सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆
☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 3 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(त्यातला एखादाच डोंगर असा असतो की जो स्वत:च्या उंचीमुळे, या वादळांमध्येही आपली ओळख टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो…’ ) इथून पुढे —–
राजारामच्या वागण्या-बोलण्यातला मनापासूनचा आपलेपणा खरंतर रत्नालाही खूप आवडतो… तिलाही तो जवळचा वाटतो. त्याच्या भेटीचा तो एक प्रसंग तर तिच्यासाठी अगदी अविस्मरणीय ठरला आहे… म्हणजे जेव्हा राजाराम आम्हाला शिर्डीमध्ये अगदी अचानक भेटला होता, तो प्रसंग… मी गाडी घेतल्यानंतरच्या लगेचच्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत साईबाबांच्या दर्शनासाठी सहकुटुंब शिर्डीला गेलो होतो. तिथे आम्हाला राजाराम आणि रेणुकावहिनी अगदी अनपेक्षितपणे भेटले. मग आम्ही सगळ्यांनी एकत्रच प्रसाद घेतला… दोन तीन तास एकत्रच होतो आम्ही. निघायची वेळ झाली तेव्हा मी माझ्या मुलांना त्या दोघांच्याही पाया पडायला सांगितलं. आणि फक्त दोन्ही मुलांनीच नाही, तर रत्नानेही त्या दोघांना वाकून नमस्कार केला. ते पाहून राजारामला खूपच भरून आलं होतं… डोळेही पाणावले होते त्याचे… माझ्याशी तर बोलूही शकला नव्हता तो. पण हात जोडून रत्नाला म्हणाला होता… ‘‘ वहिनी, मी तुमच्यापेक्षा फक्त वयाने मोठा आहे. बाकी सगळ्या बाबतीत तुम्ही दोघे माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. मी तुमचा ‘ सुदामा ’ आहे असं समजून माझी कायम आठवण ठेवा…” त्यानंतर आमची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही. पण त्यानंतर जेव्हा-केव्हा त्याची आठवण काढली जाते, तेव्हा रत्ना राजारामविषयी ‘सुदामा’ या नावानेच बोलत असते—-
श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
राजाराम झोपून उठल्यावर मी आमच्यासाठी चहा टाकला. तेवढ्यात तो तयार होऊन आला.. चहा घेता घेता त्याने विचारलं… ‘‘ रिटायर झाल्यावर दिले जातात, ते सगळे पैसे मिळाले असतील ना तुला? ”… राजारामने एक खडा टाकून पाहिला … पाणी किती खोल आहे याचा अंदाज घेत होता बहुतेक तो… ‘‘ हो… थोडे फार मिळाले… पण अजून बरेच मिळायचे बाकी आहेत… सरकारी काम आहे बाबा… आणि ते कधीच सहजपणे होत नाही, हे तर जाहीर आहे.”… मी पण त्याला माझ्याकडच्या पैश्यांचा थांगपत्ता लागू दिला नाही.
‘‘ आणि रत्नावहिनींची नोकरी व्यवस्थित चालली आहे ना? ”– हा त्याचा दुसरा प्रयत्न आहे, असंच मला वाटून गेलं.
‘‘ ठीक चालली आहे असंच म्हणायला हवं… दोन-दोन महिन्यांचा , कधी कधी तर तीन तीन महिन्यांचाही पगार दिला जात नाही तिच्या ऑफिसकडून…” … वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा आधार घेऊन मी सारखं त्याच्याशी चक्क खोटं बोलत होतो. तो आणि मी काही वेळ जणू एक अनामिक खेळ खेळत होतो… ज्यात मी होतो फळांनी लगडलेला एक वृक्ष… आणि राजाराम होता एक लहानसा निष्पाप मुलगा… जो अतिशय साध्या-सरळ मनाने बाण मारत राहिला होता आणि वृक्ष मात्र अतिशय हुशारीने आपली फळं वाचवत राहिला होता.
पाच वाजायच्या जरासं आधीच मी राजारामला घेऊन बस-स्टँडवर पोहोचलोही होतो. बस अजून लागली नव्हती. राजारामला तिथेच थांबायला सांगून, मी त्याच्यासाठी पान आणायला गेलो. परत येईपर्यंत बस लागलेली होती. राजाराम बसमध्ये चढतच होता, इतक्यात रत्ना जवळजवळ पळतच बसपाशी आली.
‘‘ वहिनी तुम्ही?… अहो इतकी धावपळ करत इतक्या लांब यायची काय गरज होती…”
‘‘ गरज होती दादा. खरं तर सुधाच्या लग्नासाठी आम्ही रामटेकला यायलाच हवं होतं. पण तुम्ही समजून घ्याल याची खात्री आहे मला. भावाच्या घरीही त्याला मदत करायला कुणी नाहीये. त्यामुळे आम्हा दोघांनाही काही दिवस आधीच त्याच्याकडे जावं लागणार आहे… हे घ्या.. सुधाच्या लग्नानिमित्त आमच्याकडून भेट…” तिने राजारामच्या हातात एक प्लॅस्टीकची पिशवी ठेवली… ‘‘ रेणुकाताईंना म्हणावं की लग्नात ही साडी नेसायची. हा रंग अगदी खुलून दिसेल त्यांना… आणि त्याच पिशवीत शर्ट-पॅन्टचं कापडही आहे… तुमच्यासाठी.. अजून लग्नाला थोडे दिवस आहेत. गेल्या गेल्या शिवायला टाका.”
‘‘ वहिनी उगीचच इतका खर्च कशाला केलात? तुम्ही दोघं लग्नाला आला असतात तर वेगळी गोष्ट होती.”
‘‘असू दे हो… आणि रेणुकाताईंना ही चिठ्ठी द्या.”… पर्समधून एक पाकिट काढून तिने राजारामला दिलं… ‘‘ नीट सांभाळून ठेवा हं खिशात. वधू-वरांना आमचा आशिर्वाद सांगा, आणि लग्न पार पडल्यावर रेणुकावहिनींना घेऊन चार-आठ दिवस रहायलाच या आमच्याकडे… नक्की या.”
…. एवढ्यात कंडक्टरने घंटा वाजवली आणि राजाराम जाऊन त्याच्या सीटवर बसला. रत्ना आणि मी आपापल्या स्कूटरवरून घरी आलो. मला घर एकदम सुनंसुनं वाटायला लागलं… हि-या-मोत्यांनी भरलेली नौका समुद्रात अचानक दिसेनाशी झाल्यावर दु:ख.. निराशा दाटून यावी… तशाच दु:खात… तशाच निराशेत मी जणू बुडून चाललो होतो. माझी मन:स्थिती रत्नाला बहुदा नेमकी कळली होती… ‘‘चला, चहा घेऊया.”
‘‘ नको… आत्ता नको… नंतर घेऊ या…. बिचारा राजाराम… त्याला मी वीस हजार देईन या आशेने आला होता. त्याची एकूण परिस्थिती पाहून वाटलंही होतं… द्यावेत म्हणून…”
‘‘ मग का नाही दिलेत? त्याला वीस हजार देऊन टाकले तर आपण कंगाल होऊ असं वाटलं होतं का तुम्हाला? अहो जन्मभराची तुमची मैत्री… वीस हजार रूपये त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटले का तुम्हाला? घरातले दोघं दोघं नोकरी करत असतांना सुद्धा, एखाद्या मित्राला त्याच्या गरजेच्या वेळी जर ते उपयोगी पडू शकले नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातली अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही… जाऊ दे आता. आणि ऐका… आता असे हताश होऊ नका… मी एकवीस हजार रूपयांचा बँक ड्राफ्ट काढून तुमच्या ‘सुदामा’ च्या हवाली केला आहे. त्या पाकिटात तो ड्राफ्टच होता. आणि म्हणूनच तो नीट सांभाळून न्यायला सांगत होते त्यांना…… आता चालेल ना चहा?” … असं म्हणत रत्ना चहा करण्यासाठी आत निघून गेली…
आणि मी विचार करत राहिलो… ‘आज रत्नाने किती सहजपणे मला “ द्वारकाधीश “ बनवून टाकलं आहे’……..
— समाप्त —
मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈