सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ पत्त्यांचा बंगला… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
सभागृह माणसांनी गच्चं भरलेलं होतं. मध्यमवयीन, प्रौढ, वृद्ध तरुण सर्व प्रकारच्या वयांचा एकत्रित समूह तेथे जमला होता. निरनिराळ्या जातीचे, धर्माचे लोक तिथे उपस्थित होते. इतकी माणसं असूनही एक थंडगार शांती सभागृहात होती. कोपऱ्यात उंच पितळेच्या समया तेवत होत्या. वातावरणात उदबत्यांचे, कापराचे सुगंध दरवळत होते. मोगऱ्याच्या फुलांच्या माळा चहू बाजूला सोडलेल्या होत्या. त्याचाही दरवळ मनाला प्रसन्न करणारा होता.
थोड्याच वेळात नागू महाराज येतील. त्यांचं हस्तीदंती आसन छान सजवलं होतं. आजूबाजूला सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. फुलांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. आसनाभोवती अत्याधुनिक साऊंड सिस्टिम होती.
प्रत्येकाच्या प्रश्नाला नागू महाराज उत्तरे देणार होते. सभागृहातले सारेच त्यांच्या दर्शनास आतुरले होते. शिष्य प्रभावती आणि शिष्य विनायक दोघेही व्यासपीठावर आले. त्यांनी श्रोत्यांना वाकून वंदन केले. धुपारत्या उजळल्या. मधुर असा घंटा नाद घुमला. आणि शुभ्र वस्त्रे परिधान केलेले नागू महाराज सभामंडपात अवतरले. केसांचा नीट विंचरलेला जटाभार. गळ्यात लाल पांढऱ्या मण्यांच्या माळा आणि मुद्रेवर कमालीची शांतता. नजर तीक्ष्ण. विशाल नयन. त्यांनी सभागृहात एक शांत पण धारदार नजर फिरवली. सारे श्रोते नकळतच उभे राहिले. त्यांचे हात जोडलेले होते. महाराजांनी दोन्ही हात उंचावले आणि त्यांना बसण्याची खूण केली. क्षणात कुजबुजीचा नाद थांबला. आणि पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. महाराज ही आसनस्थ झाले.
एकेका भक्ताकडून येत असलेला भोग शिष्य विनायक स्वीकारत होता. आणि महाराजांच्या चरणाशी ठेवत होता. त्यात फळे होती, मिठाया होत्या, नाण्यांचे, नोटांचे बटवे होते. वस्त्रे होती. दागिने होते. दानपेट्याही भरत होत्या. महाराजांच्या चरणी भक्ती भावाने वाहिलेल्या भेटींची रास वाढत होती. पुन्हा सारे आसनस्थ झाले.
महाराजांनी डोळे मिटले. ओंकाराचा नाद वातावरणात उमटला. सर्व भक्तांनी त्यांचे अनुकरण केले. सभागृह ओंकारमय झाले. आणि मग महाराज बोलू लागले,
“आपण सारी परमेश्वराची लेकरे. या धरतीवर जन्माला आलो ते एक दिवस जाण्यासाठीच. मृत्यू हा अटळ आहे. सत्य आहे. आपण फक्त कर्म करायचे. नको फळाची अपेक्षा. दया क्षमा शांती हे आपल्या जीवनाचे तीन खांब ढासळू द्यायचे नाही. सुख आहे तिथे दुःख आहे. दुःखाचा अनुभव घेतला तर सुखाचा आनंद मिळेल. त्या शक्तीवर विश्वास ठेवा. श्रद्धा आणि सबुरी जीवनाला यशस्वी करी. बोला जय श्री कृष्णा… जय शिवशंकर ..पांडुरंग विठ्ठल.. राम कृष्ण की जय !!गोपाल कृष्ण राधे कृष्ण… गोपाल कृष्ण राधे कृष्ण…”
सर्व सभागृहात एक धीर गंभीर जयघोष झाला.एव्हाना सारा भक्तगण महाराजांना वश झाला होता. जणूं प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्याशी बोलतोय, याचा भास भाविकांना होत असावा.
मग प्रश्नोत्तरे सुरू झाली. अनंत समस्या. अनंत अडचणी. नाना प्रकारची दुःखे, निराशा. अपयश, स्पर्धा, शत्रुत्व, तक्रारी, हव्यास अनंत… शेवटच नसणाऱ्या… कुणाला नोकरी हवी तर कुणाला बढती. कुणाला संतान नाही तर कोणाची मुलं म्हातारपणी सांभाळत नाहीत.. कुणाला धंद्यात खोट आली.. तर कुणाचे वादळात घरदार वाहून गेले.. वर्षानुवर्षाच्या व्याधी.. परंपरागत चालत आलेले खटले.. प्रत्येकाच्या पोतडीत भरभरून समस्या. सगळ्यांना यश हवं. सुख हवं. एक एक जण आपली एक एक पोतडी महाराजांसमोर ओतत होता. आता महाराजांसमोर जीवनातला सारा चिखल पसरला होता. एक गढुळ समुद्र..
महाराजांच्या इशार्यानुसार शिष्य प्रभावती आणि विनायक कुणाला भस्म, कुणाला फळं, कुणाला गंडे, नाणे ताईत कसले कसले मंत्र वाटत होते. भाविक सश्रद्ध मनाने स्वीकारत होते. क्षणभर का होईना त्यांच्या मनावर आशेची पांघरूणं पसरत होती. महाराज आहेत ना मग कसली भीती नाही, असा विश्वास वाटून ते अधिकाधिक गुंतत चालले होते.
सभागृह रिकामे झाले. त्याची दारे बंद झाली. आणि शिष्यांनी आलेल्या भेटींचा पसारा आवरण्यास सुरुवात केली. अन्नधान्य, फळे, वस्त्रे, मिठाया, ठिक ठिकाणी वाटण्याची व्यवस्था ठरलेलीच होती. आणि नाण्यांनी नोटांनी भरलेल्या दानपेठ्या मठाच्या तिजोरीत सांभाळून ठेवल्या गेल्या. त्या तिघांनी त्या भरगच्च तिजोरीवर नजर फिरवली. आणि एकमेकांकडे बघून हलकेच स्मित केले.
प्रभावतीने महाराजांना वस्त्रे उतरवण्यास मदत केली.
“खूप दमलात तुम्ही! आता थोडा आराम करा.”
विनायकाने एका ग्लासात कसलेसे पेय आणले आणि महाराजांना दिले.
ते पिता पिता च महाराजांची तंद्री लागली.
प्रभावती आणि विनायक पुढच्या मीटिंगच्या तयारीला लागले. हे दोघे खास असले तरी महाराजांचा शिष्य गण खूप मोठा होता. प्रत्येक जण आपापले काम चोख करत होता. त्यांच्यात भांडणे, वाद होते. मात्र महाराजांकडून मिळणारी बिदागीही कमी नव्हती त्यामुळेच सारे या समूहाला चिकटून होते.
महाराजांनी डोळे मिटले.
एक लहानसं घर. तो. नागेश नाग्या ..आणि त्याची बहीण.रागीट बाप. घर चालण्यापुरतं पैसे देणारा. आजारी आई .आणि अधून मधून विचारपूस करण्यासाठी खाऊ घेऊन येणारी मावशी. खरं म्हणजे घरात कधी राहावं असं वाटलंच नाही. कसलाच आनंद नव्हता. संवाद नव्हता. प्रचंड तुटलेपण होतं एक प्रकारचं..
नाग्याची शिक्षणात गती नव्हतीच. वाचनालयात जाऊन पुस्तकं मात्र वाचायला आवडायची. पण दहावी बारावी गुणांकन ,भविष्य, महत्त्वाकांक्षा हे काही जमलं नाही. शाळेतली प्रगती पाहून बापाने अनेक वेळा चाबकाचे फटके मारले. बहिण हुशार होती. पण आईच्या आजारपणामुळे आणि बापाच्या धाकापायी घरकामातच तिची हुशारी सडली. एक दिवस कोणा मुस्लिम तरुणाचा हात धरून ती पळून गेली आणि नंतर कधीही दिसली नाही. आधीच वासे नसलेलं घर पूर्ण कोसळलं. त्यातच एक दिवस एका काळोख्या रात्री बापाला मावशीच्या खोलीत जाताना नाग्याने पाहिलं. आई प्रचंड खोकत होती. पाणी मागत होती. म्हणून नागेश उठला होता. आणि घरातलं ते अकल्पित दृश्य पाहून नागेश पुरा भेलकांडला. बापाच्या मस्तकात त्या क्षणी त्याला गोळी घालावीशी वाटली होती.
आईने अखेर शेवटचा श्वास घेतला.
तिचे अंत्य कर्म आवरले आणि तेराव्या दिवशीच बापाने मावशीला घरात आणले. रीतसर लग्न करून.
नागेश ने घर सोडले.
अंधारात तो चालत होता. मार्ग माहित नव्हता. कुठली वाट आपली, तेही कळत नव्हते. कुठलेच नाते उरले नव्हते. पाश नव्हते. बंध नव्हते. जगण्यासारखं काही शिल्लकही नव्हतं. पण मरायचंही नव्हतं. नाही म्हणायला एक ओला कोपरा होता. इंदू !
ठसठशीत, गोल बांध्याची, गोरी, गुबगुबीत हसरी इंदू!
एकदा तळ्याच्या काठी असलेल्या निंबाच्या झाडाखाली तिला घट्ट मिठीत पकडले होते. ओठावर ओठ टेकले होते. तिच्या गोल देहाशी झोंबी केली होती. पण तिने ओरबाडले. किंचाळत ती म्हणाली होती,
‘नालायक! भडव्या! शरम नाही वाटत?’ अंगावर थुंकून ती पळून गेली होती.
धागे तुटले ते तुटलेच. आपल्याला काहीच जमणार नाही आयुष्यात. प्रचंड दु:खाला सोबत घेऊन सुखाचा शोध घेण्यासाठी कितीतरी दिवस तो चालत होता. कसलीही शुद्ध त्याला नव्हती. अंगावरची वस्त्रेही फाटली होती. पिंपळाच्या पारावर तो बसून होता.. झाडावरची गळलेली पाने जणू त्याची लज्जा राखत असावीत. कोणी दयाळू बेवारशी म्हणून त्याला काही बाही खायला देत. मिळालं तर अन्न नाहीतर ऊपासमार.
दाढी वाढली. केसांच्या अस्ताव्यस्त जटा झाल्या.
एक दिवस त्याच्याजवळ आलेल्या एका वृद्धेला तो सहजच म्हणाला, ” जय राम कृष्ण हरी!! कुणी कुणाचे नसते. पाशात बंधात अडकू नकोस. तू स्वतःच वृक्ष हो! या पिंपळासारखा. सावली दे.”
वृद्धेला वाटले माझे दुःख याला कसे कळले? हा कोणी योगी वाटतो. सिद्ध पुरुष असावा.
आणि मग गावात धूळ उडाली. आपल्या गावात बाबा आला. सुखदुःख जाणणारा. उपाय सांगणारा. चांगभलं करणारा.
नागू महाराज की जय!!
नाग्या पुढे लोकांच्या रांगा लागू लागल्या. लोकं रडू लागली. आक्रंदू लागली. त्यांच्या चरणी लागू लागली. नाग्या थोडा भांबावला. पण मग त्याला हेही जाणवलं की जग खूप दुःखी आहे. आपल्याच सारखं. त्यांचं दुःख हे आपलं भांडवल.
सुरुवातीला तो प्रत्येकाच्या डोक्यावर नुसते हात ठेवायचा. वाचनालयात केलेलं वाचनही थोडसं उपयोगी पडत होतं. लोकांना वाटायचं बाबांच्या हातात जादू आहे. शब्दात शक्ती आहे. वाणीत दैवत आहे.
पिंपळाच्या पाराला देवत्व आलं. नाग्याचा नागू महाराज झाला. बघता बघता त्याचा प्रपंच वाढू लागला. भक्तगण वाढले. शिष्य परिवार वाढला. आजूबाजूच्या प्रांतात प्रचार होऊ लागला. दूर दूर ठिकाणाहून लोकं नागूच्या चरणी येऊ लागली.
क्रमश: – 1
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈