलर दिले. त्याने ते पैसे त्याच्या खिशात ठेवल्याक्षणी मला वाटायला लागलं, की आता काही हा परत येणार नाही! एकटं रहाणाऱ्या बाईला लुटायची आयती संधीच दिली होती मी त्याला! लीवीवर, त्याच्या कामावर विश्वास बसल्यानंतरही मनात अशी गोष्ट यावी, याचं माझं मलाच आश्चर्य वाटत राहिलं. अशा चेह-यांवर तर सगळं जगच संशय घेतं आणि मी पण या जगातलीच होते ना? मी आपल्याच मनाला समजावत राहिले, की जर तो आलाच नाही तरी काही हरकत नाही, पाचशे डॉलर देऊन मला थोडी अक्कल तरी येईल!
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच त्याची वाट बघायला लागले होते मी! नऊ वाजायला अजून एक तास होता आणि माझ्या मनात धाकधूक सुरु झाली होती. मनाची बेचैनी दूर करावी म्हणून विचार केला, की गल्लीच्या टोकापर्यंत एक चक्कर टाकून यावी. वेळही जाईल आणि मन तो विचार सोडून जरा दुसरीकडे वळेल. चालत जात असताना लक्षात आलं, की रोजच्यासारखी गल्ली साफ दिसत नाहिये. इकडे तिकडे कागदाचे तुकडे, झाडांची पाने आणि खाद्यपदार्थ विखरून पडलेले आहेत. दोन तीन टीम हॉर्टन्सचे कॉफीचे कप पण लवंडलेले दिसत होते. कचऱ्याचे डबे खच्चून भरलेले होते आणि त्यामुळे त्याची झाकणं बंद न झाल्याने घाण वास सगळीकडे सुटलेला होता. आसपास पडलेली सिगारेटची थोटकं न विझवताच फेकलेली दिसत होती. ते बघून माझे पाय एक क्षण तिथेच थांबले. त्या थोटकांमधे मला कधी लीवीचा तर कधी माझा चेहरा दिसत होता. एक काळा आणि एक सावळा, ज्यांना चिरडणाऱ्या पायांना कधी ही जाणीव पण होत नसेल, की आपण एखाद्या माणसाला चिरडतोय, की सिगारेटच्या थोटकाला!
जवळपास अर्धा तास भटकून मी परत आले. चहा नाश्ता घेऊन घड्याळाकडे लक्ष जायच्या आतच बाहेरून काही आवाज आले. खिडकीतून बघितलं, तर लीवीची गाडी येऊन थांबलेली होती. गाडी जागेवर लाऊन त्याच्याबरोबर त्याच्या सारखीच दिसणारी आणखी तीन माणसं दरवाजाकडे येताना दिसली. आत्तापर्यंत तर मी एकट्या लीविलाच घाबरत होते, आणि आता आणखी तीन जण! त्याने बेल वाजवली आणि म्हणाला, की इथलं काम आम्हाला एका दिवसात उरकायचं आहे, म्हणून सगळी टीमच घेऊन आलोय.
ते धडाधड घरात घुसले, तेंव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. ते चौघं आणि मी एकटी! आता तर मी मुंगी एवढी सुद्धा राहिली नव्हते त्यांच्यासमोर! चौघांनी मिळून एक फुंकर मारली असती, तरी मी उडून कुठल्या कुठे जाऊन पडले असते. बाहेरच्या खोलीपासून काम सुरु केलं त्यांनी. मी विनाकारणच स्वयंपाकघरातून आत बाहेर करत होते. तिरक्या नजरेने, ते लोक काय करतायत याच्यावर नजर टाकत होते. कोणी भिंती घासत होता, तर कोणी खाली कपडा अंथरत होता, तर कोणी डब्यातून रंग काढत होता. ना त्यांनी काही सामान हलवण्यासाठी मला बोलावलं, आणि माझी कशासाठी मदतही घेतली नाही. एकामागून एक रंगांचे डबे रिकामे होत गेले आणि ते लोक एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात राहिले.
मला आश्चर्यच वाटत होतं. इतक्या वेगानं इतकं चांगलं काम होत होतं! खोल्या नवीन रंगामुळे चमकत होत्या. सामानही बरोबर आधीच्याच जागेवर ठेवलं जात होतं. मधे मधे मी त्यांना कोक किंवा चहा कॉफी पाहिजे आहे का, हे विचारत होते. ते लोक खूश दिसत होते. खूप गप्पा मारत होते, जोरजोरात हसत होते. मधे मधे मला पण आपल्या गप्पांमध्ये सामील करून घेत होते. त्यांची स्पष्टवक्तेपणानी बोलायची लकब पाहून मला आपोआपच हसू येत होतं. जेवणाची वेळ झाली तेंव्हा ते अर्ध्या तासासाठी बाहेर गेले. परत आले, तर माझ्यासाठी पिझ्झाची एक स्लाईस घेऊन आले.
मी विचारलं, “मला कशाला?”
लीवी म्हणाला, “कारण, तुम्ही फार चांगल्या आहात.”
ते ऐकून माझी मलाच लाज वाटली. माझ्या अंतर्मनातलं ते सत्य उघड उघड दिसून येत नव्हतं का? की माझा या लोकांवर अजिबात विश्वास नव्हता!
पिझ्झा मला पण आवडतो, पण का कोणजाणे, ही पिझ्झाची स्लाईस मला खावीशी वाटत नव्हती. लीविच्या चांगुलपणाचा आदर वाटला, म्हणून मी ती फ्रीजमधे ठेवून दिली, नंतर फेकता येईल असा विचार करत.
काम खूपच वेगानं चाललं होतं. मधे दोन वेळा त्यानं आणखी लागणाऱ्या रंगासाठी पैसे मागून घेतले. दर वेळी त्याला पैसे देताना मनात तीच भीति असायची. दर वेळी वाटायचं, की आता काही तो परत येत नाही! तो रंग आणायला गेला, की त्याचे सहकारी बाहेर गवतावर बसून आराम करायचे. काही वेळातच तो हसत हसत परत यायचा. त्याचं ते पांढरे शुभ्र दात दाखवत हसणं मला फार आवडून जायचं आणि माझा त्याच्यावरचा विश्वासही वाढायचा.
त्याचं काम संपता संपता संध्याकाळचे सात वाजले. दोन दिवसांचं काम एका दिवसात संपवून आता ते जाण्याची तयारी करत होते. रंग देऊन झाल्यावर झालेला कचरा, घाण साफ करून हात पाय धूत होते. मी लीविला त्याचे पैसे दिले आणि त्या चौघांना चांगलं जेवण घेता येईल अशी टीपही दिली. काम करणाऱ्याचं आणि करून घेणाऱ्याचं नातं आता सोपं झालं होतं. दिवसभर घर त्या चार जणांच्या हसण्याने दुमदुमून गेलं होतं. मला पण खूप हसवलं होतं त्यांनी. घरातली प्रत्येकच वस्तू लीविसकट चारी जणांनी बघितली होती, पण आता मला तशी काही भीति वाटत नव्हती. का कोण जाणे, पण मला सारखं असं वाटत होतं, की लीवी मला आधी भेटायला पाहिजे होता. कित्येक वेळा अशी छोटी मोठी कामं करवून घेताना मला फार कटकट झालेली होती.
जाताना बाहेरच्या लॉनवर त्याला सिगारेट ओढताना बघितलं, तेंव्हा माझ्या मनात आलंच, की आता तो सिगरेटचं अर्धवट जळलेलं थोटूक पायांनी चिरडतोय की नाही, ते बघायला हवं! त्यानं तो सिगरेटचा तुकडा विझेपर्यंत हातात धरून ठेवला आणि मग जवळच्या कचऱ्याच्या डब्यात फेकून गाडी सुरु करून निघून गेला.
त्याच्या मनात माझ्याबद्दल कोणताही राग नाही, हे बघून मी आनंदाचा निःश्वास सोडला. मी माझ्या मनातली ती गोष्ट लपवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. मी फ्रीजमधून त्याने आणलेला पिझ्झा काढला आणि तो गरम करून खायला घेतला. जसा काही या खोलीत लीवी हजर आहे, आणि त्याने कौतुकाने माझ्यासाठी आणलेल्या खाण्याचा आदर मी ठेवतेय, हे बघतोय. आता माझ्या समोर फक्त त्याचे पांढरे शुभ्र दातच नाही, त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व होतं, जे शुभ्र धवल किरणांपेक्षाही शुभ्र होतं.
☆ ☆ ☆ ☆ ☆
मूळ हिंदी कथा : डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈