☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे☆
तो पर्यंत इब्राहीम पुढे झाला.
सांगू लागला, “या लोकांनीच सदा भैयाच्या मोबाईल वरनंआम्हा खूप जणांना फोन केले. मी पलीकडच्याच गल्लीत होतो… ताबडतोब पोहोचलो…. आम्ही सर्वांनी… तिथे दोन चार लोक होते त्यांनी मिळून सदाभैयाला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पण… पण तो…!”
इब्राहिमला पुढं बोलवेना.. थोडे हुंदके आवरुन तो पुढं म्हणाला, “पण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याचं स्टेटमेंट घेतलं आणि पाच मिनिटांनी होत्याचं नव्हतं झालं.
विजयला घडलेल्या प्रकाराचा थोडा थोडा उलगडा झाला. बायकांचा गलका ऐकून त्यानं इकडं तिकडं पाहिलं… आई चक्कर येऊन पडली होती… त्याला एकदम जबाबदारीची जाणीव झाली. आता आपणच पुढे होऊन सगळं करायला पाहिजे या विचाराने डोळे पुसून, सुन्न मन आणि बधीर, जड झालेलं डोकं या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तो उठला. त्याला सुचत गेलं. आईला सावरायला हवं… काका, मामा, आत्या कोणा कोणाला फोन पोहोचलेत, सगळी विचारपूस करायला हवी. ‘त्यानं पाहिलं…..
जशी आई सावध झाली तसे कॅमेरे आणि स्पीकर तिच्याकडे वळलेत बाबांचा देह, भावंडांचं रडणं, आईचं आक्रंदन सगळं टिपलं जाऊ लागलंय… त्यांच्या आयुष्यातली ही सर्वात दुःखद घटना त्यांचं घर सोडून इतरत्र सर्व टीव्ही चॅनेल वर आवेशा-आवेशात इतर बातम्या थांबून ब्रेकिंग न्यूजच्या रूपानं खणखणू लागली. मधूनच जे मीडिया कर्मी पोलीस चौकीत जाऊन पोहोचले होते ते तिथला वृत्तांत कव्हर करत होते. पोलिसांची हैवानियत, अत्याचार, गरिबांची पिळवणूक यावर भाष्य करता करता पोलीस इन्स्पेक्टर ला प्रश्न विचारून हैराण करत होते.
“त्या पोलिसाला अटक केलीये अन सस्पेंड केलंय. खात्यामार्फत चौकशीचे आदेश मिळालेत. अपराध्याला वाचवलं जाणार नाही. त्याला योग्य ती शिक्षा मिळेल.”ऑफिसर पाठ केल्यासारखी उत्तरं देत होते.
“सर, त्यांच्या गल्लीतल्या तरुणांना अटक केलीय?”
“हातात रॉकेल, डिझेलचे कॅन घेऊन पोलीस चौकी पेटवायला निघाले होते ते… पत्थरबाजी करून खिडक्यांच्या काचा फोडल्यात. दाखवा ते टीव्हीवर.”इन्स्पेक्टर आपली बाजू मांडत होता.
“ताबडतोब त्यांना ताब्यात घेऊन स्थिती नियंत्रणात आणलीय आम्ही…. आणि छोट्या चिल्यापिल्यांना वॅनमधून पुन्हा गल्लीत सोडलंय.”मोठ्या फुशारकीनं ऑफिसर सांगत होता. “कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही खूप चांगल्या तऱ्हेने हाताळलाय.”
“पण सर, त्याची विधवा पत्नी, छोटी छोटी मुलं… त्यांचं काय पुढं?… त्यांचा काय अपराध?…. त्यांनी आता कसं जगायचं?”
“चौकशी पूर्ण झाली की सरकार योग्य तो निर्णय घेईल. दोन लाख रुपये मृताच्या संबंधितास देण्यात येतील. एका मुलाला नोकरी देण्यात येईल… नो मोअर क्वेश्चन्स!” त्यांच्या बोलण्यात सहानुभूतीचा लवलेशही नव्हता.
जमलेल्या मित्रमंडळींनी जड अंत:करणानं उत्तर क्रियेची तयारी सुरू केली. नातेवाईक पण पहाटेपर्यंत येऊन पोहोचले. विजयनं यंत्रवत् सारा अंत्यविधी पार पडला. घरी पोहोचताहेत तो त्यांच्या परिवाराला भेटायला येणाऱ्या लोकांची रीघ लागली होती… तोच दोन-तीन मोठ्या मोठ्या कार गल्लीत येऊन पोहोचल्या’ मानवाधिकार आयोगाचे’ लोक घरात आले. पुन्हा कालचे तेच तेच प्रश्न आणि तीच उत्तरे… पोलीस व्यवस्थेवर ताशेरे उडवून झाले… शाब्दिक सहानुभूती देऊन झाली .”आमच्या मीटिंगमध्ये प्रस्ताव मांडतो. तुमच्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही… सर्वतोपरी मदत करू… “आश्वासने देऊन धुरळा उडवत गाड्या निघून गेल्या. पाठोपाठच ‘महिला आयोग’ ‘विधवा पुनर्वसन मंडळ’ संस्थांच्या मोठमोठ्या कार्यकर्त्या महिला आल्या. “तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभ्या आहोत. त्या पोलिसाला शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला आर्थिक मदत करू.”आश्वासनाचा पाऊस पडला अन् त्यांच्या गाड्याही दृष्टीआड झाल्या.
क्रमशः … भाग- 4
© सौ. सुनिता गद्रे,
माधव नगर. मो – 960 47 25 805
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈