☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 2☆ सौ. सुनिता गद्रे☆
संध्याकाळ झाली. मॅच खूप रंगात आली होती. विजय ची बॅटिंग होती. अगदी ‘विराटच्या’ स्टाईल मध्ये फटके मारत होता.
तेवढ्यात जोरात हाक ऐकू आली,”विज्याऽऽ,ए विज्या ,घरी चल.”समोर महेश दादा उभा होता.
“दादा जरा थांब ना, माझे एवढे बॅटिंग होऊ दे.” विजय मोठ्या अजीजीने म्हणाला.
पण रागाने आवेशात आलेल्या दादानं त्याच्या हातातली बॅट हिसकावून दूर फेकून दिली.
“काय झालं?…”काय झालं?” इतर मुलांनी एकच गलका केला.
एकाच्या हातातला बाॅल काढून घेऊन महेशनं खिशात टाकला.
“दादा ऽऽ असं काय रे!… आमची मॅच आणि सगळा खेळच तु विस्कटून टाकलास.” तक्रारीच्या सुरात विजय म्हणू लागला.
“चल घरी लवकर…”
त्याला डबल सीट घेऊन महेशनं सायकल जोरात पळवली. खेळ सोडून सगळेच त्यांच्या मागे धावत सुटले.
मेन रोड पासून ते घरापर्यंत विजयला खूपच गर्दी जाणवली. वातावरणात तणाव होता. एवढ्यात एक हॉस्पिटलची गाडी आणि एक पोलिस व्हॅन गल्ली बाहेर पडली.
“दादा, काय झालंय?” विचारताना विजय रडवेला झाला होता.
घरा समोरचे दृश्य पाहून तर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
“पोस्टमार्टम करावं लागलं”.
“त्या पोलीस विरुद्ध एफ.आय. आर. केलीय’.”
“बिचारा सदानंद!” त्याच्या कानावर वाक्य आदळली.
गर्दीतून वाट काढत तो कसाबसा आत गेला अन्अंगणातलं दृश्य पाहून शक्ती पात झाल्यागत जमिनीवरच कोसळला.
पांढर्याशुभ्र वस्त्राने झाकलेला एक मृतदेह अंगणात मधोमध ठेवला होता. आई जोर-जोरात रडत आक्रोश करत जमिनीवर डोकं आपटून घेत होती. तीन-चार बायका तिला सावरत होत्या.
“बाऽऽबा” अजय ,संजय टाहो फोडून रडत होते. विजयनं बाबांच्या पायावर डोकं ठेवलं… अनावर दुःखाने तो ओक्साबोक्शी रडू लागला. याच जागी उभे राहून सकाळी सदानंदनं प्रेमानं त्याची पाठ थोपटली होती. तो बाबांच्या हाताचा स्पर्श त्याला अजून जाणवत होता. हे काय अन् कसं झालं? त्याला काहीच उमजत नव्हतं. इब्राहीम चाचानं त्याला बाजूला बोलवून कवेत घेतलं.
रडत रडत तो म्हणाला, “फारच वाईट झालंय बेटा…. पोलिसानं लाठीनं बेदम चोपलं…. वर्मी घाव बसला.अन्….
“पण का? विजयच्या मनात विचार येत होता अन् हुंदके थांबत नव्हते.
बाहेरची गर्दी पांगवण्यासाठी तीन-चार मोठ्या कारा ,बाइक्स तेथे येऊन थांबल्या. दहा-पंधरा लोक पटापट खाली उतरले. मराठी हिंदी इंग्रजी सगळ्या टीव्ही न्यूज चैनलचे पत्रकार आणि फोटोग्राफर आपल्या सगळ्या लवाजम्या निशी आत दाखल झाले. प्रश्नांच्या झडी बरसू लागल्या. कॅमेऱ्यांचे फ्लॅश लाईट चमकू लागले.
तोंडासमोर आलेल्या स्पीकर च्या गोळ्या समोर लोक उत्तर देऊ लागले. “व्हय मॅडम तिथच पोलीस चौकीपास्नं हाकेच्या अंतरावर… तिथं बिल्डिंग बांधतायत नव्हं, तिथलं आमी मजूर. “आमच्या डोळ्यादेखत बिचाऱ्या या आंबे वाल्याला बडवायला सुरुवात केली की हो त्या मुर्दाड पोलिसवाल्यानं.” “व्हय ह्यो बिचारा पोलिसाला म्हणत होता” साब पाचशे रुपये डझनाचं आंबं ते पण दोन डझन …फुकटात कसं दीऊ? निम्मं तरी पैसे द्या.”
“लई माजलास रं तू…. “असं म्हणत समदा आंब्याचा गाडा रस्त्यावर उधळूनशानी टाकला की व्हं त्यानं. कोणी प्रत्यक्षदर्शी सांगत होता.
हयो बिचारा हात जोडून म्हणत हुता, “साब गरीब माणूस आहे. घरात लहान मुलं बाळं आहेत. गरीबाच्या पोटावर…”
“तर त्यो हवालदार पोटावर पाय नको काय मग पाठीवर मारतो म्हणाला.” “अन् वंगाळ शिव्या घालत या बिचार्याला लाठी आणि लाथेने मारायला लागला.”
“आम्ही समदं ह्येला वाचवायला धावलो तर दगडाच्या ढिगाऱ्यावर बेहोश होऊनशान पडला.”
आम्हीच चार-पाच गड्यांनी त्या- – -पोलिसांना घट्ट पकडलं आनि चौकीत घेऊन शान गेलो.
क्रमशः … भाग- 3
© सौ. सुनिता गद्रे,
माधव नगर. मो – 960 47 25 805
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈