डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ सहृदय— भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

हॉस्पिटल मध्ये तुडुंब गर्दी होती. ओ पी डी तर ओसंडून वहात होती. डॉ. विश्वासने नर्सला विचारले, “ किती आहेत अजून लोक ग?”

” सर,आज तुम्हाला उशीर होणार घरी जायला.  पुन्हा उद्याची चार मोतीबिंदूची ऑपरेशन्स ठरली आहेतच.”

“ बरं, ठीक आहे. वरचं वर्षाबाईंचं काम आवरलं का. संपली का तिची ओ पी डी.? त्यांना म्हणावं एकदमच जाऊ आता “

“हो, बघते जाऊन. विचारते.”

सगळे  पेशंट तपासून झाले आणि एक बाई बसल्या होत्या, पण त्यांना मात्र घाई दिसत नव्हती. सिस्टरने त्यांना आत बोलावले. डॉक्टरांनी त्यांचे डोळे तपासले आणि म्हणाले, “ बाई, तुमचा एक मोतीबिंदू पिकलाय, त्याचे ऑपरेशन करावे लागेल. दुसरा डोळा  चांगला आहे.” 

बाई म्हणाल्या, “ हो,मला कल्पना आहे. पण डॉक्टर,खर्च किती येईल?मी वृद्धाश्रमात राहते, पण पैसे देईन मी तुमचे.  सवलत दिलीत, तर थोडे थोडे करून नक्की देईन. निम्मे आधी भरेन मी. “

डॉक्टरांनी त्यांच्याकडे बघितले.वृद्धाश्रमात राहण्याइतक्या त्या वृद्ध दिसत नव्हत्या. असतील साठीच्या आसपास.

“ बिलाचे बघूया नंतर.”डॉक्टर म्हणाले, “ पण तुमच्या बरोबर कोणी येणार आहे ना,ऑपरेशनच्या दिवशी?”

“ हो. माझी मैत्रीण येईल माझ्या बरोबर. पण तुम्ही मला ठेवून नाही ना घेणार? चार तासात सोडतात ना “ त्यांनी घाईघाईने विचारले ..

डॉक्टर हसले,आणि म्हणाले,” हो हो! तुम्ही चार तासात घरी जाल.” 

बाई अतिशय सभ्य सुसंस्कृत दिसत होत्या. डॉक्टरांनी काय तपासण्या कराव्या लागतील त्याची यादी दिली आणि  रिपोर्ट्स घेऊन बोलावले. बाई दोन दिवसात रिपोर्ट्स घेऊन आल्या. ते तपासून डॉक्टर म्हणाले, “ परवा आपण तुमचे करून  टाकू ऑपरेशन. चालेल ना?” 

“ पण सर, तुम्ही अजून पैशाचे बोललाच नाहीत. मी हे आत्ता  वीस हजारच देऊ शकते. मग दरमहा हजार देऊ शकेन. खात्री बाळगा, मी तुमचे पैसे बुडवण्याचे पाप करणार नाही.” 

“ ठीक आहे हो, चालेल. पण अजून मी तुमचे नावच विचारले नाही की.” 

बाई म्हणाल्या,” मीही सांगितले नाही. मी श्रीमती सुधा निमकर.” 

डॉक्टरांनी चमकून बघितले, “ बाई, अभय निमकर तुमचा कोण ?” 

“मुलगा !  तो इंग्लंडला मोठा सर्जन आहे.”

“काय सांगता सुधाताई? अभय तुमचा मुलगा आहे ?अहो,आम्ही एकाच कॉलेजातून डॉक्टर झालो .

माझा वर्गमित्र आहे अभय. तरीच मला तुम्हाला खूप पाहिल्यासारखे वाटत होते. मी खूप वेळा आलोय तुमच्या घरी.

जेवलोय सुद्धा तुमच्या हातचे अनेक वेळा. माफ करा हं, पण खूप वर्षे झाली ना,म्हणून ओळखले नाही तुम्हाला.” 

“अहो,ठीक आहे, कितीतरी वर्षे  झाली ना. बदल होतात हो माणसात.परिस्थिती बदलते.”

— डॉक्टरांना जास्त विचारण्याचे धैर्य झाले नाही. ठरलेल्या दिवशी बाईंची शस्त्रक्रिया छान पार पडली. डॉक्टर सुधाताईंच्या खोलीत आले…..  

” ताई, अगदी छान झाले हं ऑपरेशन. मी एक विनंती करू का? तुम्हाला मी आज आणि उद्या इथेच ठेवून घेतोय. आम्ही वरच राहतो. मी आणि माझी पत्नी वर्षा, दोघेही डॉक्टर आहोत ना. तिचे दुसऱ्या मजल्यावर प्रसूतिगृह आहे. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो. तुम्हाला जेवण वगैरे सगळे आम्हीच देऊ, आणि मग दोन दिवसांनी तुम्हाला डिस्चार्ज देऊ. चालेल ना?” 

सुधाताई संकोचल्या. म्हणाल्या,””अहो उगीच कशाला तुम्हाला त्रास ! मी अगदी छान आहे की आता. पण तुम्ही म्हणताय तर राहीन मी इथे.” बोलतांना सुधाताईंच्या डोळ्यात पाणी चमकले.

डॉक्टर राऊंड संपवून निघून गेले. रात्री वर्षाशी बोलताना डॉक्टर विश्वास म्हणाले,” नक्की काय ग झाले असेल?

इतक्या सुसंस्कृत बाई, सभ्य, पुन्हा स्वतः शिक्षिका होत्या.का बरं अशी वेळ आली असेल त्यांच्यावर–वृद्धाश्रमात राहण्याची?”

” हो रे! किती  छान आहेत त्या ! पण आपण हळूहळू विचारू त्यांना.” वर्षा म्हणाली. 

दुसऱ्या दिवशी राऊंड घेताना,डॉक्टर सुधाताईंच्या रूममध्ये आले. “ कशा आहात ताई? बरे आहे ना सगळे?” 

“अहो ,बरे काय.. अगदी छान आहे सगळे. अगदी माहेरी आल्याचे सुख घेतेय हो मी. पण उद्या मात्र सोडा बरं का.”

 — डॉक्टर त्यांच्या शेजारी बसले, आणि म्हणाले,  “ताई,असं काय घडलंय की तुम्हाला घर सोडावे लागले? अभयचे बाबा  कशाने गेले? मला काहीच कल्पना नाही हो. पण रागावू नका. मला सांगितलेत तर आपण काहीतरी मार्ग काढू शकतो यातून.”

सुधाताईंनी सुस्कारा सोडला. “ काय सांगू तुम्हाला मी ! तुम्हाला माहीतच आहे, अभय किती हुशार होता ते. पण त्याचा स्वभाव मात्र एकलकोंडा, चमत्कारिकच जरा ! आम्ही मध्यमवर्गीय माणसे हो ! अभयच्या वडिलांची सामान्य नोकरी आणि मी प्राथमिक शिक्षिका. पण अभय सगळे स्कॉलरशिप मिळवत शिकला हो. आम्हाला जराही तसदी नाही पडली त्याच्या खर्चाची. तो एम एस झाला,आणि त्याला इंग्लंडला पुढचे शिकण्याची संधी चालून आली. आम्ही त्याला जमेल तेवढे पैसे दिले, पण उरलेल्या रकमेसाठी कर्ज काढावे लागलेच. त्यासाठी आमचा लहान फ्लॅट गहाण ठेवावा लागला. कर्जाचे हप्ते त्याने भरले, कर्जही फेडले. पुढे त्याने तिकडे गोऱ्या मुलीशी लग्नही केले. आम्ही कशालाच विरोध केला नाही. पण हळूहळू तो आमच्यापासून दूरच गेला. त्याचे बाबा अचानक गेले तेव्हाही उपऱ्यासारखा पंधरा दिवस आला,आणि निघून गेला. त्या मुलीशीही त्याने घटस्फोट घेतला,असे म्हणाला.

मला म्हणाला, मला असे सारखे यायला जमणार नाही. मी हा फ्लॅट विकून टाकणार आहे. तुझी सोय वृद्धाश्रमात करतो. नशीब तरी बघा माझं, तो फ्लॅट यांनी त्याच्याच नावावर केला होता. त्यांना काय हो कल्पना, की पोटचा मुलगा असा वागेल… मी मात्र एका क्षणात रस्त्यावर आले …

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments